भाषा, संस्कृती आणि सिनेमा: छुप्या अजेंड्याचे अनावरण

या अभ्यासपूर्ण लेखनाद्वारे भाषा आणि संस्कृतीचे संबंध जाणून घेऊन आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे रक्षण करण्याची गरज असलेल्या भाषेच्या जाणीवपूर्वक होणार्‍या अध:पतनाचा शोध घ्या. आपल्या परंपरा जपण्याचे महत्त्व जाणून घ्या आणि ज्या ऐतिहासिक व्यक्तींनी भाषेचे संरक्षण केले त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपली भाषा, चालीरीती आणि वारसा संरक्षित करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी अभिमानास्पद वारसा सुनिश्चित करण्यासाठी कृती करण्यास सुरुवात करा.

 

तीसेक वर्षांपूर्वी माझा एक बिहारी मित्र जो दिल्लीमध्ये लहानाचा मोठा झाला होता, मला भेटायला मुंबईत आला होता. दुपारी रेस्टोरंट मधून जेवून बाहेर पडल्यावर ऑफिसमध्ये परतताना माझ्याशी बोलण्यात तल्लीन असलेल्या त्या मित्राचा धक्का चुकून एका पस्तिशीतल्या स्त्रीला लागला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराने तो खजील झाला होता पण तरीही त्या गडबडलेल्या अवस्थेतही लगेचच त्याने हात जोडून त्या स्त्रीला म्हटले, “क्षमा किजीये माताजी”.

आम्ही दोघेही त्यावेळी साधारणपणे २४-२५ वर्षांचे होतो आणि हा पठ्ठा त्या पस्तिशीतल्या स्त्रीला ‘माताजी’ असे संबोधत होता. ते ऐकून त्या स्त्रीने एक विचित्र कटाक्ष त्यावर टाकला होता ते पाहून येणारे हसू मी चेहऱ्यावर दिसू न देता “सॉरी सॉरी” असे म्हणत त्याला घेऊन तिथून निघून गेलो होतो. हसू येण्याचे कारण त्याचे माताजी म्हणणे आणि ते ऐकल्यावर त्या स्त्रिच्या चेहऱ्यावरील विचित्र भाव जेवढे होते तेवढेच विचार काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर आलेल्या रामायण आणि महाभारत मालिकेचे होते. त्या मालिकांमुळे माताजी, पिताश्री, भ्राताश्री हे शब्द लोकांच्या अंगवळणी पडले होते आणि कित्येकदा मस्ती करताना ते शब्द सर्रास वापरले देखील जायचे. त्यामुळे त्या स्त्रीला तो तशीच मस्ती करतोय असे वाटणे देखील तेवढेच साहजिक होते. माझ्या घरी टीव्ही नसल्याने या दोन्हीही मालिका मी त्यावेळी पाहिलेल्या नव्हत्या त्यामुळे ही शब्दावली ऐकून माहिती होती पण त्यावेळचे पूर्णपणे रिकामे रस्ते नक्कीच अनुभवले होते.

माझे उत्तर भारताशी संबंध थोडे जास्तच दृढ होते आणि त्यातही दिल्लीला जाणेयेणे खूपच जास्त होते त्यामुळे तेथील संस्कृतीची तोंडओळख बऱ्यापैकी होती. मुंबई सारखी दिल्ली देखील देशातील सर्व राज्यांच्या लोकांनी भरलेली आहे पण तेथील हिंदीमध्ये एक वेगळेपण आहे. तेथील लोकांच्या बोलण्यात प्रत्येक शब्दानंतर ‘जी’ लावण्याची सवय तर अफलातून आहे. माताजी, पिताजी, मास्टरजी, वगैरे समजण्यासाखे आहे पण हांजी, ओकेजी, आणि बॉसला किंवा अन्य प्रतिष्ठित व्यक्तीला फक्त ‘सर’ असे न संबोधता त्याला देखील ‘सरजी’ म्हणणारे थोडेथोडके नव्हेत तर भरपूर आहेत. मुंबईत खूप सारे पंजाबी मित्र होते आणि आहेत त्यामुळे अगोदर वाटले होते की दिल्लीच्या संस्कृतीवर पंजाब्यांचा वरचष्मा असावा पण तसे नव्हते तर एवढे आक्रमण झेलूनही तेथील बोलीरीतीवर भारतीय संस्कृतीचा आणि मुल्यांचा पगडा अजूनही कायम आहे.

त्या स्त्रिच्या वयाचा विचार करून मी तिला सॉरी बहनजी नक्कीच बोललो असतो कारण मुंबई देखील अशा संस्कारांपासून अलिप्त नाही आहे. संपूर्ण भारतात आदर व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत आणि समोरच्याचे आदरातिथ्य करणे ही तर आमची पूर्वापार चालत आलेली संस्कृती.

जुनी आठवण एवढी तपशीलवारपणे लिहिण्याचे कारण म्हणजे बॉलीवूडचा नवीन पराक्रम ‘आदिपुरुष’. त्यातील दृश्य, कथा आणि प्रामुख्याने त्यातील भाषा. बुवा का बगीचा, कपडा तेरे बाप का, तेल तेरे बापका वगैरे वगैरे. त्यासाठी कारण काय तर हा चित्रपट नवीन पिढीसाठी आहे त्यामुळे भाषा आणि प्रसंग वगैरे त्यानुसारच आहे. नवीन पिढीला रामायण कळण्यासाठी अशा भाषेची खरंच गरज आहे की परंपरागत चालत आलेल्या भाषा त्यासाठी पुरेशा आहेत? पण काय आहे ना, या अशा भाषा आम्हाला शिकवण्याचा कायमस्वरूपी करारच केला आहे बॉलीवूडने.

लॉकडाऊन मध्ये घरबसल्या काही उद्योग नव्हता पण या कालावधीत रामायण आणि महाभारत या मालिका दूरदर्शनवर पुन्हा झळकल्या आणि पूर्वी टीव्ही नसल्याने ज्या मालिकांना मी मुकलो होतो त्या पाहायला मिळाल्या आणि खरंच धन्य झालो.

दिवसभर वेळच वेळ असल्याने दक्षिणेचे हिंदीत डब केलेले चित्रपट देखील पाहायला सुरुवात केली पण त्यात वापरलेल्या भाषेचा अक्षरशः उबग आला. लहान मुलांच्या हिंदी रुपांतरीत कार्टूनचीही तीच तऱ्हा. साधीसुधी हिंदीच्या ऐवजी तिथेही बम्बैय्या बोली त्यामुळे लहान मुलांवरही लहानपणापासूनच या गुंड भाषेचा भडिमार होत आहे. या सर्वाला कंटाळून ज्या भाषेत चित्रपट आहे त्याच भाषेत इंग्रजी सबटायटल्स सोबत पाहायला सुरुवात केली जेणेकरून असे टपोरी शब्द कानावर पडू नयेत. आणि हे प्रादेशिक चित्रपट पाहायला सुरुवात केल्यापासून हिंदीतील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच चित्रपट गेल्या तीन वर्षात पहिले आहेत मी.

तसेही ही जी बम्बैय्या बोली आहे ती कितीजण बोलत असतील? हा खरेतर संशोधनाचा विषय ठरेल कारण माझ्यासारख्या लाखो करोडोंचा त्या बोलीशी काहीही देणेघेणे नाही आहे. जर असतील तर थोडेफार टपोरी प्रकारात मोडणारे त्या भाषेचा उपयोग करत असतील पण ते देखील त्यांच्या मित्रांच्या वर्तुळात असताना कारण घरी गेल्यावर ते देखील सर्वसाधारण भाषेचाच वापर करत असणार. असे लोकं कदाचित हजारो किंवा काही लाखांमध्ये असतील पण त्यांच्यासाठी बनवलेले चित्रपट करोडोंच्या माथी का मारायचे आणि तेही पुढच्या पिढीला रामायण शिकवण्याच्या नावाखाली. आणि आम्ही ते का सहन करावे?

ज्या हनुमानाकडे प्रचंड शक्ती आणि बुद्धिमत्ता असूनही तो तेवढाच विनम्र होता आणि प्रत्यक्ष सूर्य ज्याचा गुरु आहे त्याच्या तोंडून अशा सडकछाप भाषेचा वापर? हे खरे आहे की दसऱ्याला रावणाचे दहन करतो आम्ही पण हेही तेवढेच खरे की तो महाज्ञानी ब्राह्मण होता. महादेवाच्या या परम भक्ताने वेदांना चाली लावण्याचे काम देखील केले आहे पण सीताहरण तेही साधूच्या वेशात आणि अहंकारामुळे त्याने स्वतःचाच शेवट करून घेतला. सोन्याच्या लंकेचा अधिपती त्यामुळे त्याच्या मुखातून अहंकार डोकावतो पण सडकछाप टपोरी भाषा नक्कीच नाही. आणि ज्याने शत्रूशी लढतानाही मर्यादांचे पालन केले त्या परमपूज्य पुरुषोत्तम रामाबद्दल मी काय लिहावे.

खरेतर संस्कृतीला बदनाम करण्यासाठी भाषेचा चांगला उपयोग होतो आणि त्यामुळेच कदाचित हैदराबादी हिंदीच्या आधारावर अस्तित्वात नसलेली बम्बैय्या बोली निर्माण करून बॉलीवूडने गेली कित्येक वर्षे आपल्या माथी मारली आहे. हैदराबादी माणसाला व्यवस्थितपणे हिंदी बोलता येत नव्हती आणि तीच अवस्था मराठी माणसाची देखील. त्यामुळे तोडक्यामोडक्या हिंदीत दोघेही बोलायचे पण त्यात टपोरीपणा नव्हता तर निरागसता होती. कदाचित त्या निरागसतेला टपोरीपणाची किनार जाणूनबुजून लावली गेली असावी अशा टुकार सिने निर्मात्यांकडून. कारण मनुष्य ज्याप्रमाणे बोलतो त्यावर त्याचे संस्कार आणि अखेरीस संस्कृतीचा परिचय होतो त्यामुळे भाषेवर घाव घातला की आपल्याला हवे तसे नवीन संस्कार करता येतात आणि त्यामुळे संस्कृती बुडविण्याचे पुढील काम सोपे होऊन जाते.

कोणत्याही संस्कृतीवर आक्रमण करायचे असेल तर त्या संस्कृतीची विटंबना करायला सुरुवात करायची. त्याची सुरुवात वापरण्यात येणाऱ्या भाषेची तोडमोड करून करायची आणि ते करताकरता त्या समाजाला संस्कार आणि संस्कृतीपासून दूर लोटून आपले इप्सित साध्य करायचे. गेली कित्येक दशके हेच विष हळूहळू गळी उतरवले गेले आहे आमच्या. फरक एवढाच आहे की पूर्वी हे सर्व लपूनछपून होत असे आणि आता सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली उघडपणे.

लोकांना त्यांच्या अराध्यापासून, भाषेपासून, संस्कारांपासून आणि संस्कृतीपासून दूर करून काय साध्य करायचे असेल या लोकांना? काहीतरी फायदा तर असणारच कारण फायद्याशिवाय कुणीही काहीही करत नाही.

आणि या सर्व प्रकारात सेन्सॉर बोर्ड कुठे आहे? बहुतेक त्यांना काहीच वावगं दिसले नसेल यात किंवा ते संवाद त्यांना संस्कारी वाटले असतील त्यामुळे कुठेही कैची न चालवता चित्रपटाच्या प्रदर्शनाला मान्यता दिली असावी त्यांनी. नाही का? जेवढे प्रश्न सिने निर्मात्यांना विचारायला हवेत, तेवढेच सेन्सॉर बोर्डालाही धारेवर धरायला हवे.

साधारणपणे साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी राजकीय कामकाजातून फारशी शब्दांच्या जागी मराठी शब्द वापरायला सुरुवात केली होती कारण ते दूरदृष्टी असणारे छत्रपती मातृभाषेचे महत्व जाणून होते आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी हे दाखवून दिले आहे.

पण इतिहासातून काही शिकायची तयारी तर हवी न आमची? आणि जर आता नाही नंतर कधीच नाही.

आपल्या भाषेची आणि संस्कृतीची जाणीवपूर्वक होत असलेली अधोगती पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. अशा चित्रपटांमार्फत लोकांना त्यांच्याच मुळापासून दूर करण्याचा चित्रपट निर्मात्यांचा छुपा अजेंडा आता स्पष्ट दिसायला लागला आहे. भाषेचा विपर्यास करून, समाजाला तिच्‍या चालीरीती, मूल्ये आणि वारसा यापासून वेगळे करण्‍याचा त्यांचा उद्देश आहे. एखाद्या पूर्वनियोजित षडयंत्राला अनुसरून मोजूनमापून हळूहळू विषप्रयोग गेल्या अनेक दशकांपासून आपल्यावर केला जात आहे जेणेकरून आपली सांस्कृतिक ओळख खोडून काढून त्याच्या जागी उथळपणा आणण्याचा हा प्रयत्न आहे.

तथापि, आशा न गमावता स्थिर मनाने काम करणे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या समृद्ध परंपरांचा आनंद घेऊन त्या जतन करत राहिले पाहिजे. आपली भाषा आपल्या सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग आहे आणि तिचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला धर्म, भाषा, चालीरीती आणि संस्कृतीचा अपमान करू पाहणाऱ्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या बाबतीत बोलायचं तर खरेतर आपल्या देशातील सिनेमाची मूल्ये टिकवून ठेवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी चित्रपटांचे सखोल पुनरावलोकन केले पाहिजे आणि ते आपल्या सांस्कृतिक आचारसंहितेशी सुसंगत असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे. तसे न केल्यास त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली भाषा आणि परंपरा जपण्याच्या त्यांच्या बांधिलकीपासून प्रेरणा घेऊया. आपण एकजुटीने उभे राहण्याची आणि आपल्या संस्कृतीला डळमळीत करू पाहणाऱ्या शक्तींपासून वाचवण्याची वेळ आली आहे. तरच आपण आपला वारसा अभिमानाने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवून युगानुयुगे त्याचे सातत्य राखू शकतो.

Blog by ‘Life Coach and Business Mentor’ Shailesh Tandel

Know More About Life Coaching and Business Mentoring Sessions

Topics that may interest you to develop your life skills...

Anger Management | Business Mentor | Clarity Of Purpose | Confidence and Self Esteem | Decision Making Ability | Effective Communication Skills | Emotional Balance | Excelling In Life | Executive Coaching | Goals: Setting and Achieving | Leadership Development | Living Passionately | Overcoming Fear Of Failure | Parenting | Relationship Coaching | Searchlight Within | Self Confidence | Self Esteem | Stress Management | Success Mantra | Time Management |

Posted in प्रेरणादायी.

2 Comments

Leave a Reply