परिक्रमाच तर करत असतो आपण

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत परिक्रमाच तर करत असतो आपण.

जन्मल्याबरोबर आईला बिलगून राहतो आणि जरासे पाय फुटले की सतत तिच्या आणि वडिलांच्या पुढेमागे घिरट्या घालायला लागतो. थोडेसे मोठे झालो की मित्र मैत्रिणीच्या मागेपुढे प्रदक्षिणा व्हायला लागतात. कालांतराने बॉसच्या आणि कुटुंबाच्या गोल गोल परिक्रमा करण्यात आणि पैशाच्या परिक्रमेत तर आयुष्य निघून जाते त्यामुळे तुम्ही कुणीही असा पण प्रदक्षिणा किंवा परिक्रमा काही सुटत नाहीत.

अगदी पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करतेय तर चंद्र पृथ्वीभोवती ज्यामुळे ही सृष्टी टिकून आहे, नाही का? म्हणजे त्या परिक्रमांना काहीतरी कारण, काही उद्देश नक्कीच जोडलेला असतो. कदाचित तो आपल्याला ज्ञात असेल किंवा अज्ञात पण उद्देश असतो एवढं मात्र नक्की.

एखाद्या देवळात गेल्यावर त्या देवतेची परिक्रमा करणे सर्वसाधारण गोष्ट आहे आणि ती आपण मनोभावे श्रद्धेने पार देखील पाडतो. आपण जे करतोय त्याची जाणीव असते आपल्याला आणि त्यामुळेच कधीकधी काही लोकं तसे करणे जुनाटपणाचे लक्षण मानून परिक्रमा करायलाच काय पण कित्येकवेळा देवळात जायला देखील धजावत नाहीत.

देवळातली परिक्रमा आपण टाळू शकतो पण आयुष्य ज्याप्रमाणे परिक्रमा घ्यायला लावते त्याचे काय? आणि ती परिक्रमा आपण अजाणतेपणी करतो देखील आणि कित्येकवेळा ती आपण पूर्ण केली आहे किंवा अशी एखादी परिक्रमा आपण करतोय याचे भान देखील नसते आपल्याला.

जरासा मागे जाऊन विचार करा की तुम्ही कुठून सुरुवात केली होती आणि कोणकोणत्या परिक्रमा करत तुम्ही आजच्या स्थानी पोहोचला आहात ते? त्यातल्या कितीतरी परिक्रमांबद्दल तर तुम्हाला जाणीवही नसेल. कशी किंवा कुठून सुरु झाली त्याच्याबद्दलही संपूर्ण अंधारच असेल. बघा जरासं मागे जाऊन जर जमत असेल तर.

काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकरांनी लिहिलेला धर्मबोध पुस्तक घेण्यासाठी मी एका पुस्तकांच्या दुकानात गेलो होतो पण त्यांच्याकडे ते पुस्तक उपलब्ध नसल्याने त्यांनी काही वेगळी पुस्तके दाखवली. त्यात एका पुस्तकाचे त्यांनी विशेष कौतुक केल्यावर मी त्या पुस्तकाची काही पाने चाळून पहिली. ते पुस्तक नर्मदा परिक्रमेबद्दल एका लेखकाचे स्वानुभव होते पण मला धर्मबोध पाहिजे होता त्यामुळे मी परिक्रमेबद्दल लिहिलेले पुस्तक खरेदी न करताच बाहेर पडलो. त्यानंतर काही वर्षांनी कुडाळला कार्यशाळा घेण्याचा योग आला असताना नर्मदा परिक्रमेच्या अनुभवांवर आधारित एका ऑडिओचा काही भाग कारमधून जाताना ऐकलं. ज्यांनी तो ऑडिओ लावला होता ते त्या अनुभवांनी भारावून अगदी भरभरून बोलत असल्याने उत्कंठा आणखीनच वाढली होती आणि तसेही भटकंती हा माझा आवडता छंद असल्याने कधीतरी जाऊ तिथे देखील असा विचार मनात आला होता पण कुठेतरी तो विचार मागे पडून त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेलो होतो.

काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपवर पावसाच्या आगमनापूर्वी नर्मदा नदीला साडी नेसवली जाण्याचा एक अप्रतिम व्हिडीओ हाती लागला आणि तो तसाच सोशल मीडियावर शेअर केल्यावर त्यावर काही कमेंट्स आल्या. ज्यात कळले की तो रेवा ह्या गुजराती चित्रपटाचा व्हिडीओ आहे आणि रेवा म्हणजेच नर्मदा. दुसऱ्या एका मित्राने हा चित्रपट कमीतकमी दहा वेळा तरी पहिले असल्याचे सांगितले आणि तिसऱ्याने तो त्याच्या आणखी एका मित्रासोबत नर्मदा परिक्रमा करायला जाणार असल्याचे सांगितले आणि त्याचबरोबर मला एक व्हाट्सअप फॉरवर्ड पाठवला जो नेमका त्याच व्यक्तीने लिहिलेला होता ज्यांचा ऑडिओ मी कुडाळला असताना ऐकला होता.

नर्मदा परिक्रमा म्हणजे चालत गेल्यास साधारणपणे ३ ते ४ महिन्यांचा अवधी आणि गाडीने १०/१५ दिवसांचा प्रवास. तो कधी करायचा हा दूरचा विषय होता पण चित्रपट पाहणे लगेचच शक्य होते त्यामुळे मी लगेचच तो चित्रपट पाहिला आणि जाणीव झाली की मी आयुष्यभर परिक्रमाच तर करत आलो आहे.

सर्वसाधारण चित्रपटांप्रमाणे हा देखील चित्रपट पण एका विशिष्ट मांडणीचा त्यामुळे संपूर्ण प्रवास मनमोहक होत जातो आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे या चित्रपटातील पात्रे उगाचच घुसवण्यात आलेले नाहीत तर तो प्रत्येकजण एक विशेष संदेश देऊन जातो. मला त्यातले सर्वात भावलेले पात्र एका मुलीचे आहे जी नदीच्या उगमा सारखीच अतिशय निर्मल मनाची, ज्यात कोणताही गाळ नाही की कुठेही गढूळपणा नाही. मोकळ्या मनाची आणि तेवढ्याच मोठ्या मनाची कोणालाही सहज क्षमा करून कोणताही रागद्वेष मनात न ठेवता सतत नदीप्रमाणेच प्रवाही.

चित्रपटाचा हिरो अजाणतेपणी आणि द्विधा मनःस्थितीत नर्मदेची परिक्रमा चालू करतो आणि मोक्ष मिळवण्यासाठी ज्या काही अपरिहार्य बाबी आहेत ते सुविचाराच्या स्वरूपात भिंतीवर लिहिलेले तो वाचतो आणि त्यातला एक गुण असतो 'अपरिग्रह'.

ऐकायला थोडासा वेगळा शब्द पण आयुष्याचा अत्यंत महत्वाचा अंग. त्याच्याशिवाय आयुष्यात पुढे जाणे शक्यच नसते. ज्या शब्दाबद्दल माहित नाही तो आयुष्याचा महत्वाचा अंग असूच कसा शकतो, नाही का?

अपरिग्रह हा परिग्रहच्या विरुद्धार्थी शब्द. परिग्रह म्हणजे जमा करणे, मालकी हक्क प्रस्थापित करणे वगैरे वगैरे वगैरे आणि अपरिग्रह म्हणजे सोडून देणे. कोणत्याही गोष्टीची काळजी किंवा चिंता न करता, कोणत्याही गोष्टी विनाकारण साठवून न ठेवता मग ती वस्तू असो अथवा आठवण पण त्याचा त्याग करून मोकळेपणे पुढे पुढे जात राहणे. त्या मुलीचे पात्र म्हणजे अपरिग्रहाचे मूर्तिमंत उदाहरण.

२१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय की काही गोष्टींचा अपरिग्रह केल्याशिवाय योग आयुष्यात अंतर्भूत करणे केवळ अशक्यच.

गेल्या एकतीस वर्षांच्या माझ्या उद्योगीय आणि वैयक्तिक प्रवासात खूप सारे उतार चढाव माझ्या आयुष्यात येऊन त्यांनी अक्षरशः आदळून आपटून कित्येकवेळा मला जमीनदोस्त करून टाकले होते. पुन्हा उभं राहण्याची ताकत देखील शिल्लक नसताना कसंतरी धडपडत उभं राहावं लागत होते आणि मी उभा राहत गेलो कारण त्या प्रत्येकवेळी अतिरिक्त भार माझ्यावर मी येऊ दिला तर नाहीच पण अगोदरचे अतिरिक्त वजन देखील कमी करत गेलो कारण जेवढं ओझं कमी तेवढाच तुमचा पुढे जाण्याचा वेग जास्त.

आणि तसेही जर एकाच ठिकाणी अडकून बसलो तर नदीचा नाला व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे ते अतिरिक्त सामान जर मी उतरवत गेलो नसतो तर माझे पुढे जाणे शक्यच नव्हते.

सोप्या भाषेत सांगायचं तर कुणाला क्षमा करायची असेल तर तिथे क्षमा करून (स्वतःला सुद्धा), भूतकाळात गुंतून न राहता किंवा भविष्याची चिंता न करता प्रवाहासोबत वाहत जाणे तर कधी परिस्थितीला सामोरे जात प्रवाहा विरोधात घेतलेले धाडसी निर्णय खूप काही देऊन गेले मग ते नाते असो वा उद्योगधंदा. त्याचबरोबर जिथे जुळवून घ्यायचं आहे तिथे जुळवून आणि जे ओझ्यासारखे वहावे लागत आहे ते तसेच मागे सोडून पुढे पुढे जात गेलो.
नर्मदेची परिक्रमा करायला सुरुवात केल्यावर लोकं भेटत जातात. काही काळ ते तुमच्यासोबत चालतात आणि नंतर त्यांच्या कमीजास्त वेगाने मागेपुढे होतात तर काही अर्ध्यातच माघार घेतात. शेवटी सर्वांचे गंतव्य एकच असेल असे जरुरी नाही.

आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात देखील पण तर आपल्याला लोकं भेटतात आणि निघून जातात मग ह्यात वेगळे ते काय? परिक्रमा नर्मदेचीही आणि प्रत्यक्ष आयुष्याचीही तशीच. फरक जर असेल तर तो जाणतेपणी घेतलेला परिक्रमा करून स्वतःला शोधण्याचा निर्णय.

शेवटी नदी जर उगमातच अडकून पडली तर तिचे मिलन समुद्राशी होणार तरी कसे? त्यामुळे परिक्रमाच तर करतो आपण.

नर्मदे हर

Shailesh Tandel

Time Management Guru | Relationship Guru | Corprate Trainer | Life Coach | Business Mentor

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in मंत्र यशाचा.

3 Comments

Leave a Reply