Samay Aur Samaz

पळा पळा पुढे कोण पळे तो…संयम ते काय असतं?????

२०१० मध्ये माझ्या मंत्र यशाचा कार्यशाळेत उच्च पदावर असलेले एक गृहस्थ आले होते आणि त्यांना जे मिळवायचं होतं त्यासाठी कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरली होती.काही वर्षांनी ते निवृत्त झाले पण कंपनीने त्यांचा अवधी वाढवून त्यांना पुन्हा सामावून घेतले होते आणि तो अवधी पूर्ण झाल्यावर कालांतराने त्यांनी आणखी काही ठिकाणी कामे केली पण वयोमानामुळे त्यांना तिथूनही निवृत्त करण्यात आले.
साधारणपणे २/३ वर्षांपूर्वी त्यांचा फोन आला होता आणि त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या संभाषणात मला वरील वृत्तांत कळला. त्यांच्याशी बोलताना जाणवले की ते एका जागी शांतपणे राहूच शकत नाहीत. त्यांना सतत काही ना काही करण्यात स्वतःला व्यस्त ठेवायचं असतं आणि आयुष्यात एवढं सर्वमिळवूनही ते आजही समाधानी नाहीत.

ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे रविवारी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लोकांनी उत्स्फूर्तपणे पाळला आणि त्याचबरोबर सायंकाळी ५ वाजता संपूर्ण देशभरातील बंधू-भगिनींनी स्वतःचा विचार न करता लोकसेवेसाठी वाहून घेतलेल्या प्रत्येकाचे शंखनाद, थाळीनाद व टाळ्यांच्या कडकडाटात आभारही मानले. खूप मोठा वर्ग असा होता ज्याने कृतज्ञता तर व्यक्त केलीच पण सोशल डिस्टेंसिंगचे भान राखून.

ह्यात गडबड जर कुठली झाली असेल तर काही अतिउत्साही लोकांनी याचे गांभीर्यच नष्ट करून  टाकले किंवा त्याचे गांभीर्यच त्यांना अजूनही कळलेले नाही. त्यामुळे लोकं रस्त्यावर उतरली अगदी विश्वकप जिंकल्याच्या अविर्भावात. दिवसभराच्या एकांतवासाचा त्यामुळे बट्ट्याबोळ झाला.

त्यांना मूर्ख ठरविणाऱ्या खूप साऱ्या पोस्ट आज सोशल मीडियावर फिरत आहेत पण मी नाही मानत त्यांना मूर्ख. कारण जर त्यांना मूर्ख म्हटले तर जे काल स्वतःच्या गाड्या काढून रस्त्यावर गर्दी करत होते त्यांच्यासाठी त्याहीपेक्षा मोठा शब्द राखीव ठेवावा लागेल.

अशी कोणती घाई होती किंवा असं कोणतं महत्वाचं काम करण्यासाठी ही लोकं बाहेर पडली होती?

जनता कर्फ्यूनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. सर्वच कार्यालये बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. रेल्वेसेवा ठप्प झाली. सरकारी आणि बँका ज्या महत्वाच्या सेवा आहेत त्यासाठी तुरळक उपस्थितीची सोय करण्यात आली मग एवढी गर्दी कशासाठी आणि का?

कोरोना व्हायरसचं गांभीर्य तरुणांना नसेल तर समजू शकतो पण सुशिक्षित व उच्चपदस्थ, उद्योजक वगैरेंना? कशासाठी पोटासाठी. अहो पण जीवनच नसेल तर?की इन्शुरन्सचे पैसे घरच्यांना लवकर मिळावेत असं वाटतं तुम्हाला? कदाचित मृत्यू नंतरचा खर्च कमी करायचा असेल तुम्हाला, बरोबर ना? कारण ह्या व्हायरसने मरण पावलेल्या लोकांना घरातलेही हात लावू शकत नाही आणि त्या घरात कुणी नातेवाईक तुमच्या कुटुंबाचे सांत्वन करायलाही येणार नाही, म्हणजेच बारावा- तेरावा काहीच नाही म्हणजे पैशाची बचतच बचत. असं हवं आहे का तुम्हाला?

ह्या व्हायरस बद्दल जनजागृती भरपूर झालेली आहे त्यामुळे त्याबद्दल कुणी अनभिज्ञ असण्याची शक्यता दुर्मिळ. अनभिज्ञ नसलो तरी तो काय आमचं वाकडं करणार आहे हा अतिआत्मविश्वास असण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे जसं बाकीच्या गोष्टींना गृहीत धरतो तसंच ह्यलादेखील. मरणाची भीती तर आम्हाला नक्कीच वाटते पण अमरत्वाचं वरदान आम्ही घेऊन आलोय त्याच अविर्भावात आम्ही वागतो.

सर्वसाधारणपणे लोकांचा ध्यास हा प्रत्येक गोष्ट लगेच आणि सतत मिळविण्याकडे असतो. थांबणे वा संयम ठेवणे हे आम्हाला कुणी शिकवलेलेच नसते. लहानपणासून आम्हाला फक्त आणि फक्त पळत राहायलाच शिकवलेले असते कारण जो थांबला तो संपला. त्यामुळे आम्ही नाही थांबू शकत कशासाठीच. थांबायला वेळ नसतोच आमच्याकडे मुळी आणि तसेही जर आम्ही थांबलो तर कुणीतरी आमच्या पुढे निघून जाईल ना? मरण तरी आमच्या अगोदर कुणाला का यावं? तिथेही आमचाच नंबर पहिलाच पाहिजे.

खरेतर घरातच काय कुठेही एका ठिकाणी राहूच नाही शकत आम्ही. ऑफिसमध्ये आम्ही काम करतो हा घरच्यांचा अंधविश्वास आणि घरात राहिलो तर त्यांना कळेल ना की आम्ही ऑफिसमध्येही दिवेच लावतो.

ऑफिसचा बंद दरवाजा बघून काम करायला नाही मिळाले म्हणून आम्ही चरफडत परत येऊ पण लॉकडाऊन आहे हे आम्हाला माहित होतेच ना पण तरीही आम्ही जातोच. एकमेकांच्या संपर्कात येऊन व्हायरस खूप मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो हे माहित असतानाही आम्ही लोकांपासून दुर नाही राहू शकत कारण आम्हाला कळपात राहायची सवय झाली आहे. एकांतात म्हणजे जेलमध्ये अशीच काहीशी आमची मानसिकता.
फक्त घोळक्यातच नव्हे तर स्वतःबरोबर देखील मस्त वेळ जाऊ शकतो आणि तो वेळ वापरून स्वतःला समजून घेता येतं हे आम्हाला माहीतच नसतं; बहुतेकवेळा आमच्या पालकांनाही.

कोणतीही मोठी संकल्पना राबविण्यासाठी घाईची नव्हेतर संयमाची गरज असते पण ती अशीच येत नाही तर तिची सवय लावून घ्यावी लागते.

असे फक्त मेसेजेस आम्ही फॉरवर्ड करतो पण स्वतःच्या आयुष्यात ते उतरवत नाही कारण आमच्यासाठी त्या अजूनही जुनाट आणि ऑऊटडेटेड संकल्पनाच आहेत आणि जोपर्यंत आमचे संस्कार आमच्या आयुष्याचा भाग बनत नाहीत तोपर्यंत एकांतात वेळ घालवणे म्हणजे वेळ फुकट घालवणे बस्स.

२०/२५ वर्षांपूर्वी लोकांच्या मनात ठसायला सुरुवात झाली होती की अध्यात्म वगैरे फालतू गोष्टी वयाच्या साठीनंतर म्हणजे एकंदरीत निवृत्त झाल्यावर, म्हणजे उतार वयात. तरुण वयात किंवा जोपर्यंत रक्त सळसळतंय तोपर्यंत काम करायचं आणि जेवढ्या लवकर होईल तितक्या लवकर जास्तीतजास्त पैसे कमवायचे. एकवेळ पाश्चात्य देशांप्रमाणे कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे लागले तरीही चालेल पण पहिला पैसा.

ज्याने आयुष्यात कधी अध्यात्माकडे लक्ष दिलेले नाही तो साठीनंतर तरी ते कसे मिळविणार? आणि जर अध्यात्म नसेल तर संयमही नसतोच आणि त्यामुळे म्हातारचळ लागण्याची शक्यताच जास्त.

जर हे आमचं भविष्य असेल तर आमचं वर्तमान ह्यापेक्षा आणखीन वेगळं कसं असू शकेल? त्यामुळे काल जो लोकांनी धिंगाणा घातला आणि आज ज्याप्रमाणे रस्त्यावर गाड्यांच्या रांगा लावल्या तो मूर्खपणा नाहीच मुळी. तीच आमची आयुष्य जगण्याची पद्धत आहे. त्यामुळे लॉकडाऊनने काही साध्य होणार नाही तर पूर्ण कर्फ्यूच आम्हाला बंदिस्त ठेऊ शकतो.

पंतप्रधानांनी केलेले आवाहन हे स्वयंशिस्तीसाठी होते. लोकांनी त्याला भरभरून प्रतिसादही दिला पण जर का आम्ही त्याचं कायम पालन केले असते तर लॉकडाउनवर निभावलं असतं; कर्फ्यूबद्दल कुणी अवाक्षरही काढलं नसतं.

कर्फ्यू तर आता लागलाच आहे पण भाजी मार्केट आज उघडी आहेत आणि त्यासाठी आम्ही तिथे गर्दी करतोय कारण मरणापेक्षाही आम्हाला खरेतर एकांताची भीतीच जास्त वाटतेय. नाही का?

उलटपक्षी ह्या संधीचा फायदा घेऊन थोडंसं एकांतात जा. थोडासा वेळ स्वतःबरोबर घालवा आणि तुम्हाला तुमची स्वतःची कंपनी आवडायला लागेल.

कुरियर कंपनी चालवताना मला खूपवेळा भारतभर फिरावं लागायचं पण विमानाने प्रवासापेक्षाही मला ट्रेनने २४/३६ तास प्रवास जास्त आवडायचा. त्यात नवीन ओळखी व्हायच्याच पण मला स्वतःबरोबर राहण्यासाठी आणि विचार करण्यासाठी उसंत मिळायची आणि त्याचाच फायदा मला माझ्या आयुष्यात करून घेता आला आणि दुसऱ्यांच्या आयुष्यातही खारीचा वाटा उचलता आला.

त्यामुळे तुम्हीच ठरवा संयम की फक्त घाई....जी सतत संकटात नेई?

Time Management Guru | Relationship Guru | Shailesh Tandel

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in Time Management, नियोजन, वेळ अनमोल.

2 Comments

Leave a Reply