आयुष्याचा उद्देश माहित असायलाच हवा का?

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेद पिककाकयोः
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः

कावळा काळा तसाच कोकीळही काळाच मग दोघांत फरक तरी काय?

दोघांचाही रंग काळाच पण वसंत ऋतूच्या आगमनानंतर कोकिळाचा मंजुळ स्वर कानावर पडायला सुरुवात होतो आणि कावळ्याचा तोच जुना पुराणा कावकाव त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाने दोघांमधला फरक स्पष्टपणे जाणवतो.

दोन सारख्याच दिसणाऱ्या पण वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या तुलनेसाठी हे संस्कृत सुभाषित सढळहस्ते वापरले जाते.

कावळ्याच्या बुद्धिचातुर्याच्या कथा लहानपणापासूनच आपण ऐकून असतो आणि वर्षाचे बारा महिने आपल्याला त्याचे दर्शनही घडत असते. आजूबाजूच्या झाडांवर त्यांचा वावर तर असतोच पण हक्काने खाऊ मागण्यासाठी आपल्या खिडकीवर देखील बिनधास्तपणे हे येत-जात असतात.

कोकिळाचे तसे नसते. तो आजूबाजूच्या झाडावर जरी असला तरीही आपल्या दृष्टीक्षेपात येणार नाही याची काळजी घेतो, म्हणजे त्याचे वावरणे देखील लपून छपूनच त्यामुळे त्याच्या असण्याची जाणीव फक्त मंजुळ आवाजानेच होते आणि तेही वसंत आणि ग्रीष्म ऋतूच्या कालखंडात. साधारणपणे चैत्र ते आषाढ ह्या चार महिन्यांच्या कालावधीत कारण तोच काळ असतो त्यांच्या प्रजननाचा.

मी सुरुवातीपासून 'कोकीळ' ह्याच शब्दावर जोर देत आहे आणि कुठेही मी 'कोकिळा' असे संबोधलेले नाही. कारण जो मंजुळ आवाज आपण ऐकतो तो मादीचा नसतोच मुळी. तो मंजुळ स्वर असतो नराचा जो मादीला रिझविण्यासाठी गोड आवाजात तिला साद घालत असतो.

कित्येकांना आश्चर्य वाटेल हे ऐकून कारण आमच्यासाठी तो आवाज कोकिळेचा म्हणजेच मादीचाच आहे. एक जुने गाणे आहे 'सुवर्ण सुंदरी' चित्रपटाचे 'कुहू कुहू बोले कोयलिया', कोयलिया म्हणजे मादीच. कोयल बोली दुनिया डोली, कोयलसी 'तेरी बोली वगैरे वगैरे कितीतरी गाणी कोकिळावर नाही तर कोकिळेवर. आम्ही लतादीदींना देखील गानकोकिळा म्हणतो, आता ते त्या कोकीळाच्या सुमधुर आवाजामुळे की तिथेही तो आवाज मादीचाच आहे ह्या समजुतीतून ते माहित नाही. तसेही एखाद्या पुरुषाला तशी उपमा दिलेली माझ्यातरी ऐकण्यात नाही.

मी खूप वर्षांपूर्वी ऐकले होते की तो आवाज कोकिळाचा म्हणजेच नराचा असतो पण कधी अनुभवले नव्हते. ह्या लॉकडाऊन मध्ये १६ मार्चपासून घरी बसलोय त्यामुळे फुरसतच फुरसत आणि तसेही मला जंगलात एकांतात राहणे किंवा समुद्रकिनाऱ्यावर एकटं बसून राहायला भरपूर आवडतं त्यामुळे ही मिळालेली संधी फुकट कशी घालवणार.

आजूबाजूला झाडे बऱ्यापैकी असल्याने वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिल नेहमीचीच. मार्चच्या सुरुवातीपासूनच कोकिळाचा आवाज यायला सुरुवात झाल्यावर नीट निरीक्षण केल्यावर, समोरच्या झाडावर फांद्यां आणि पानांचा आडोसा घेत लपलेला तो दिसतही होता पण तो एकटा नव्हता तर चौघे होते त्यामुळे वाटले की दोन जोडपी असावीत आणि बरेही वाटले की जिथे लोकांना एकसुद्धा कोकिळा दिसत नाही तिथे मला चार चार दिसताहेत.

नेहमीच्या पक्ष्यांचे निरीक्षण करताना कोकिळाच्याच आकाराचे आणि त्यांच्याच सारखा दिसणारा पण रंगाने राखाडी व सफेद ठिपके असलेले दोन आणखी पक्षी दिसले. वाटले की तेही कोकीळेच्याच कुळातील असावेत म्हणून 'ॐ गुगलाय नमः' केल्यावर नर आणि मादीचे फोटो दिसले, ज्यात नर काळा आहे आणि मादी सफेद रंगाचे ठिपके असणारी. त्या नर आणि मादीचा मी फक्त आवाजच नाही ऐकलाय तर त्यांना तो आवाज काढताना प्रत्यक्ष पाहिलेय अगदी जवळून आणि तेही स्पष्टपणे. त्यामुळे पूर्वी जे फक्त ऐकले होते ते अनुभवता देखील आले.

अनुभवल्यानंतर मिळालेला आनंद शब्दात मांडणे कठीण असते पण एखादी गोष्ट ऐकून माहित असणे आणि ती स्वतः अनुभवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एवढं मात्र नक्की.

मला खात्री आहे ज्यांनी हे सुभाषित लिहिले असेल त्यांनी नराचा म्हणजे कोकिळाचा विचार करूनच ते लिहिलेले असणार कारण संस्कृत असो अथवा मराठी, पुरुषांच्या नावाचा शेवट सहसा अ स्वराने होतो आणि स्त्रियांचा आ किंवा ई स्वराने. उदाहरणार्थ रामः माधवः शैलेशः तसेच काकः आणि पिकः आणि स्त्रियांचा सीता, माधवी, मीनाक्षी, स्वप्ना इत्यादी.

तर सांगायचा मुद्दा असा की तो मंजुळ स्वर नराचा असतो मादीचा नव्हे. मादीला रिझविण्यासाठी घातलेली शीळ मादीला आकर्षित करत असणारच पण त्याचबरोबर ते स्वर ऐकणारी लोकं देखील क्षणभरासाठी मंत्रमुग्ध होऊन जातात.

चैत्र ते वैशाख ह्या चार महिन्या व्यतिरिक्त त्या कोकिळाचा आवाज क्वचितच ऐकायला येतो. बहुतेक प्रजननाच्या काळातच त्याला कंठ फुटत असावा म्हणून तो लक्ष वेधून घेतो. प्रजननाच्या काळानंतर कदाचित तो स्थलांतर तरी करत असावा किंवा पांडवांसारखा अज्ञातवासात जात असावा अथवा असाच एखाद्या झाडावर अंग चोरून लपलेला.

असं नाही वाटत की खूप साऱ्या ठिकाणी चुकीच्या समजुतीवर आम्ही पुढे पुढे जात असतो आणि तेच अंतिम सत्य आहे हे लोकांना बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो? जसे सुमधुर आवाज हा कोकिळेचा असतो ही समजूत?

आता हे झाले कोकीळ पुराण; आता थोडेसे कावळ्याबद्दल देखील जाणून घेऊया.

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असतात पण त्यात केवळ वड व पिंपळ ही झाडे इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात पण आश्चर्य म्हणजे जगातील सर्व रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य स्वतः लावू शकतो परंतु वड व पिंपळ यांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर रुपी फळे जेव्हा कावळे खातात (फक्त 'कावळेच', इतर पक्षी नाही) तेव्हा त्यांच्या पोटातच बीजांकुराची प्रक्रिया सुरु होते व ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ उगवते.

एखाद्या इमारतीच्या सिमेंटच्या भिंतीवर, टणक दगडावर किंवा अगदी कुठेही ही झाडे कशी उगवतात याची कल्पना आतापर्यंत आली असेलच तुम्हाला.

कावळ्यांचे प्रजनन म्हणजे अंडी घालण्यापासून ते पिल्ले मोठी होईपर्यंत भाद्रपद महिना उजाडतो. साधारणपणे ६/७ अंडी एक दोन दिवसांच्या अंतराने घातल्यावर कावळीण बाई त्याला १८ दिवस उबवतात. त्या काळात तिचा जोडीदार आणि अगोदरची अपत्ये तिला अन्नधान्य आणून देत असतात. पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत म्हणजे साधारणपणे ६० दिवसांपर्यंत त्यांना घरट्यातच ठेऊन त्यांची काळजी घेतली जाते. ती भरारी घेण्यास सक्षम झाली की घरट्याबाहेर पडतात त्यामुळे आपल्याला ती पिल्ले लहान असताना कधी दिसतच नाहीत.

त्या पिल्लांमध्ये कोकिळेची पिल्ले देखील असतात कारण कोकिळा स्वतः त्या अंड्यांना उबवत बसत नाही तर कावळ्याच्या घरट्यात ते अंडं टाकून पळून जाते. कोकिळेच्या पिल्लांच्या वाढीसाठी जी आवश्यक पोषकतत्वे असतात ती त्या कावळ्याच्या घरट्यात मिळतात आणि त्यामुळे कावळ्याच्या पिल्लांअगोदर कोकिळेच्या पिल्लांची वाढ होऊन ती लवकर उडून जातात. म्हणजे जरी तुलना करायची झाली तरीही त्यांचे पालनपोषण देखील कावळ्यानेच केलेले असते.

पिल्लांची वाढ होणाऱ्या कालावधीत त्यांना सकस अन्न मिळणे गरजेचे असते आणि जर ते नाही मिळाले तर त्यांची वाढ खुंटू शकते आणि कावळ्यांशिवाय वड पिंपळासारखी झाडे टिकणार तर नाहीतच पण उगवणार देखील नाहीत.

आपले ऋषि-मुनि खूप कनवाळू व सखोल ज्ञानी होते. त्यांनी पाहिले की ही दोन झाडे सर्व जीवांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी व अत्यावश्यक आहेत त्या करिताच कावळ्यांना आहार दिला जाऊ लागला कदाचित तेच सत्कर्म आणि परंपरा पुढे जाऊन श्राध्द म्हणून ओळखले जाऊ लागले असेल. निसर्गाच्या चक्राशी अशी क्रृतज्ञता पाळल्यावर तर आपले पूर्वजही नक्कीच तृप्त होत असतील...

मी जो कावळा आणि पिंपळाच्या झाडाचा संबंध जोडला आहे त्याची पुष्टी करण्यासाठी व्यंकटेश स्तोत्रातील ३४ वी ओळ देत आहे...
काकविष्ठेचे झाले पिंपळ | तयासी निंद्य कोण म्हणे ||

हा ब्लॉग लिहिण्यापूर्वी साधारणपणे ५० दिवसांचा कालावधी निरीक्षणात, माहिती संकलनात आणि त्याची पुष्टी करण्यात व्यतीत झालेला आहे. आणि हो, हा ब्लॉग मी तुम्हाला चिऊकाऊच्या गोष्टी सांगण्यासाठी तर नक्कीच लिहिलेला नाही, मग औचित्य तरी काय ह्या कावळा आणि कोकीळ पुराणाचे?

मादीला रिझविण्यासाठी कोकीळ जे कुहू कुहू गातोय त्याचा सुमधुर ध्वनी लोकांना भरपूर आवडतोय हे त्या बिचाऱ्याला माहीतही नसेल नाहीतर त्याने लोकांकडून मनोरंजन कर उकळला असता आणि एकेका विभागात आपल्या गाण्यांचे जाहीर कार्यक्रम घेतले असते.

वड-पिंपळाच्या लागवडीनंतर कावळ्याचे दुसरे काम म्हणजे घाणीची विल्हेवाट लावणे. घाण खाण्याचं काम कावळा करतो आणि त्याचबरोबर कितीतरी पक्षांची अंडीसुद्धा फस्त करतो त्यामुळे एकप्रकारे त्यांची संख्या देखील नियंत्रित राहते. पण हे सर्व असतानाही म्हणजे घाण खात असतानाही त्याच्या विष्ठेतून मात्र अशा वड पिंपळाच्या झाडांची लागवड होते ज्या झाडांशिवाय निसर्गचक्र बिघडू शकते. आता हे कावळ्याला माहित असण्याची शक्यता तर दुरान्वयानेही नाही. जर माहित असते तर कदाचित त्याने ठरवले असते की आता ह्या विभागात भरपूर झाडे झाली चला आता पुढच्या चौकात झाडे लावू या. किंवा आतापर्यंत लावलेल्या झाडांचे मालकी हक्क माझ्याकडे आणि त्याची एवढी किंमत मनुष्यप्राण्याने द्यावी. शेवटी एवढा प्राणवायू (ऑक्सिजन) लोकांना फुकटात का द्यावा? तेही अशा लोकांना ज्यांना कुठल्याच गोष्टीची किंमत नसते.

पण तसं नाही आहे. ना कोकीळ त्याच्या आवाजातली जादू जाणतो ना कावळा त्याच्या विष्ठेची किमया. एखाद्या पशुपक्ष्याची विष्ठा म्हणजे घाणच त्यामुळे त्याचे कौतुक कोण कसे करणार? पण आमच्या ऋषीमुनींनी त्याचीही नोंद करून ठेवली वेंकटेश स्तोत्रात.

तसं बघायला गेले तर मनुष्यप्राणी आयुष्यभर झटतो स्वतःला वैशिष्टयपूर्ण बनविण्यासाठी तर कधी स्वतःच्या आयुष्याचा उद्देश जाणून घेण्यासाठी पण कित्येकवेळा जन्मामागून जन्म घेत राहतो आणि तरीही ते जाणणे त्याच्या आवाक्याबाहेरच राहते.

तेवढी धडपड न करता निसर्गचक्रावर विश्वास ठेऊन आपली कर्तव्ये पार पाडत गेलो तर, नाही चालणार का? एकवेळ कोकीळ आपले वैशिष्ट्य समजेल जर कुणी सांगितले की आवाज मस्त आहे पण...
पुन्हा स्पर्धा आहेच कारण आवाज तर सर्व कोकिळांचा चांगलाच असतो. आणि कावळ्याचं काय जो जास्त घाण खाईल आणि जास्त विष्ठा करेल तो सर्वोत्तम?

खाणे आणि विष्ठा ही तर नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यात विशेष ते काय? पण निसर्गाने सर्वानाच विशिष्ट बनवले आहे आणि एका उद्देशानेच आपला जन्म झालेला असतो आणि तो उद्देश सफल झाला की मृत्यू ठरलेलाच.

पण आमचे आयुष्य जाते त्या धडपडीत आणि जर नाहीच तर आम्ही तुलना करायला लागतो स्वतःची इतरांशी किंवा कावळा आणि कोकिळेशी सुद्धा. कारण आम्हाला वेगळेपण जपण्यापेक्षा दाखविण्यामध्ये जास्त रस असतो. कावळा किंवा कोकिळाला तो जपावा लागत नाही तर तो नैसर्गिकरित्या असतो त्यांच्याकडे.

ह्या भूतळावरच्या प्रत्येक प्राणिमात्राकडे तो आहे, अगदी मनुष्यप्राण्यात सुद्धा. पण आम्ही भलेही प्राणी असलो तरीही मनुष्यप्राणी आहोत आणि बुद्धी आहे आमच्याकडे त्यामुळे आम्हाला माहित असायलाच हवे, नाही का?

कदाचित तो उद्देश तुम्हाला आयुष्यभर कळणार नाही पण उद्देश तर असतोच. त्यामुळे नाहक धडपडत बसण्यापेक्षा आपले कर्म करत आयुष्याचा उपभोग घेत जाणे कधीही उत्तमच, नाही का?

Shailesh Tandel

Life Coach | Business Mentor | Corporate Trainer | Success Coach | Time Management Coach | Relationship Coach | Searchlight Within |

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in मंत्र यशाचा and tagged .

Leave a Reply