काही वर्षांपूर्वी एका शास्त्रज्ञाचे अंटार्टिका मधील वास्तव्याचे अनुभव ऐकण्यासाठीच मी गेलो होतो.
अंटार्टिका म्हणजे पृथ्वीच्या दक्षिणेचा निर्मनुष्य भाग. संपूर्ण बर्फाळ प्रदेश जिथे हवा ७०/८० ताशी किलोमीटर वेगाने वाहते त्यामुळे दूर उडून जाऊ नये म्हणून स्वतःला बांधून घ्यावे लागते आणि जिथे उन्हाळ्यात सहा महिने दिवस आणि थंडीत सहा महिने रात्र. आपल्यासारखे १२/१२ तासांनी तिथे दिवसरात्र होत नाहीत. थंडीमध्ये तिथे सहाही महिने रात्र असते आणि तिथे त्या काळात वास्तव्य शक्यच नसते त्यामुळे उन्हाळा जो देखील सहा महिन्यांचा असतो तेव्हा त्या सूर्यप्रकाशात शोधकार्य करून सर्व शास्त्रज्ञ थंडीत माघारी फिरतात. जगातील काही महत्वाचे देश तिथे शोधकार्य करत आहेत कारण खूप साऱ्या रहस्यांचा उलगडा ह्या भागातून होऊ शकतो.
अशा निर्मनुष्य ठिकाणी जाणारी लोकं खूपच उत्साहात असतीलच असे नाही कारण परत येतील किंवा नाही याचीही खात्री नसते. अनोळखी रस्त्यावरून जाताना देखील जर आपण घाबरतो तर अशा ठिकाणी जाताना तर...
ज्यावेळी ही पूर्ण टीम जायला निघाली होती त्यावेळी ह्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी आणि योग्य तयारी झाली आहे किंवा नाही याच्या निरीक्षणासाठी तिथे हजर होते प्रत्यक्ष डॉक्टर अब्दुल कलाम. त्यांनी तेथील प्रत्येकाचे मनोबल तर वाढवले पण त्याचबरोबर आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी देखील प्रेरित केले. डॉक्टर कलामांचे शब्द ह्या व्यक्तीच्या मनात इतके खोलवर रुजले होते की त्या मिशनच्या एवढ्या वर्षानंतर देखील ते त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होते.
त्यापूर्वी मला अब्दुल कलाम म्हणजे एक शास्त्रज्ञ आणि भारताच्या पृथ्वी मिसाईल मध्ये त्यांचा एक महत्वाचा वाटा आणि त्यानंतर राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा साधेपणा, बस्स एवढीच माहिती होती. पण त्यादिवशीच्या सेमिनार नंतर मला जाणवले की त्यांचे व्यक्तिमत्व कोणत्यातरी एकाच कामासाठी ओळखले जाणे शक्यच नाही. अशा विशाल कर्तुत्वाच्या माणसाबद्दल तेव्हापासून कृतज्ञतेची आणि सन्मानाची भावना निर्माण झाली. खरेतर तोपर्यंत मी त्यांना ऐकलेलेही नव्हते किंवा त्यांची कोणतेही पुस्तक देखील वाचले नव्हते तरीदेखील. अशी व्यक्ती जिने आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या उत्तुंग प्रगतीसाठी वाहिले होते. आम्ही नशीबवान आहोत की आमच्या पिढीने त्यांचे विचार आणि आचार प्रत्यक्ष अनुभवले.
आज त्यांच्यासाठी हळहळणारी माणसे कोणत्या एका प्रांतातली, जातीची किंवा धर्माची नाही आहेत तर संपूर्ण भारतदेश त्यांच्या मृत्यूने शोकाकुल आहे.
फक्त ८३ वर्षाचे असा तरुण जो कुठेतरी अंथरुणावर खिळून मृत्यूची वाट न पाहता आपल्या आवडीच्या कामात गुंतलेला आणि ते करत असतानाच मृत्यूने त्यांची परवानगी घेतली. परवानगीच कारण त्यांचे कर्तुत्व होतेच तेवढे महान.
Life Skills Trainer & Mentor



