सहा ग्रह आकाशात दिसताहेत तेही दुर्बिणीशिवायच

काही दिवसांपूर्वी कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना चंद्राच्या बाजूला बहुतेकांना एक लाल रंगाचा तारा दिसला असेल, तो लालसर तारा म्हणजेच मंगळ ग्रह.

जर कोजागिरी साजरी केली नसेल किंवा लक्ष फक्त चंद्रावरच किंवा दुधावरच केंद्रीत केलेले असेल तरीही हरकत नाही. तुम्ही तो मंगळ ग्रह आजही पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत जागे राहण्याचीही आवश्यकता नाही आहे. आणि हो एकाच वेळी मंगळ आणि चंद्रासोबत तुम्ही आणखी दोन ग्रह पाहू शकता कारण गेल्या काही महिन्यापासून मंगळ, शनी आणि गुरू (बृहस्पती) आकाशात दिसताहेत.

सुर्य आणि चंद्र तर रोजच उगवतात आणि मावळतात देखील पण बाकीच्या ग्रहांचे तसे नाही आहे. ते रोज नाही येत फेरी मारायला पण जेव्हा येतात तेव्हा त्यांनाही आपण दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो.

नवग्रहांपैकी राहू आणि केतु ग्रहणात कार्यरत असतात आणि ते दुर्बीणीतुनही दिसत नाहीत कारण ते छाया ग्रह आहेत.

बाकीचे ग्रह दुर्बीणीतून त्यांच्या मुळ स्वरूपात तर दुर्बीणी शिवाय आकाशातील करोडो ताऱ्यांपैकीच एखादे भासतात.
जर त्यांना आता पहायचे असेल तर सायंकाळी सात-साडेसात नंतर पूर्व दिशेकडे लालसर तारा दिसतो आणि तो म्हणजे मंगळ.
शनी आणि गुरू (बृहस्पती) डोक्यावर पण थोडे नैर्ऋत्येस (पश्चिम आणि दक्षिणेच्या मध्ये) कललेले. एकमेकांच्या जवळ पण तिरक्या रेषेत.
सहावा ग्रह साधारणपणे सकाळी पाच/साडेपाच वाजल्यापासून दिसायला लागतो आणि सूर्योदयापूर्वी गडप होतो तो चमचमता तेजस्वी तारा म्हणजे शुक्र ग्रह; तो देखील पुर्वेलाच दिसतो.

सुर्य मंडळातील सर्वात तेजस्वी तारा म्हणजे शुक्र आणि त्याला तोडीसतोड म्हणजे गुरू.

आश्चर्य म्हणजे जसे सुर्य चंद्र पश्चिमेस मावळतात तसेच शनी, गुरू आणि मंगळ रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतात आणि ठराविक वेळेनंतर दिसेनासे होतात. म्हणजे जर तुम्ही रात्री दहा वाजता त्यांना मी सांगितलेल्या ठिकाणी शोधाल तर तिथे ते तुम्हाला दिसणार नाहीत कारण ते पश्चिमेकडे सरकलेले असतील.

नवग्रहांपैकी बुध हा एकमेव ग्रह सध्या क्षितिजावर नसल्यामुळे तो दिसत नाही. आणि हो वर सांगितलेले ४ ग्रह पाहायला जर पंधरा-वीस दिवसांनी दिलेल्या वेळेत जाल तर कदाचित तोपर्यंत त्यांची जागा बदललेली असेल.

लहानपणापासून काहीतरी नवीन दिसले की ते जाणून घेण्याचे माझे कुतूहल नेहमीचेच, मग ते लोकांच्या वागण्याचे असो अथवा निसर्गाचे किंवा स्वतःच्याच लहरीपणाचे पण ते जाणून घेण्यासाठी निरीक्षणाची आणि त्यावर विचार करण्याची लागलेली सवय त्यामुळे सतत काहीनाकाहीतरी निरीक्षणे चालूच; लॉकडाऊन देखील त्याला अपवाद नाही.

तीन चार वर्षांपूर्वी मॉर्निंग वॉकला जाताना एक तेजस्वी तारा दिसला होता त्यावेळी एका वयोवृद्ध गृहस्थांनी तो शुक्र ग्रह आहे आणि तो फक्त सूर्योदयापूर्वी काही काळ आणि सूर्योदयानंतर काही काळच दिसतो असे सांगितले होते त्यामुळे तो ग्रह जेवढे दिवस आकाशात दिसत होता तोपर्यंत त्याचे निरीक्षण करत होतो.

चंद्रसुर्या खेरीज बाकीचे ग्रह देखील दिसतात याचा तो पहिला अनुभव पण तरीही वाटले होते की कदाचित फक्त शुक्र दिसत असावा कारण ते 'दे धक्का' चित्रपटातील गाणे...उगवली शुक्राची चांदणी आणि शुक्र तारा मंद वारा हे अरुण दातेंचे भावगीत.

तसेही चंद्र-सूर्य उगवताना आणि मावळताना पाहण्याचा पहिल्यापासून छंद त्यामुळे उत्तरायण / दक्षिणायन यांचेही निरीक्षण. त्यात एका मोबाईल ऍपची भर पडली ज्यामुळे एखादा तेजस्वी तारा दिसल्यावर मोबाईल मधून त्यात पाहिल्यावर त्याची पुर्ण माहिती मिळायला लागली आणि त्यातच हे ग्रह निदर्शनात आले आणि त्यानंतर त्यांच्या सद्यस्थितीची नोंद ठेवताना एक एक ग्रह कुठे आहे ते कळत गेले. मोबाईल ऍपची मदत मी नक्कीच घेतली आहे पण निरीक्षणे मात्र माझी स्वतःचीच.

एकेदिवशी असाच एक तेजस्वी तारा दिसल्यावर वाटले की तो शुक्रच असावा कारण तसेही त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पृथ्वीपेक्षा कमीच वेळ म्हणजे जेमतेम २२५ दिवसच लागतात पण ऍपमधून पाहिल्यावर कळले की तो बृहस्पती म्हणजेच गुरु आहे.

ज्योतिषशास्त्रातील ग्रहांच्या सद्यस्थितीबद्दल थोडेसे ऐकून वाचून असतो त्यामुळे आठवले की शनी आणि गुरु धनु राशीत एकत्र होते आणि काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ते धनुच्या पुढील म्हणजे मकर राशीत एकत्र आहेत. असे वाटले की हे जर खरे असेल तर दोघेही आजूबाजूलाच असणार म्हणून शोध घेतल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला कारण ते दोन्ही ग्रह खरोखरच एकमेकांच्या अगदी जवळ आहेत आणि ते दोन्ही ग्रह दुर्बिणीशिवाय पाहता येतात.

कुंभमेळा १२ वर्षातून एकदाच होतो कारण तेवढाच वेळ गुरूला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी लागतो आणि शनीची साडेसाती ज्यात तो प्रत्येक राशीत अडीज वर्षे राहतो कारण त्याला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी साधारणपणे तीस वर्षांचा कालावधी लागतो. आश्चर्य म्हणजे हे सर्व ज्ञान आपल्या पूर्वजांना होते.

आपल्या पूर्वजांना खगोलशास्त्राचे संपूर्ण ज्ञान होते आणि म्हणूनच आपल्या देवळात नवग्रहांची उपस्थिती हजारो वर्षांपासून आहे पण ते उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो असे कधी वाटले नव्हते कारण मंदिरात आहे म्हणजे अंधश्रद्धा आणि ते तिथे आहे म्हणजे नक्कीच अशास्त्रीय हा आमचा गोड समज की गैरसमज? मॉडर्न सायन्सने आणि मुख्यतः पश्चिम जगाने मानले की मगच ते शास्त्रीय.

पुर्वी मी दर शनिवारी शनी मंदिरात जायचो पण लॉकडाऊन मुळे ते बंद झाले होते आणि प्रत्यक्ष शनी ग्रहाचे दर्शन घरातूनच होऊ लागले; अपवाद पावसाळी वातावरणाचा.

पूर्वजांनी परंपरेच्या नावाने खगोलशास्त्र देखील आमच्या आयुष्याचा भाग बनवला एवढं मात्र नक्की. जे ग्रह पाहिल्याचे मला अप्रूप वाटते आहे आणि ते सर्वांना पहायला मिळावे असे वाटते आहे तो कदाचित आमच्या पूर्वजांच्या आयुष्याचा पीढी दर पीढी मजल करीत आलेला दैनंदिन जीवनाचा भाग असावा आणि तो ग्रह आकाशात विद्यमान आहे हे पाहण्यासाठी त्यांना कोणत्याही ऍपची गरज नसेल कारण ज्योतिष शास्त्राच्या नावाने असलेले खगोलीय पंचांग पुरेसे.

आकाशातील हे ग्रह दुर्बिणीशिवाय उघड्या डोळ्यांनी तर पहाच पण जर जमले तर डोळ्यावर पडलेली अंधश्रद्धेची किंवा आपल्याच पूर्वजांच्या ज्ञानाबद्दल असलेली अविश्वासाची झापडे बाजूला सारून त्यांनी जतन केलेल्या अमूल्य ठेव्याकडे देखील उघड्या डोळ्यांनी पहा कदाचित मध्येच तुटलेली कडी पुन्हा जोडण्याचे काम तुम्ही करू शकाल आणि हे ज्ञान पिढी दर पिढी पसरत जाईल आणि येणाऱ्या पिढीचे आयुष्य संपन्न करण्यात तुमचा हातभार लागेल. नाहीतर हेच ज्ञान आपल्याला पश्चिमेकडून त्यांच्या कोणत्यातरी शास्त्रज्ञांच्या नावावर मिळेलच, त्याची शांतपणे वाट बघूया.

टीप- मी खगोलशास्त्रज्ञ नाही पण उघड्या डोळ्यांनी निरीक्षणे करण्याची आणि असलेले दस्तावेज तपासून पहायची सवय नक्कीच आहे मला.

Time Management & Relationship Guru
Shailesh Tandel

Time Management Guru | Relationship Guru | Corprate Trainer | Life Coach | Business Mentor | Soft Skill Trainer | Life Skills Trainer

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in प्रेरणादायी.

Leave a Reply