Opeing Door to Success

Open The ‘Only’ Door Which Leads To Success

काही दरवाजे जरी उघडले तरीही ते आपल्याला कुठेही घेऊन जात नाहीत कारण तो रस्ता नसतोच मुळी. आणि जरी असला तरीही प्रगतीच्या मार्गावर नेणारा तर तो हमखास नसतो.

पण असे कितीतरी अनावश्यक आणि दिशाभूल करणारे दरवाजे रोजच्या रोज उघडतच असतात आपल्या आयुष्यात. पण ते कुठे घेऊन जातात हे मात्र काळच ठरवतो.

कालच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या उपांत्य फेरीचे उदाहरण घेऊ या.

ह्या सामन्यामध्ये भारतच जिंकणार याची १००% ग्वाही जो तो देत होता परंतु झाले मात्र उलटेच ऑस्ट्रेलिया ९५ धावांनी जिंकली. ज्या संघाने अगोदरच्या ७ सामन्यांमध्ये विरोधी संघाला पुर्णतः बाद केले होते तो ऑस्ट्रेलियाचे फक्त ७ फलंदाज बाद करू शकला. स्वतः मात्र पहिली वेळ संपूर्णतः बाद झाला आणि सामन्यातूनच नव्हे तर स्पर्धेतूनच बाद झाला.

त्यानंतर मात्र लोकांच्या भावनांचा विस्फोट होऊन त्यांच्या प्रतिक्रियांची सुरुवात झाली. काही भारतीय संघाविरोधी, खेळाडूंविरोधी तर काही त्यांच्या खासगी आयुष्याची चिरफाड करणाऱ्या. अगदी खालच्या पातळीवर उतरून एखाद्या खेळाडूच्या वाईट प्रदर्शनासाठी त्याच्या मैत्रिणीला जबाबदार धरणाऱ्या. काही भारतीय संघाच्या बाजूने प्रतिक्रिया देऊन त्यांचे मनोबळ वाढवणारे. त्यांनी अगोदरच्या सामन्यात जे उत्तमोत्तम खेळ करून जो निर्लेभ आनंद दिला त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणारे. तर काही असे सांगणारे की तुमच्या यश-अपयशात आम्ही तुमच्या सोबतच आहोत असे सांगून धीर देणारे आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणारे.

ह्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या यश-अपयशाचा आमच्या आयुष्याशी दुरान्वयानेही काही संबंध आहे का? तर नाही.

आम्हाला माहित आहे की हा एक खेळ आहे आणि त्या खेळात कुणी एकच जिंकू शकतो म्हणजे साहजिकच दुसरा हरणारच. पण हे तथ्य जरी माहित असले तरी ते स्वीकारायची आमची अजिबात तयारी नसते किंवा कदाचित तो कणखरपणा किंवा ते स्वीकारण्याची कुवतच आमच्यात नसते. आमची कुवत बहुतेकवेळा फक्त आणि फक्त कुरकुर करण्या एवढीच मर्यादित असते.

आमच्या स्वतःच्या आयुष्यात असे शेकडो अपयश आम्ही अनुभवलेले असतात आणि असे नाही की ते अपयश आमच्या पचनी पडलेले असतात, पण अप्रत्यक्षपणे आमच्या अंगवळणी नक्कीच पडलेले असतात. कदाचित त्यामुळे आमच्या वास्तविक जीवनात आम्ही जिंकतो कमी आणि हरतो मात्र बहुतेक वेळा. पण तेच दुसऱ्याकडून घडलेले आम्हाला मान्य नसते. पण आम्हाला आवडो अथवा न आवडो तरीदेखील प्रचलित म्हणीप्रमाणे घडतेच ‘ भरवशाच्या म्हशीला तोंडगा.’ नाही का?

आमच्या आयुष्याकडे आम्ही सहसा बघण्याचे टाळतो आणि आमच्या भावभावनांना हात घालणे म्हणजे काहीतरी भयंकर ज्याचा विचार करणेही अवघड. आम्ही कितीतरी प्रसंग जिरवलेले किंवा लोकांपासून लपवलेले असतात, कारण आमच्या मते भावना फक्त दुर्बळ व्यक्तीच व्यक्त करतात त्यामुळे सहसा आम्ही आमच्या भावनांनाच मुरड घालतो किंवा असे कोणतेही मोठे काम हाती घेत नाही ज्यामुळे तोंडघशी पडू. छोट्या छोट्या कामांमध्ये आपटलो तरी ते अपयश सहज लपवता येते पण जर कुणी मोठी झेप घेऊन आपटला तर त्याच्यावर टीका करायला आणि त्याला ज्ञान द्यायला मात्र आपण मोकळे.

दुसरे म्हणजे जे आमच्यासाठी नायक (हिरो) आहेत जसे क्रिकेट स्टार वगैरे. त्यांचे अपयश तर आम्हाला मान्यच नसते आणि तेही सातत्याने ७ सामने जिंकल्यावर तर नाहीच नाही. आम्ही नाही करू शकलो पण दुसऱ्याने ते केल्याने मिळणारा आनंद कुणी आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. पण जर असे झालेच तर अशावेळी मन रमवण्यासाठी आम्हाला काही वेगळे साधन लागते किंवा पातळी घसरून कुणावर काहीही आरोप किंवा विनोद. ज्याने आम्ही ह्या दुःखातून बाहेर पडू शकतो.

ह्या दोन वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आणि त्यालाच अनुसरून प्रतिक्रिया, नाहीत का? आम्हालाही हे ठाऊक आहे की खेळात हारजीत होणारच. प्रत्येक सामना आपण जिंकणे शक्यच नसतं. शेवटी ‘मौका मौका’ प्रत्येकाला कधीना कधीतरी मिळतोच, नाही का? अगोदरच्या ७ सामन्यात आमच्या खेळाडूंनी विजय नुसता खेचून आणला नव्हता तर प्रत्येक संघावर आपले वर्चस्व गाजवले होते आणि तेही कुणीही अपेक्षा केलेली नसताना. पण आता मात्र अपेक्षा केली पण पदरी निराशा पडली.

ह्या अपयशामुळे बहुतेकांच्या मनात एक सळ कायम राहील ती म्हणजे आम्ही उपांत्य फेरीत हरलो. तीही अशा काही अविर्भावात जसे काही आम्ही प्रत्यक्ष मैदानात हरलो आहोत एखाद्या शत्रूशी लढताना किंवा आयुष्याच्या अशा वळणावर जिथे जिंकण्याची पूर्ण खात्री होती आणि आम्ही हाराकिरी केली.

आम्हाला देखील प्रत्येक वेळी निर्भेळ यश हवे असते पण जर का असे अपयश आमच्या पदरी पडले तर मात्र आमची माफक अपेक्षा असते की कुणीतरी अशा पडत्या काळात आमच्या पाठीवर मायेने हात फिरवून आमचे सांत्वन करून खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहावे. आम्हाला धीर देऊन आमचे मनोबल वाढवावे आणि सांगावे तू लढ मी तुझ्या चांगल्या-वाईट वेळेत मी तुझ्या पाठीशी आहे; नेहमीच.

पण हे सहसा होत नाही. क्वचितच आमच्या पडत्या काळात कुणीतरी खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहतो. पण म्हणून आम्ही आहोत त्याच स्थितीत राहायचं की जे हवं ते मिळविण्यासाठी कटिबद्ध व्हावे?

नुसते कटिबद्ध होऊन देखील गोष्टी साध्य करता येत नाही पण ध्येयाकडे वाटचाल मात्र सुरु करू होऊ शकते. ती वाटचाल शिस्तबद्ध असावी आणि ध्येयाकडेच नेणारी असावी ह्यासाठी मात्र काही अनावश्यक गोष्टी आयुष्यातून बाहेर टाकाव्या लागतात. काही पळून जाण्याचे मार्ग बंद करावे लागतात. तर काही वेळ फुकट घालवणारे, ध्येयाच्या विपरीत दिशेकडे घेऊन जाणारे, तर काही दरवाजे जे तुम्हाला खोल दरीत घेऊन जातात ते दरवाजे कायमचे बंद करावे लागतात; नाहीतर यश मिळविणे शक्यच नाही.

मग तो भारतीय संघ असो वा तुमच्या आमच्या सारख्यांच साधारण आयुष्य. सर्वांना मापदंड एकच. त्यामुळे दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पोहोचवतो.

Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Posted in Inspirational, Mantra Yashacha, Motivational, Success Mantra.

2 Comments

  1. Sir it is a eyeopener statments. We always want that mistake can be done only by themselves. Thanks

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.