Blog on Time Management

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही मिळे…परंतु मोकळा वेळ

सध्याच्या धावपळीग्रस्त आयुष्यात मोकळा वेळ मिळणे कठीण आहे असे म्हणण्यापेक्षा ती एक दुर्लभ आणि चैनीची वस्तू झाली आहे असे म्हणणे जास्त सोयीस्कर ठरेल. दुर्दैव म्हणजे आपल्याकडे कितीही पैसा असला तरीही ही चैन नाही परवडत आपल्याला. कदाचित अगदी टाटा-बिर्ला किंवा अंबानीला देखील ही चैन परवडत असेल किंवा नाही कुणास ठाऊक. पण मोकळा वेळ हे कुणालाही सहसा न मिळणारा राजविलास आहे हे मात्र वादातीत सत्य आहे.

मोकळा वेळ मिळणे आणि तो मौजमजेसाठी वापरणे म्हणजे केवळ अशक्य. आणि तोही स्वतःसाठी, स्वतःच्या समाधानासाठी वापरणे म्हणजे तर दुर्लभाहून दुर्लभ गोष्ट. अशा व्यक्तींचा खरेतर जाहीर सत्कार व्हायला हवा. त्यांनी ही संपन्नता मिळविली तरी कशी ह्यावर खरेतर अगदी खोलात जाऊन संशोधन व्हायला हवे परंतु ‘हाय रे किस्मत’ अशा लोकांवर सर्रासपणे टीकेची झोड उठविली जाते. का? तर ते आपला अमुल्य वेळ फुकट घालवताहेत. ह्या वेळेचा वापर करून ते आयुष्यात कितीतरी पुढे जाऊ शकतात पण त्या ऐवजी ते ऐषो-आरामात बुडून किंवा टंगळमंगळ करून पार आपल्या आयुष्याचाच वाटोळे करून टाकताहेत. माणसाने कसं आयुष्यभर कार्यमग्न असायला हवे. काय मिळणार असे वेळेचं वाटोळे केल्याने.

वेळेचा किती मोठा अपमान आहे हा? ती अमेरिका इंग्लंड सारखी राष्ट्रे बघा. किती पुढे गेलीत, वेळेचा संपूर्ण वापर करून. नाहीतर आम्ही. जळले भाग्य आमचे आम्ही अजूनही इथेच किड्यामुंग्यांप्रमाणे धडपडतोय. ना धड प्रगती होत आहे ना कुठल्या गोष्टीचं समाधान मिळतेय. मेले ते ‘अच्छे दिन’ तर दुरदुरपर्यंत कुठेच दिसत नाही आणि त्यात ही लोकं वेळ फुकट घालवताहेत. कसं करू शकतात हे असं? आता मजा करून वेळ फुकट घालवताहेत पण एक दिवस ती वेळच त्यांना अद्दल घडवेल मग बसतील आयुष्यभर रडत. अशाच कामचोर लोकांमुळेच आमचा देश एवढा मागासलेला आहे. नाही का?

खरोखर !!! आम्ही हाच विचार करत असतो लोकांबद्दल? की आमच्या स्वतःच्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कुठेतरी एक सुप्त विचार दडलेला असतो की हा मोकळा वेळ आमच्याही आयुष्यात असावा. किंबहुना कामाचा तर तिथे लवलेशही नसावा; संपूर्ण आयुष्य कसं स्वच्छंदीपणे आणि मनसोक्त जगता यावं. जे मनात येईल ते त्या त्या वेळी करता यावं असे आम्हालाही वाटतं की राव. पण...

आम्ही वास्तववादी माणसे आणि आम्हाला पक्कं ठाऊक असते की हे शक्य नाही आहे. त्यामुळे स्वप्नांच्या दुनियेत मग्न न होता आम्ही कामाला लागतो आणि वास्तववादी स्वप्न पाहतो. जसे, माझ्याकडे भरपूर पैसे येणार आणि मग मी गोव्याच्या चौपाटीवर रखरखत्या उन्हात त्या वाळूमध्ये छत्री रोवून निसर्गाचं सौंदर्य न्याहाळत शांतपणे पडून राहीन. किंवा एखाद्या बर्फाच्छादित प्रदेशात बर्फामध्ये लोळेन वगैरे वगैरे. काय धमाल आयुष्य असेल ते; कारण जर विचार करूनच एवढं मस्त वाटतेय तर प्रत्यक्षात अनुभवताना काय धमाल येईल.

दुर्दैव असे की, बहुतेकांच्या बाबतीत ही स्वप्ने कायमची स्वप्नेच राहतात. काहींना जरी ती पुरी करता आली तरीही बहुतेकजण त्याचा आनंद स्वप्नात रंगवल्याप्रमाणे संपूर्णतः घेतातच असे नाही. कदाचित काहीजण शरीराने तिथे नक्कीच असतात पण मनाने मात्र भलतीकडे असण्याची शक्यताच जास्त. एखाद्या समस्येकडे लक्ष किंवा उद्या कामावर गेल्यावर पुन्हा तोच रामरगाडा ठरलेला म्हणून दुःखी किंवा कमावलेले पैसे असेच संपवले तर आयुष्याच्या उत्तरार्धात पैसे आणणार तरी कुठून? वगैरे वगैरे.

तर कुणी आयुष्यभराची पुंजी डॉक्टरांच्या मागे खर्च करतोय? जसं आयुष्यभर मेहनत म्हातारपणी ह्या डॉक्टरांना पोसण्यासाठीच केली होती. असं का? तर काम करताना त्या पैशाच्यामागे पळताना शरीराकडे लक्षच नाही दिले. मन तर नेहमीच मारत आलोय आम्ही. जर आयुष्याच्या उत्तरार्धात हे सत्य असेल तर आपण आयुष्य जगलो तरी कसे? कुणासाठी किंवा कुणाला दाखविण्यासाठी?

जसे वाळूच्या कणातून तेल काढण्यासाठी त्याला रगडावे तसेच स्वःताला रगडले पण निष्पन्न काय झाले? का घडते हे सर्व? म्हणे वाळूचे कण रगडीता तेलही मिळे. पण मोकळा वेळ?

आयुष्य निघून जाते पण कित्येकांना कळतच नाही की त्यांना आयुष्यातून नक्की काय हवं होतं? नाही का?

साधारण २५/३० वर्षांपूर्वी वाचलेली गोष्ट तुमच्यापुढे मांडत आहे. पटली तर बघा.

एक अमेरिकन उद्योगपती छोट्याशा गावात एका फुलांच्या दुकानात फुलांचा गुच्छ घेण्यासाठी जातो. कोणते फुले हवीत ते सांगून तो ती पटकन मिळतील अशी अपेक्षा करतो.

परंतु तो फुलवाला मस्त आरामात तो गुच्छ बांधत असतो. शेवटी वैतागून तो उद्योगपती त्याला म्हणतो की अरे किती हळूहळू काम करतो आहेस तू. एवढी चांगली फुले आहेत तुझ्याकडे पण तुला बघून असे वाटत नाही की तुझा धंदा काही व्यवस्थित होत असेल. जर जास्त मेहनत घेतलीस, पटापट कामे केलीस तर संपूर्ण अमेरिकेत तुझ्या दुकानांचे फ्रांचायजी असतील. त्यामुळे तुझे खूप नाव होईल आणि खोऱ्याने पैसा कमवशील.

त्यावर त्या दुकानदाराने शांतपणे विचारले मग काय होईल? त्यावर तो उद्योगपती उतरला, मग तू अशाच एखाद्या शांत ठिकाणी छोट्याश गावात एका सुंदरशा झुळझुळत्या नदीकिनारी  घर घेशील. मस्त झोप काढशील. तुझ्या मुलांबरोबर खेळशील, बायकोबरोबर फिरायला जाशील. मस्त गप्पागोष्टी करशील. गावात चक्कर मारून मित्रांना भेटून त्यांच्याबरोबर वेळ घालवशील. लोकांच्या सुखदुःखाची तुला जाणीव होईल. मस्त गिटार वगैरे वाजवशील, नाचशील, चांदण्याखाली झोपशील. आयुष्य काय मस्त सुखाने भरून जाईल.

हे सगळं ऐकून तो फुलवाला म्हणाला जर हेच करायचं असेल तर त्यासाठी मी माझ्या आयुष्याची एवढी वर्षे फुकट का घालवू? मी आताही तेच तर करतोय.

आयुष्यात मोठी स्वप्ने पाहू नका असे तुम्हाला कुणीही सांगणार नाही पण जे कमावलं त्याच आस्वाद तर घ्या. आणि तो आता नाही तर कधी घेणार. वयाच्या तिशीत जे करायला हवं ते साठीत करणार काय?

आपल्याला नेहमीच वाटतं, कधीतरी तो एक दिवस येईल ज्यावेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल. आणि हे अगदी खात्रीने आपण लोकांना पटवून देत असतो. भविष्य किती सुखकर असेल ह्याची ग्वाही देत असतो. असेलही कदाचित पण कोण जाणे भविष्याच्या कुशीत काय दडले आहे ते? तुम्ही जाणता का तुमचे भविष्य?

काही दिवसांनी मुलांच्या परीक्षा संपतील त्यामुळे ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा बेत आखायला हरकत नसावी. कुटुंबाला अचंबित करायला तर काहीच हरकत नसावी. आणि जर ते आश्चर्यचकित होण्याच्या पलीकडला असतील तर कधीतरी स्वतःला खुश करायला काय हरकत आहे? कधीतरी स्वतःसाठी एवढं तर नक्कीच करू शकतो आपण. नाही का? नव्या आयुष्याची नवी सुरुवात.

आणि हो त्यासाठी काम बिघडवण्याची किंवा कुणालाही दुख:वायची तर अजिबात गरज नाही आहे. तर हे सहज शक्य आहे कुटुंब, कार्यालय आणि स्वतः ह्या तिघांचा योग्य समन्वय साधून. हे जर शक्य असेल तर नक्की करा आणि जर शक्य नसेल तर शक्य करून दाखवाच. कारण आज नाही तर कधीच नाही कारण नंतरला नेहमीच अंतर असतं.

Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Posted in Inspirational, Motivational, Planning, Vel Anmol.

One Comment

Leave a Reply