Marathi | English
Follow us:
प्रशिक्षक आणि मार्गदर्शक
#

नांवात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला होता, पण शैलेश तांडेल या नांवातच भरपूर काही आहे. शैलेश म्हणजे हिमालय. त्यात हिमालयाच्या शिखरासारखे चढ उतार आहेत. हिमालयाच्या कुशीत सामावलेले अफाट ज्ञान आहे, सहज सुंदर अशी विनम्रता आहे आणि तांडेल म्हणजे जो नाविकांची नाव ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करतो; तो नाविक नाही तर नाविकांचा प्रमुख आहे आणि ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दृढनिश्चय असतो.

गेल्या ५/१० वर्षात खूप सारी मराठी माणसे उद्योगधंद्यात उतरली आणि यशस्वी देखील होत आहेत परंतु १९८९ मध्ये तशी परिस्थिती नव्हती कारण त्यावेळी उद्योगात मराठी माणसाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच. अशावेळी वयाची विशीही पूर्ण न झालेला मी हातात कोणतेही भांडवल नसताना देखील उद्योगात उतरलो.

ह्या वयात माणूस एखादी नोकरी शोधून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी धंद्यात उतरणे म्हणजे लोकांच्या मते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे. जर धंद्यात उतरयाचेच असेल तर बापदादाची संपत्ती तरी हवी किंवा स्वतः पैसा कमावून, चांगला अनुभव घेवून चाळीशीच्या नंतर सुरु करायची बाब. मी ह्या सर्वांची पर्वा न करता जे येईल ते आव्हान स्वीकारायला मनाची तयारी केलेली होती. आणि हे आव्हान मी लीलया पेलले तेही थोडीथोडके नव्हे तर सलग २५ वर्षे.

उद्योग म्हटला की तो उद्योग व्यवस्थित नावारूपाला येत असताना आणि आल्यावरही खूप सारे खाचखळगे आणि आयुष्यातील कित्येक उतार-चढावांना सामोरे जाणे हे नित्याचेच आणि तेही जेव्हा तुम्ही पहिल्या पिढीतील उद्योजक असता त्यावेळी ह्या समस्या थोड्याथोडक्या नसून भरपूरच जास्त असतात. त्या पचवत पुढे जाताना स्वतःच्या पलीकडचे जग सहसा दिसत नाही पण मी त्या समस्यांना गोंजारत बसण्यापेक्षा त्यांना सामोरे गेलो. त्या प्रत्येक घटनेतून जे मिळेल ते शिकत गेलो आणि जे मी स्वानुभवातून शिकलो ते इतरानाही शिकविण्याचा धडाका लावला.

स्वतःमधील नेतृत्व गुणांची आलेली प्रचीती, उद्योगातील समस्यांना सामोरे जात असताना आलेला दांडगा अनुभव आणि कुणालाही सर्वतोपरी मदत करण्याचा माझा स्वभाव यामुळे सहजच सर्वांना मदत करून त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी सुरु झालेला माझा प्रवास प्रशिक्षणाच्या महामार्गावर येऊन कधी थडकला ते कळलेही नाही. ह्या एवढ्या वर्षात लोकांना त्यांच्या आयुष्यात उभे राहण्यासाठी, अगदी साध्या सोप्या पध्दतीने त्यांना बळ देण्याचं काम मात्र आजतागायत अविरत चालू आहे.

माझ्या वागण्या-बोलण्यात तुम्हाला नेहमीच उत्साह तसेच सहजपणा दिसेल. ही दैवी देणगी कदाचित मला उपजतच मिळाली आणि स्वतःचा शोध घेत घेत ह्या शक्तीचा वापर सत्कार्मासाठीच व्हावा ही सुबुद्धी झाली आणि ती शक्ती वाढली. या दैवी देणगीचा वापर गेल्या दीड-दोन दशकाहून जास्त काळ लोकांच्या मार्गदर्शनासाठी झाला आहे. अगदी गुंतागुंतीचा पेच मग तो माझा असो वा इतरांचा, सहजपणे खेळीमेळीच्या वातावरणात नाहीसा होतो. मी लोकांमध्ये ज्ञान वाटण्यापेक्षा, त्यांच्यामध्ये असलेले गुण हेरून त्यांनी त्या गुणांचा वापर कसा करावा हे नजरेत आणून देतो. ज्ञान महत्वाचे आहेच पण नुसते ज्ञान असून चालत नाही तर ते ज्ञान योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेवर वापरले जाणे जास्त महत्वाचे असते.

सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या स्वतःमधील ताकदीची जाणीव करून देणे, वास्तवाला सामोरे जाण्यास सज्ज करणे व त्यांचे मनोबल वाढवून मोठमोठ्या उलाढाली पेलवण्यासाठी समृद्ध करणे; हे नेहमीच माझ्या केंद्रस्थानी आहे आणि असेल.

गेल्या २५ वर्षांच्या माझ्या उद्योजक आणि प्रशिक्षकाच्या कारकिर्दीत माझ्या लक्षात आले की मला त्यावेळी अतीव समाधान मिळते ज्यावेळी मी कुणाच्यातरी आयुष्यात काही चांगले बदल घडवितो, मग ती व्यक्ती कुणीही असो. माझ्या जवळची किंवा संपूर्ण अनोळखी, एखादे ५/६ वर्षाचे मुल किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्ती. मला लोकांमध्ये राहून त्यांच्या आयुष्यात रचनात्मक विकास घडवायला आवडतं.

हृदयातील ह्याच निष्ठेतून मी मराठीतून सामान्य जणांसाठी सेमिनार घेण्यास सुरुवात केली. गेल्या ४ वर्षात मुंबई आणि ठाण्यात साधारणपणे ५० च्यावर सेमिनार मी घेतले आहेत.

जीवनाच्या शाळेत पडत-धडपडत, कधी तोंडावर आपटून पण तरीही पुन्हा त्याच जोमाने उभे राहून आयुष्याला सामोरे जाण्यातून आलेले हे माझे स्वानुभव आहेत. कधी मी स्वतःच्या तर कधी इतरांच्याही चुकांपासून धडा शिकलोय त्यामुळे हे पुस्तकी ज्ञान नाही आहे. कदाचित तुम्ही जिथे अडकला असाल त्यातून कधीकाळी मी बाहेर पडलोय आणि त्याचमुळे मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो.

प्रशिक्षकाचा प्रवास सहजच सुरु झाला परंतु आता लोकं प्रेमाने टाईम मॅनेजमेंट एक्स्पर्ट, मास्टर कम्युनिकेटर आणि एक वैविध्यपूर्ण प्रशिक्षक (Versatile Trainer) असे संबोधतात.

ताण तणावावर मात कशी करावी ह्यावर आय बी एन लोकमतवर शैलेश तांडेल ह्यांची विशिष्ट मुलाकात

video

Copyright © 2010 SEARCHLIGHT WITH IN. All rights reserved.