आपत्ती व्यवस्थापन ते फॉर्च्युन ५०० कंपनी

२४ जुलै १९८९ या दिवशी मुसळधार पावसाने आणि १००/१५० किमी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने मुंबई ते कोकणाला अक्षरशः झोडपून काढले होते; ज्यात कित्येक लोकं मृत्युमुखी देखील पडले होते.

नवी मुंबईतील अनेक केमिकल कंपन्या असणाऱ्या पाताळगंगा परिसरात देखील रात्रभर ८/१० तास सतत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण विभाग पाण्याखाली गेला होता. पाताळगंगेतील त्या शंभरेक कंपन्यांमध्ये साधारणपणे २०० एकरमध्ये पसरलेला एक युनिट रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचा सुद्धा होता.

निसर्गाचे असे रौद्ररूप धारण करून रात्रभर तांडव करून सुरू असताना अगदी पहाटेच रिलायन्सच्या त्या युनिटमध्ये सूत्र हलायला सुरुवात झाली होती आणि अवघ्या अर्ध्या-एक तासातच संपूर्ण युनिट बंद करण्यात आले होते. ती आणीबाणी हाताळण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्वच प्रकारच्या अधिकाऱ्यांचे मिळून एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पुढील दोनतीन दिवसातच अशी आपत्ती हाताळणारे कुशल कामगार जगभरातून अद्यावत तंत्रज्ञान आणि मशिनीसकट तिथे पोहोचले होते आणि पाहता पाहता पुराच्या दिवसापासून साधारणपणे १५ दिवसातच ते अवाढव्य पसरलेले युनिट पुन्हा एकदा सुरु करण्यात आले होते.

आजूबाजूचे युनिट्स किती दिवसांनी चालू झाले किंवा नुकसान सहन न झाल्याने त्यातले किती कायमचे बंद पडले कुणास ठाऊक पण रिलायन्सने मात्र ही किमया साधली होती कारण ही अचानकपणे उद्भवलेली आपत्ती हाताळण्यात ते कुठेही कमी पडले नव्हते.

आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) करण्यासाठी देखील एक यंत्रणा कायम सज्ज असावी लागते आणि जर ती अस्तित्वात नसेल तर ताबडतोब कृती करून ती अस्तित्वात आणावी लागते. तिचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’ आणि त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते.

मी मार्च १९८९ मध्ये कुरियर कंपनी चालू केली होती त्यामुळे त्या २४ जुलैच्या पावसाची झळ ट्रेन वगैरे बंद झाल्यामुळे इतरांना लागते त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त लागली होती कारण पावसाचे कारण देत कुरियर कंपनीला डिलिवरी थांबवता नाही येत मग ती कंपनी नवीन असो अथवा जुनी. नवीन होतो त्यामुळे विशेष काळजी आणि परिश्रम घ्यावे लागले होते. असो.

मी ऐकलेल्या माहितीप्रमाणे रिलायन्सच्या धीरूभाई अंबानींनी आपल्या मोठ्या मुलावर म्हणजे मुकेश अंबानीवर ती आपत्ती हाताळण्याची जबाबदारी सोपवलेली होती आणि त्यासाठी त्यांनी दहा दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. दहा दिवसात तर नाही पण साधारणपणे पंधरा दिवसात त्या पुराच्या पाण्यात पाय रोवून सर्वांच्या अथक मेहनतीने तो प्लांट पुन्हा एकदा धडधडू लागला होता.

ती एकमेव आपत्ती होती असे नाही अशी कितीतरी संकटे त्यांनी हाताळली असतील आणि माझ्या माहिती प्रमाणे अशीच आपत्ती काही वर्षानंतर रिलायन्सच्या गुजरात मधील जामनगरच्या प्लांटमध्ये आली होती आणि त्यावेळी देखील त्यांनी ती यशस्वीरीत्या हाताळली होती आणि तीही काही दिवसातच. म्हणजेच पूर्वी पाताळगंगा प्लांटमध्ये अनपेक्षितपणे उद्भवलेली आपत्ती यशस्वीरीत्या हाताळणे हा फक्त नशिबाचा भाग नव्हता तर एक शिस्तबद्धता त्यात होती आणि ती शिस्तबद्धता कुठेही न हरवता टिकून होती.

माझ्या लहानपणी जर कुणी मोठमोठ्या फुशारक्या मारत असेल तर त्याला म्हटले जाई की हो माहिती आहे खूप मोठा टाटा–बिर्ला आहेस तू ते. त्यावेळी अंबानीचे तर कुठे नामोनिशानच काय तर ओझरता उल्लेखही नव्हता. आता देखील टाटा-बिर्ला त्यांच्या ठराविक किंवा पूर्वीपेक्षा जास्त वेगाने अजूनही पुढे जाताहेत पण त्यांच्यापेक्षा वेगाने जर कुणाची वाढ होत असेल तर ती अंबानीच्या रिलायन्सची.

रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च २०२१ पूर्वी कर्जमुक्त होण्याचे ध्येय ठेवले होते पण झाले जून २०१९ मध्येच आणि जिथे पूर्ण जग कोरोनामुळे धडपडत होते तिथे रिलायन्स जीओने मोठी गुंतवणूक मिळवून स्वतःला कर्जमुक्त केले. काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेली रिलायन्स जीओ ही कंपनी पण थोड्याच अवधीत एवढ्या उंचीवर पोहोचते की जिथे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मोठमोठ्या कॉर्पोरेट अक्षरशः रांगा लावताहेत.

कसं शक्य झाले हे सर्व?

रेसकोर्सवर शर्यतीत पळणाऱ्या त्याच घोड्यावर लोकं पैसे लावतात जो यापूर्वी काहीवेळा तरी किंवा सतत जिंकत आला आहे, नाही का?

जिंकणाऱ्या घोड्याची काळजी घेण्यासाठी आणि त्याच्या शारीरिक मजबुतीसाठी विशेष खाण्यापिण्याचे प्रयोजन असावे लागते आणि त्या सर्वांची वेळही ठरलेली असते म्हणजे प्रत्येक गोष्ट एका ठराविक नियोजनानुसारच घडत असते. नियोजन नसेल तर एखादवेळ नशिबाने तो घोडा शर्यत जिंकेलही पण तीच किमया कायम साधने त्याला शक्य नसेल.

तो घोडा महत्वाचा तर आहेच पण तेवढाच महत्वाचा असतो त्या घोड्याला हाताळणारा जॉकी कारण तो घोडा एकट्याने ठराविक वेळेत स्वतःहून त्या गंतव्यावर पोहोचणे कठीण. तो तेव्हाच पोहोचू शकेल जेव्हा जॉकी त्याच्यावर स्वार होऊन त्याला योग्य रीतीने हाताळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा त्या दोघांमध्ये एकवाक्यता असेल तेव्हाच. एकवाक्यता नसेल तर जिंकणे हे केवळ नशिबाचाच भाग असू शकतो आणि अशा घोड्यावर किंवा जॉकीवर कुणी पैसे नाही लावत कारण प्रत्येकाला काहीही झाले तरीही फक्त आणि फक्त फायदाच हवा असतो; नुकसान तर कुणालाच नको असतो. बरोबर आहे ना?

तुम्हाला हव्या असलेल्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला काय काय करावे लागते त्याचा विचार करून बघा मग ह्या गोष्टीचे गांभीर्य जाणवेल तुम्हाला. जर आर्थिक शिस्त नसेल तर गुंतवणूक मिळणे अशक्य असेलच पण एखाद्या बँकेकडून किंवा अगदी वैयक्तिक कर्जही न मिळण्याची नामुष्की येते कित्येकदा आमच्यावर.

पण जर का तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असाल तर वर्तमानात जरी नुकसान होत असेल तरीही भविष्यात फायदा मिळण्याची शक्यता दिसत असल्यास लोकं आणि बँका उभ्या राहतात तुमच्यासाठी.

जर शिस्त नसेल तर जेवढे दिवस किंवा वर्ष तुम्ही उद्योगात टिकलेले असाल तो तुमच्या कर्तुत्वाचा कमी आणि नशिबाचाच भाग जास्त असेल.

एखादे काम एका शिस्तबद्ध पद्धतीने सातत्याने करत राहिलो तरच त्यात लयबद्धता येते. फक्त एकदाच किंवा जेव्हा मन करेल तेव्हाच केल्याने ती येण्याची सुतराम शक्यता नसते. शिस्त तशीही एका दिवसात नाही लावता येत, तर त्यासाठी सातत्याने ती कामे करत राहणे गरजेचे असते, नाहीतर महिन्यातून एकदा व्यायाम कराल आणि तरीही वाढलेले पोट कमी होत नाही म्हणून तक्रार करत बसाल.

तसं पाहिले तर तक्रार करणे खूप सोपे असते पण शिस्तबद्ध पद्धतीने एखादे काम सातत्याने वर्षानुवर्षे करत राहणे मात्र खूपच कंटाळवाणे. जे हे कंटाळवाणे काम विनातक्रार वर्षानुवर्षे सतत करत राहतात त्यांच्या पायाशी यश लोटांगण घालते.

मी सुरवातीलाच रिलायन्सने ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती हाताळली त्याचे उदाहरण दिले आहे आणि त्यात हेही नमूद केले होते की त्या आपत्तीत कित्येक कंपन्या कायमच्या बंद देखील पडल्या असतील. पण रिलायन्स नुसती तरलीच नाहीतर जागतिक स्तरावरील फॉर्च्युन ५०० म्हणजे पहिल्या ५०० उद्योगात समाविष्ट आहे. त्यांच्या कार्यप्रणालीवर मते मतांतरे असतील पण कमी कालावधीत तो पल्ला गाठणारी ती एक भारतीय कंपनी आहे हे देखील तेवढेच खरे. आणि कोणतीही कंपनी फक्त नशिबाच्या जीवावर किंवा कुणाला फसवून वगैरे एवढा लांबचा पल्ला नाही गाठू शकत तर ते शक्य होते फक्त आणि फक्त ध्येय निश्चित करून त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःला झोकून दिल्यामुळेच.

त्याच बरोबरीने फक्त खूप सारी माणसे हाताखाली कामाला ठेवून नाही चालत तर त्यांच्या योग्य गुणांचा आणि योग्य ठिकाणी वापर करता येणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्यासाठी त्या गुणांची पारख पण तर करता यायला हवी, नाहीतर समोर गुणांची खाण असेल आणि आम्ही मात्र त्यांना नको त्या ठिकाणी वापरून ते फुकटच घालवणार. नाही का?

कदाचित ती हिऱ्याची चमक धीरूभाईंनी नक्कीच हेरली असेल आणि त्या हिऱ्यावर पैलू पडायचे काम त्यांनी अशा आपत्तीच्या प्रसंगाचा वापर करून केली असावी.

आणि तसेही सर्वांनाच धीरूभाई अंबानींचे मार्गदर्शन नाही लाभत आणि सर्वच मुकेश अंबानी सारखे आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाला स्वतःच्या बुद्धीची जोड देऊन आयुष्यातील भल्यामोठ्या संकटांना पुरून उरतातच असेही नाही किंवा एखाद्या संकटाला संधीत रुपांतर करू शकतातच असे नाही पण जे करतात ते साम्राज्य उभे करतात.

आणि हो आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी दैनंदिन आयुष्यात शिस्त असावी लागते, नाहीतर दैनंदिन आयुष्याची माती झालेली असताना नैसर्गिक आपत्तीचा डोंगर पेलवणार तरी कसा?

Life Coach | Business Mentor | Corporate Trainer | Time Management Coach | Relationship Coach | Professional Mentor | Soft Skill Trainer | Life Skills Trainer | Searchlight Within |

Shailesh Tandel

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in नियोजन.

Leave a Reply