मी जसा आहे त्याप्रमाणे कसा घडलो?

सकाळी झोपेतून उठलो तेच मुळी रडत कारण अचानक सकाळी सकाळीच बाबांच्या मृत्यूची बातमी घेऊन हॉस्पिटलमधून वार्डबॉय आला होता. इंग्रजी तारखेप्रमाणे २२ नोव्हेंबर १९७८ आणि हिंदू तिथीप्रमाणे देवदिवाळी नंतरचा सातवा दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण सप्तमी. तुळशी विवाहाच्या सातच दिवसांनी ४० वर्षांपूर्वी माझ्या बाबांना देवाज्ञा झाली आणि आम्ही धडाक्यात साजरी केलेली दिवाळी अचानक संपली.

बाबा डॉक्टरकडे कधीच जात नसत, पण ज्यावेळी गेले ते परत न येण्यासाठीच. आदल्या दिवशी बाबांच्या छातीत कळ येत होती म्हणून त्यांना इस्पितळात भरती केले होते पण त्यांचा मृत्यू ओढावेल ही शक्यता नव्हतीच आणि तेवढे वय देखील नव्हते त्यांचे पण ते गेले अगदीच अचानक. क्षणात सर्वकाही संपले आणि आम्ही पोरके झालो. त्यावेळी माझे वय होते फक्त साडे नऊ वर्षे पण दुर्दैवाने त्या वयातच मी खूप लवकर मोठा झालो.

कुणावरही जबाबदारी थोपता येत नाही किंवा कितीही समजावून सांगितले तरी लोकं जबाबदारी घेतीलच याची शाश्वती नसते. जबाबदारीची भावना मनातूनच निर्माण व्हावी लागते आणि त्यासाठी आत्मनिरीक्षण गरजेचे तर असतेच पण त्याचबरोबर गरजेचं असतं संवेदनशील असणे तरच जबाबदारीची जाणीव होते.

आई एकटीच कमावणारी त्यामुळे तिच्याकडून काही मागायला मला स्वतःलाच लाज वाटायची त्यामुळे खूप लवकर त्या जबाबदारीची भावना निर्माण झाली आणि कमवायला लागलो. शिक्षण दुय्यम स्थानी आले आणि अस्तित्व टिकवण्याची आणि आयुष्यात पुढे जाण्याची धडपड प्रथम स्थानी. पण ह्या सर्व धडपडीतून सावरण्याचा, पुढे जाण्याचा मार्ग माझ्यासाठी बाबांनीच ते हयात नसतानाही आखून ठेवला होता. जो मला त्यावेळी कधीच जाणवला नाही पण आता मागे वळून बघताना त्याची जाणीव प्रखरपणे होतेय.

घरामध्ये वावरणारी खूप सारी माणसे त्यामुळे बाबांशी संपर्क खूपच कमी. काही मोजक्याच आठवणी पण जतन करून ठेवलेल्या आणि आयुष्यातला तो बहुमोल ठेवा. बाबांकडून खूप काही शिकलो आणि त्यांचे खूप सारे गुण अनपेक्षितपणे माझ्यात उतरले. बाबा जेमतेम ८ वर्षांचे असताना त्यांचे बाबा वारले त्यामुळे ते कामासाठी मुंबईत आले आणि त्या वयात पैसे कमावून गावी आपल्या आईला ते पैसे पाठवत असत. मेहनत करत राहिले आणि एकवेळ अशी आली की गावकरी त्यांच्या नावापुढे शेठ लावायला लागले. दुर्गाजीचा दुर्गाशेठ झाला होता स्वतःच्याच कर्तुत्वावर. कुणालाही न फसवता उलट कुणाच्याही मदतीस नेहमीच तत्पर त्यामुळे विनम्र देखील, पण जर भडकले तर कुणाच्या बापालाही न ऐकणारे.

शिकलेले नव्हते पण सही करता यायची आणि त्याचबरोबर त्यांना पंचांग बघता यायचं अगदी अचूक. आमच्या सर्वांची फक्त जन्मतारखेची नोंदच नाही तर जन्मवेळ देखील अचूक नोंद करून ठेवली त्यांनी. आता भल्याभल्यांना एवढी साधी गोष्ट जमत नाही पण त्यांच्या नोंदी मात्र पक्क्या असायच्या.
सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायची सवय त्यामुळे रोज सकाळी लवकर अंघोळ उरकून देवळात जायचा शिरस्ता. उपासतापास तर नेहमीचेच. एकादशीचा उपास पण कडक. दिवसभर काहीच खायचं नाही आणि उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. देवाच्या पालखीला मग ती गावची असो वा मुंबईतली ते जातीने हजर असायचे. खालूचा बाजा होता आमच्याकडे ज्यातून ढाकुमाकुम ढाकुमाकुम असा नाद निघायचा आणि ते तो जोशात वाजवायचे.

बायकोसमोर आवाज चढविणे नाही की मुलांवर उगाचच रागावणे नाही प्रत्येक गोष्ट संयमाने हाताळणार. दारू प्यायचे पण गटारात लोळण्याचा पराक्रम कधीच नाही केला. जेव्हा पियाचं असेल तेव्हा बाटली घरी घेऊन यायचे आणि पियाल्यावर जेवून गुपचूप झोपून जायचे. ती दारू देखील दोन वर्षांपूर्वी सोडली ती कायमचीच. त्यानंतर कधीही हात लावला नाही दारूला, दिलेला शब्द तंतोतंत पाळला.

बाबा माझ्याही दोन वर्षे अगोदर पोरके झाले होते आणि त्यांनी हिमतीने सर्वकाही उभे केले हे आईकडून नेहमी ऐकायचो. तिने त्यांच्याबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी मनामध्ये खोलवर कुठेतरी कोरल्या गेल्या. त्यामुळे एखद्या कामाचे मनाप्रमाणे फळ नाही मिळाले किंवा कितीही अपयश आले तरीही तक्रार करत न बसता मेहनत वाढवून हवे त्याचा पाठपुरावा करायची सवय जडली. कारण तक्रार करून तसेही काही मिळत नाही.

बाबांनी कोणत्याही कामाला कमी लेखले नाही आणि त्यांचे आवडते कपडे म्हणजे सदरा आणि लेंगा. कोळी रुमाल लावायला त्यांना कुठलीही लाज वाटली नाही. त्यामुळे नको त्या गोष्टीत लाजत किंवा आपल्या जातीला काळिमा फासत कधी बसलो नाही उलट अभिमानाने सांगतो की मी कोळी आहे.
मी नेहमीच सांगतो की तुम्ही स्पायडरमॅन, सुपरमॅन पहिला असेल, तसा मी फिशरमॅन कारण मी कोळी समाजाचा आहे.

बाबांनी दारू सोडली होती त्यामुळे मी देखील दारू सिगरेटला कधीही स्पर्श केला नाही आणि गरजही वाटली नाही. मित्रांना किंवा कस्टमरला दारू पाजली पण स्वतः कटाक्षाने टाळले कधी नम्रपणे तर कधी स्पष्टपणे नाकारून.

घराच्या बाजूलाच शनैश्वराचे मंदिर त्यामुळे लहानपणापासून ज्या देवाला लोकं घाबरून दूर पळतात त्याचं देवाचे नित्य नामस्मरण करण्याची सवय जडली ती आईबाबां मुळेच. अध्यात्माची आवड आणि त्यासाठी वेळ काढण्याची सवय त्यांच्याचमुळे. उपवासात देखील तीच परंपरा.

ते नोंदी व्यवस्थितपणे हाताळायचे आणि मी लोकांना वेळ व्यवस्थापन शिकविण्यापर्यंत मजल मारली. मेहनतीत कधी कमी पडलो नाही आणि सकाळी उठण्याची किंवा झोप पूर्ण न होण्याची तक्रार कधीच झाली नाही. काही वर्षांपूर्वी फक्त एका गोष्टीची कमी वाटायची आणि ती म्हणजे सकाळी बरोबर ब्रम्ह्मुहुर्तावर उठणे पण आता ती कसार देखील पुरी झाली कारण आता माझा दिवस सकाळी ४.३० ला सुरु होतो.

काही गोष्टी मात्र काम चालविण्यापुरते आल्या जसे पोहणे. बाबा पट्टीचे पोहणारे होते त्यामुळे गणपती विसर्जनाला खोल पाण्यात बाबाच उतरायचे आणि चाळीतल्या सर्वच म्हणजे साधारणपणे ७/८ गणपतींचा विसर्जन तेच करायचे. बाकीचे कठड्यावरून गणपती देण्याचं काम करायचे.
काही गोष्टींमध्ये बाबांबद्दल तक्रारीही होत्या पण त्या जाणत्या वयाबरोबर पूर्णपणे नाहीशा झाल्या.

रोज देवासमोर प्रार्थना करताना मी बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना आवर्जून करायचो आणि एकेदिवशी ती प्रार्थना करत असताना मनात एक विचार आला की कधीकधी काहीही कारण नसताना आपण आनंदी होतो तर कधी दुःखीकष्टी. असेतर नाही की आपल्या पूर्वजन्मातील नातेवाईक आपल्याबद्दल चांगले किंवा वाईट बोलतात त्यावेळी न जाणतेपणी आपल्यावर त्याचा परिणाम होतो व आपण आनंदी किंवा दुःखी होतो. ह्याचं कोणतेही प्रमाण नाही आहे की तसं होतंच पण तो विचार मनात आल्यापासून रोज मी कृतज्ञता व्यक्त करतो माझ्या सर्वच पूर्वजांसाठी.

दोन वर्षांपूर्वी आई देखील गेली आणि त्यापूर्वी २२ नोव्हेंबरलाच तिच्याबरोबर शेवटचे बोलणे झाले होते आणि त्यानंतर १३ दिवसांनी ती गेली. त्यानंतर मी पूर्णपणे अनाथ झालो पण कृतज्ञता दोघांसाठीही कारण बाबांनी जे केले ते प्रेरणादायी तर होतेच पण त्यचबरोबर माझ्या आईने माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने आकार दिला. मेहनतीत तीही कधीच कमी नव्हती की कधी फक्त डोक्यावर हात ठेऊन बसली नाही. नशिबाने माझ्या आईने बाबा वारण्याच्या दोन वर्ष अगोदरपासून मासे विकायला सुरुवात केली होती म्हणून तगलो तेही फक्त आणि फक्त आईच्या मेहेनतीवर.

आज बाबांसाठी वाडी काढताना आणखी एक विचार मनात आला की आपल्या शास्त्राप्रमाणे पुनर्जन्म आहे आणि त्यामुळे ते जिथेही असतील कदाचित तिथे त्यांना हे जेवण पोहोचत असावे. आपण इथे जेवण वाढत असताना कदाचित कुणीतरी तिथे त्यांना मायेने भरवत असेल, नाही का?

आईबाबा आभारी आहे मी तुमचा.

हे शरीर तुमच्याचमुळे  मिळाले आहे त्यामुळे मी ते करू शकतोय जे मला करायचं आहे. आयुष्यभर ऋणी असेन मी तुमचा. हे ऋण नाही फेडू शकणार मी काहीही केले तरीही.

कृतज्ञ आहे मी तुमचा, नेहमीच!

टाईम मॅनेजमेंट व रिलेशनशिप गुरु श्री. शैलेश तांडेल

Posted in प्रेरणादायी and tagged , .

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.