मनाप्रमाणे जगण्यासाठी अगोदर मन मोकळे तर करा

काही महिन्यांपूर्वी '99' नावाच्या एका कन्नड चित्रपटाबद्दल ऐकले होते. त्यावेळी ऑनलाईन शोधताना कळलं की तो विजय सेथुपथी आणि त्रिषा कृष्णन यांच्या '96' नावाच्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. दोघेही उत्तम नट-नटी आणि मला आवडणारे त्यामुळे बघितला व खूप आवडला मला.

तामिळ आणि हिंदी डब ह्या दोन्हींमध्ये मी हा चित्रपट पाहिला आहे. हिंदी डब छानच आहे पण मला तामिळ जास्त आवडला. तामिळ नाही येत मला पण त्याने काहीच अडत नाही कारण हावभाव कळले की भावना व्यक्त होतात आणि भावना कळल्या की अर्थ स्पष्ट होतो कुणीही न समजावता देखील.

खूप दिवसांनी एखादा सोज्वळ चित्रपट पाहिला ज्यात ना मारामारी ना मेलोड्रामा, काहीच नाही. फक्त उत्तम कथा व त्याचं उत्तम सादरीकरण.
एक साधीसरळ प्रेमकथा पण पुर्णत्वाला न पोहोचलेली, तरीही ती सॅड स्टोरी नाही आहे.

शाळेत असतानाच रामचंद्र आणि जानकी एकमेकांच्या प्रेमात पडतात. राम थोडासा अंतर्मुख आणि जानकी आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करणारी. स्वभावाने एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळं जोडपं आणि तरीही काहीही न बोलताही एकमेकांच्या मनातलं समजून घेणारी.

राम आपल्या मनातलं जानकीला न सांगता आपल्या मानलेल्या बहिणीला सांगतो आणि तिने जानकीकडे पाहताच जानकीचे खाली मान घालून दिलेली प्रेमाची स्वीकृती आणि प्रेम व्यक्त केल्यावर अंतर्मुख रामचंद्रांची प्रत्येकवेळी जानकी समोर येताच लाजून किंवा घाबरून पळून जाण्याची केविलवाणी धडपड आणि ठामपणे समोर उभी राहिल्यास नजरेला नजर देखील न मिळवू शकणारी द्विधा मनःस्थिती त्याचं निखळ प्रेम दर्शविते जे दुर्लभ आहे.

पुढे काही कारणांनी शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच राम संपूर्ण कुटुंबासोबत तंजावर सोडून चेन्नईत स्थायिक होतो आणि त्या ताटातुटीनंतर साधारणपणे २२ वर्षानंतर त्यांची पुन्हा एकदा भेट...

ऐकून विचित्र वाटेल पण एक काळ असा होता की जर एखाद्या मुलीने माझ्याकडे पाहिले तर मी मान खाली घालायचो.

सहावी-सातवीत एक मुलगी वर्गात होती तिला जर माझ्याशी बोलायचं असेल तर सरळ माझ्या बाकावर माझ्या बाजूला बसून माझ्याशी बोलत बसायची आणि तेवढा वेळ मी अंग चोरुन कमीत कमी जागेत कसातरी मान खाली घालून बसायचो. ती आल्यावर इकडे तिकडे विखुरलेले माझे मित्र ती तिच्या जागेवर परत जाताच पुन्हा जवळ यायचे.

बहुतेक आठवी नंतर आमचे वर्ग बदलले. मी सकाळच्याच वर्गात होतो आणि ती कदाचित दुपारच्या वर्गात गेली असावी. त्यानंतर दहावीच्या परीक्षेअगोदर मी माझ्या वर्गमित्राच्या घरी गेलो होतो त्यावेळी तिथे आमची नजरानजर झाली आणि मला पाहून ती गोड हसत काहीवेळ तिथेच थांबली पण मी सवयीप्रमाणे खाली पाहिले. तिच्याशी बोलावं असं मला देखील वाटलं होतं पण तेवढी हिंमत नाही झाली आणि ती तिथेच थांबलेली असतानाही मी माझ्या मित्रासोबत तिथून निघून गेलो.  माझं तसं निघून जाणे मला स्वतःलाही खटकले होते पण वेळ निघून गेली होती. ती त्याच चाळीत रहात होती हे तेव्हा कळले होते पण त्यानंतर मी तिथे कधी गेलो नाही आणि ती परत कधी दिसली नाही.

त्या वयात तिच्या मनात काही असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आणि असलं तरी मला माहित नाही. मला ती खूप मोकळ्या मनाची वाटायची पण मला त्याप्रमाणे वागण्याची सवय नव्हती. अंतर्मुख मी कधीच नव्हतो पण सभ्य नक्कीच होतो त्यामुळे एखादी माझ्याच वयाची मुलगी समोर असेल तर मी बोलणेच काय नजरानजर पण टाळायचो. ह्या चित्रपटात प्रेम झालं आहे हे जाणवल्यावर हिरोईन समोर असली की हिरो तसा वागतो.

मी नाचताना बेधुंद होऊन नाचायचो आणि त्यावेळी आजुबाजूला कोण आहे याचीही शुद्ध नसायची. मित्रांसोबत धमाल करायचो पण मुलींच्या समोर मात्र माझी सर्व मस्ती बंद व्हायची. ह्यातला हिरो तसा अंतर्मुख (इंट्रोवर्ट) आणि काही अंशी न्यूनगंड असलेला त्यामुळे भावना व्यक्त करण्याची मारामारी. काही बाबतीत माझ्याही मनात त्यावेळी न्यूनगंड होता जो स्वत:वर काम करताना मी जाणीवपूर्वक दूर सारला होता.

नववीत असताना माझी एक बालमैत्रिण आणि मी एकाच वर्गात आलो. लहानाचे मोठे एकत्रच झाल्यामुळे तिच्या बरोबर बोलताना सहजता होती त्यामुळे आरामात कोणत्याही किंतु-परंतु शिवाय बोलणे व्हायचे. चाळीतल्या कुठल्याही मुलीशी बोलताना मी सहजच व्यक्त व्हायचो पण बाहेर मात्र मी तेवढा मोकळा नव्हतो. ही बालमैत्रिण वर्गात आल्यावर तिच्या मैत्रिणिंशी देखील थोडंफार बोलायला लागलो होतो पण इतर मुलींसमोर मात्र मान खाली. कुणाची भीती वगैरे असा काही प्रकार नव्हता पण तरीही अंतर ठेवून रहायचो.

शाळेत असताना कोणत्याही मुलीबद्दल प्रेमाची किंवा आकर्षणाची भावनाही माझ्या मनात कधीच आली नव्हती पण हा चित्रपट पाहिल्यानंतर का कुणास ठाऊक पण त्या सर्व गोष्टी नजरेसमोरून गेल्या.

रामचंद्र आणि जानकी साधारणपणे २२ वर्षांनी भेटतात आणि त्या भेटीत त्यांना मन मोकळं करण्याची संधीही मिळते आणि त्यात खूप साऱ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. एकमेकांबद्दलची असलेली काळजी व्यक्त होते आणि...

पुढचं सर्व चित्रपट बघून त्याचा आनंद घ्या. मी लिंक देतोय हिंदी डबची.
96' Movie Link (Hindi Dubbed)
https://www.youtube.com/watch?v=63F9Pv4k4wk&t=5048s

मी नातेसंबंधांवर (रिलेशनशिप) जेव्हा कौंसिलिंग करतो तेव्हा किंवा माझ्या कार्यशाळांमध्ये एक गोष्ट मी नेहमीच सांगतो "आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असावी ज्याच्या समोर तुम्ही मन पुर्णपणे मोकळे करू शकता कोणताही आडपडदा न ठेवता".

तशी व्यक्ती मिळतेच असं नाही आणि जरी मिळाली तरी सहजासहजी विश्वास ठेवणे त्याहून कठीण पण माणूस जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा हे सहज शक्य होते कारण प्रेम हे एक असं रसायन आहे की ज्यात स्वत्व उरतच नाही. ते एक वेगळेच विश्व असते आणि त्यात स्वतःपेक्षा जोडीदाराचा विचार पहिला होतो आणि ज्या नात्यांमध्ये पारदर्शकता असते जिथे एकही शब्द न बोलता देखील जोडीदाराला मनातील भावना समजतात. जोपर्यंत त्या भावना जिवंत असतात तोपर्यंत प्रेम टवटवीत राहते अगदी कितीही दुरावा आला तरीही.

सर्वच नाती आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतातच असे नाही. काही नाती अल्पायुषी ठरतात तर काही दीर्घायुषी. नाते तुटले असेल, शुद्ध मराठीत बोलायचं म्हणजे जर ब्रेकअप झाला असेल तर मनाची तयारी करून आयुष्य नव्याने सुरू करता येते पण अचानकपणे जर कुणी निघून गेला तर कित्येकवेळा कळतही नाही की पुढे काय करायचे ते. खरंतर पुढचा विचार तेव्हाच येऊ शकतो जेव्हा तुम्ही भूतकाळाच्या गर्तेतून बाहेर पडता.

कित्येक नात्यांना नाते बोलणे हा खरंतर नाते ह्या शब्दाचा अपमान असेल तर कित्येक नाती अशी ताणलेली असतात की थोडीशी आणखी जरी ताणली गेली तरी रबराप्रमाणे तुटून जातील. ती जर तुटू नये असं वाटत असेल तर त्याला पुन्हा हवा तसा आकार देण्यासाठी प्रेमाची फुंकर तर मारावीच लागणार.

कोरोनाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाला एकत्रित राहण्याची संधी लाभलेय आणि ह्या संधीचा वापर एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो आणि तसंही संवादाशिवाय कोणत्याही गोष्टीची सुरुवातच होऊ शकत नाही.

म्हणूनच जर मनाप्रमाणे जगायचं असेल तर अगोदर मन मोकळे करायला शिका.

Shailesh Tandel

Time Management Guru | Relationship Guru | Corprate Trainer | Life Coach | Business Mentor

 

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in Relationship, नातेसंबंध.

Leave a Reply