बोध घ्यायचा की उसासे सोडायचे?

कुणी आत्महत्या केली किंवा एखाद्याला एकाकी मरण आले की मेसेजेसचे महापूर येतात. पूर्वीचेच मेसेज नव्याने मुलामा देऊन फॉरवर्ड करायला आम्ही सुरुवात करतो पण खरंच त्याची गरज असते का?

त्या मेसेजमध्ये हिटलर, सुशांत सिंघ, भय्यूजी महाराज पाहिजेतच नाहीतर तो पूर्ण होत नाही. कालपरवा रवींद्र महाजनी एकाकी वारले त्याबरोबर नातेसंबंधांवर मेसेज सुरु झाले. हिटलर जिवंत पकडला जाऊ नये म्हणून हिटलरने आत्महत्या केली होती तर सुशांतची हत्या होती की आत्महत्या त्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे मराठी माणूस कसा धंदा करू शकत नाही किंवा कर्जबाजारी नाही व्हायचं वगैरे मेसेज फिरायला लागतात. अरे एवढी वर्षे ते या क्षेत्रात पाय रोवून होते त्यावेळी ते मराठी नव्हते का?

जी लोकं स्वतःच्या जीवावर एवढ्या वरपर्यंत पोहोचली होती किंवा दुसऱ्यांना मदत करायला सक्षम होती त्यांना नसेल का कळल्या या गोष्टी? प्रत्येकाला आपल्या समस्या मोठ्याच वाटतात आणि त्यावेळी कित्येकजण ऐकण्याच्या मनस्थितीत देखील नसतात.

कारण काहीही असो पण कुणी अशा प्रकारे गेले तर आपण फक्त उसासे सोडू शकतो किंवा दुःख व्यक्त करू शकतो पण ती व्यक्ती या निर्णयापर्यंत येताना कशातून गेली असेल ते कधीही समजू शकत नाही कारण आपण त्यांचे आयुष्य जगलेलो नसतो आणि स्वतःच्या अनुभवांवर दुसर्यांच्या आयुष्याचा मोजमाप आपण नाही करू शकत. त्यामुळे श्रद्धांजली वाहून त्यातून जो बोध घ्यायचा आहे तो घेऊन ती गोष्ट तिथेच सोडणे माझ्यामते उत्तम.

लाईफ कोच व बिझनेस मेंटॉर
शैलेश तांडेल

Posted in Uncategorized.

Leave a Reply