Marathi Bhasha Din

मराठी भाषा दिन ते मराठी यशोदिन

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिवस. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या सन्मानार्थ त्यांच्या जयंतीदिनी सुरु झालेला हा सोहळा. जो एकदिवसा पुरते का होईना पण मराठी माणसाला आणि मराठी भाषेला स्फुरण चढवण्याचा काम नक्कीच करतोय.

सोशल मेडियाच्या माध्यमामुळे, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा सोहळा म्हणजे मातृभाषेसाठी ऊर भरून येण्याचा दिवस. जर सोशल मेडिया नसता तर याचे किती लोकांना अप्रूप वाटले असते कुणास ठाऊक. याबद्दल लोकांना माहित तरी झाले असते किंवा नाही देव जाणो. कदाचित हा एक सरकारी सोहळा म्हणूनच उरला असता...पण आता हा वादळ फोफावतोय.

सण आणि उत्सव साजरे करण्यात आम्हा भारतीयांचा हात कुणीही पकडू शकणार नाही. आणि होय, आहोत आम्ही उत्सवप्रेमी. अगदी ठामपणे सांगू शकतो आम्ही आणि त्या उत्सवांमुळेच इथली संस्कृती नुसती टिकली नाही तर वाढली आणि जास्तीत जास्त सुसंस्कृत झाली. कोणत्याही कारणामुळे का होईना पण आम्ही आज मराठी भाषा दिन साजरा करतोय. एकमेकांना त्या दिनानिमित्त शुभेच्छा देत आहोत आणि तेही शुद्ध मराठीत...हेही नसे थोडके.

पण जर का आम्ही वर्षातून एकदा का होईना मराठी भाषा दिवस साजरा करतो आहोत आणि जर त्याचप्रमाणे आमच्या आयुष्यात आम्ही कमावलेल्या यशासाठी वर्षातून एक दिवस साजरा करायचे ठरवले तर? कठीण आहे का हो असे करणे? काय राव यशस्वी आणि आम्ही? कोणत्या हिशोबाने? आणि यश म्हणजे काय सण आहे का साजरा करायला? जेव्हा कधी आम्हाला यशाची चाहूल लागते त्यावेळी येतो न उत्साहात तेवढ्याच पुरते जसे आज मराठी भाषादिनासाठी आहोत. हा दिवसा सरला की पुन्हा आम्ही गुंतून जाऊ आपल्या रोजच्या रामरगाड्यात.

खरेच कठीण आहे का यश साजरा करणे? की कठीण आहे यशस्वी होणे? आणि यशस्वी होणे म्हणजे नक्की असते तरी काय भाऊ?

काही वर्षांपूर्वी कुठेही नसणारा मराठी भाषा दिन जर मराठी अस्मितेच्या जोरावर एवढा झोकात येऊ शकतो तर मग यशासाठी लागणारी आमची अस्मिता कुठे झोप काढत असते?
मान्य आहे प्रत्येकाची यशाची भाषा वेगळी असते पण हेही तितकेच खरे आहे की उद्योगधंद्यात उतरण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी अशी अनुकूल परिस्थिती कधीच नव्हती. २०/२५ वर्षांपूर्वी कदाचित तुमची कारणे रास्त होती पण आता नाही. आता लोकं जागृत झालीत. कित्येक क्लब्सच्या मदतीने खूप सारी मराठी माणसे एकमेकांना मदत करत पुढे जात आहेत. आता ते कबड्डीचे किंवा खेकड्यां सारखे पाय ओढण्याचे दिवस सरत चाललेत. आणि जर आता नाही तर कधीच नाही.

उद्या आम्ही पुन्हा एकदा आमच्या स्वतःमध्येच गुंतून जाऊ मग मी मुंबईचा, पुण्याचा, नाशिकचा, विदर्भाचा, मराठवाड्याचा, खानदेशचा, घाटावरचा, वगैरे वगैरे आपल्या नेहमीच्या बिरुदावली चिटकवून त्याचप्रमाणे वागायला सुरुवात करू जो पर्यंत शिवजयंती येत नाही किंवा महाराष्ट्र दिन येत नाही तो पर्यंत.

जर तसे नसेल तर आजच पेटून उठा, तुम्हाला जे यश हवे आहे ते मिळविण्यासाठी. आणि हो जसे यश वर्षातून एकदा साजरे करण्याची गोष्ट नाही आहे तशीच मराठी भाषा देखील नक्कीच नाही.
मराठी माणूस अटकेपार झेंडा फडकवू शकतो. दिल्लीला आपला मांडलिक बनवून जर संपूर्ण भारतावर राज्य करू शकतो, तर तो आजही काहीही करू शकतो.

कारण आम्ही मराठी माणसे इतिहास फक्त वाचत नाही तर इतिहास घडवितो!!!

Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Posted in नियोजन, प्रेरणादायी, मंत्र यशाचा, वेळ अनमोल, वेळ व्यवस्थापन and tagged , .

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.