परदेशात स्थायिक होण्याचे फायदे आणि तोटे: एक महत्वपूर्ण मूल्यमापन

परदेशात स्थायिक होण्याचे फायदे आणि तोटे यांचे जे मूल्यमापन लाइफ कोच आणि बिझनेस मेंटॉर शैलेश तांडेल यांनी केले आहे त्यानुसार त्यामधील आव्हाने, संधी, कार्यसंस्कृती याबद्दल एक महत्वपूर्ण माहितीचा खजिना तुमच्यासमोर उघड होत आहे. तसेच परदेशात स्थायिक झाल्यानंतर तेथील लोकांसाठी तुम्ही कायम एक बाहेरचेच असता याची देखील जाणीव करून देतो.

त्याचबरोबरीने तुम्ही परदेशात स्थायिक व्हाल किंवा स्वतःच्याच देशात वास्तव्य कराल पण वैयक्तिक आणि व्यावसायिक निरंतर वाढीसाठी नक्की कोणत्या मानसिकतेची गरज आहे याची देखील जाणीव हा लेख करून देतो.

परदेशात स्थायिक होण्याची इच्छा ही नवीन गोष्ट नाही; हे अनेक दशकांपासून होत आहे. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे सर्वसाधारणपणे प्रमुख आकर्षणे आहेत. पण इतक्या लोकांना परदेशात का स्थायिक व्हायचे आहे? फायदे काय आहेत? आजमितीला आपल्या देशात भरपूर संधी आणि वाढीची क्षमता असताना परदेशात स्थायिक होण्याचा पर्याय का निवडावा? आपल्या देशात राहण्यापेक्षा ते कसे वेगळे असेल?

स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर लगेचच ब्रिटन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये अधिक चांगल्या संधी मिळविण्यासाठी देश सोडून जाणाऱ्या लोकांबद्दल मी समजू शकतो पण आता का? ब्रिटीश राजवट संपल्यानंतर, संघर्षशील नवस्वतंत्र भारताच्या तुलनेत परदेशात अधिक संधी आणि सुविधांसह चांगले जीवन जगण्यासाठी अनेकजण परदेशात स्थाईक झाले होते. एवढ्या वर्षानंतर लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे की अजूनही त्यांना चांगल्या संधी आणि आलिशान जीवनशैलीसाठी परदेशात स्थायिक व्हायचे आहे, की यादीत इतरही अनेक घटक जोडले गेले आहेत?

लाइफ कोच आणि बिझनेस मेंटॉर या नात्याने माझ्या लक्षात आले आहे की लोकांना विविध कारणांसाठी परदेशात स्थायिक व्हायचं असतं. काही जण चांगल्या जीवनशैलीच्या आशेने प्रेरित असतात, तर काहीजण काहीही करून करिअरचा आलेख उंचावत न्यायचा असतो आणि अशी संधी जरी एखाद्या दुसऱ्या देशात कायमचे स्थिरस्थावर व्हायची असली तरीही त्यांना ती संधी सोडायची नसते. यात अशाही श्रेणीचे लोकं असतात ज्यांना त्यांची खरी लायकी इतरांसमोर सिद्ध करायची असते. तर असेही अनेक तरुण-तरुणी असतात ज्यांना थोरामोठ्यांचा त्यांच्या आयुष्यातील हस्तक्षेप टाळून त्यांच्या स्वत्वाचा व आणि स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी खूप दूर जायचे असते. तथापि, बहुतेक वेळा, त्यांना हे माहित नसते की स्वातंत्र्य कधीच एकटे येत नाही तर येताना तेवढीच मोठी जबाबदारी देखील घेऊन येते त्यामुळे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की परदेशात स्थायिक होणे हा दिसतो तेवढं सोपा निर्णय नाही. म्हणून त्या एका निर्णयामुळे होऊ शकणाऱ्या फायदा आणि तोट्याचा तटस्थपणे व काळजीपूर्वक विचार करणे अतिशय आवश्यक आहे.

ब्रिटीश राजवटीतनंतरही आपली शिक्षणपद्धती इंग्रजीतच सुरू राहिली, त्यामुळे भाषेमार्फत आपण ब्रिटन, अमेरिका यांसारख्या देशांशी चांगले जोडले गेलो आहोत आणि आता अनेकजण सध्याच्या व्यवहाराची आणि संवादाची गरज म्हणून फ्रेंच आणि स्पॅनिश देखील शिकत आहेत. नवीन भाषा शिकणे आणि एखाद्या देशात स्थिरस्थावर होण्यासाठी 20-30 लाख रुपये इतकी मोठी रक्कम गुंतवणे, लोकांचा दृढनिश्चय दर्शवते आणि हे खरोखरच उल्लेखनीय आहे.

अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे अत्यंत कठीण आहे आणि अनेकदा मिळतही नाही त्यामुळे अनेकांसाठी अमेरीकेनंतरचा सर्वोत्तम पर्याय कॅनडा बनतोय. कॅनडामध्ये स्थायिक होण्याबद्दल तरुणांना आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याची कार्यसंस्कृती, दर आठवड्याला सुमारे 30 ते 40 तासांचे कामाचे तास. ओव्हरटाइमची भरपाई केली जाते आणि कामाच्या तासांनंतर वैयक्तिक वेळेचा आदर केला जातो. कॅनडा हा भौगोलिकदृष्ट्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, ज्याची लोकसंख्या अंदाजे चार करोड आहे, तरीही जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तो नवव्या क्रमांकावर आहे.

आपल्या देशात, कागदावर कामाचे तास निश्चित असले तरी, प्रत्यक्षात कामाचे तास जास्त असतात आणि कित्येकदा सुट्टीच्या दिवशी काम केले जाते, परिणामी वैयक्तिक आणि कौटुंबिक वेळेवर मर्यादा येते. लोकं जीवापाड मेहनत करतात पण तरीही त्यांना मिळणारा मोबदला पुरेसा असतोच असे नाही त्यामुळे इतरत्र चांगले पर्याय शोधणे स्वाभाविक आहे. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ही परिस्थिती सर्वत्र समान आहेच असे नाही. खूप साऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सप्ताहातून फक्त ५ दिवस आणि निश्चित कामाचे तास ठरलेले असतात पण तरीही आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त काम करावेच लागते. हे अतिरिक्त काम मनापासून करावे म्हणून त्या कामाचा वेगळा मोबदला दिला जातो जे प्रोत्साहनाचे काम करते. तसेही आपल्यासारख्या विकसनशील देशात, सर्व संस्थांसाठी सार्वत्रिक पाच-दिवसीय वर्क वीक किंवा ठराविक वेळा असणे व्यवहार्य नाही कारण काम केल्याने कंपनी आणि देशाचा फायदा तर होतोच पण त्याचबरोबरीने वैयक्तिक वाढ देखील ठरलेली असते.

गेल्या १०० वर्षांत अंदाजे १२ ते १४ वेळा अमेरिकेला सतत मंदीचा सामना करावा लागला आहे. तथापि, आपण अद्याप एकदाही मंदीचा अनुभव घेतलेला नाही. जागतिक महामारीच्या म्हणजे कोरोनाच्या काळातही आपली अर्थव्यवस्था वाढतच राहिली आणि ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली. सततच्या जगण्याच्या संघर्षाने आम्हाला मौल्यवान धडे आणि प्रत्यक्ष अनुभव दिला आहे, जो आपल्या वाढीस हातभार लावतो आहे. आपली संस्कृती आणि बचत करण्याच्या सवयींनीही यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आत्मकेंद्रित होण्याऐवजी, आम्ही सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीच्या संधी निर्माण करत आहोत.

तुम्ही कोणत्याही देशाचे का असेना पण जर का तुम्ही फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्वतःचा दीर्घकालीन नुकसान तर करतच आहात पण त्याचबरोबर कंपनी आणि राष्ट्राला देखील ते हानिकारकच ठरते. आपली मुल्ये आपल्याला अतिरिक्त अन्न वाया घालवण्यापासून प्रतिबंधित करतात त्यामुळे कित्येकदा पोट गच्च भरलेले असतानाही ते अतिरिक्त अन्न फेकून न देता आपण जबरदस्ती संपवून टाकतो. जिथे अतिरिक्त अन्न फेकून देणे आमच्या मूल्यात बसत नाही तिथे उपयोग संपला म्हणून एखाद्या व्यक्तीला वापरून फेकून देण्याचा प्रश्नच येत नाही. परदेशात वापरा आणि फेकून द्या ही संस्कृती सर्वमान्य आहे पण आपली मूल्य प्रणाली वापरा आणि फेकण्याच्या मानसिकतेला परावृत्त करते.

ChatGPT किंवा Google Bard सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनामुळे येत्या काही वर्षांमध्ये जगभरातील नोकऱ्यांच्या बाजारपेठेत लक्षणीय बदल होणार आहेत. अमेरिका किंवा कॅनडा सारख्या देशांमध्ये तुम्ही निश्चित कामाच्या तासांचा आनंद घेऊ शकता, परंतु नोकरीची सुरक्षितता एक आव्हान बनू शकते आणि या बदलांना आम्ही भारतीय देखील अपवाद असणार नाही. परदेशात इमिग्रेशनसाठी वय, शिक्षण, अनुभव आणि भाषा प्रवीणता यासारखे काही निकष आहेत. याव्यतिरिक्त, नवीन देशात स्वत:ला स्थिरस्थावर करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. तथापि, आपल्या देशात नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसायासाठी देखील याच सर्व गोष्टींची गरज असते, बरोबर ना?

नवीन जागी स्थायिक होणे म्हणजे केकवॉक नाही आणि त्यात जोखीम आणि संभाव्य अडथळे विचारात घेणे महत्त्वाचे असते. एवढी मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी आणि आपले जीवन धोक्यात घालण्यापूर्वी संभाव्य फायदा आणि नुकसानाचे मोजमाप करणे आवश्यक असते. योग्य गणित न जुळवता बहुतेकवेळा लोकं आरामशीर कार्यसंस्कृतीच्या स्वप्नांच्या मागे पळत जातात आणि शेवटी स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्याच स्वप्नांशी तडजोड करून अपरिचित भूमीत मर्यादित संसाधनांसह जगण्यासाठी संघर्ष करत बहुतेकवेळा कोलमोडतात. तसेही, एकदा का एवढे मोठे भांडवल गुंतवले की मायदेशी परतण्याचे सर्व मार्ग बंद होऊन जातात.

जर तुमच्याकडे एक विशिष्ट प्रतिभा किंवा कौशल्य असेल ज्याची त्या देशात त्याक्षणी जास्त मागणी आहे तरच त्या वेळेपुरता तुम्हाला तिथे सामावून घेण्याची शक्यता असते आणि गरज सरल्यानंतर ज्या देशात तुम्ही स्थलांतरित झाला आहात त्या देशात तुम्हाला नेहमीच बाहेरचे म्हणूनच समजले जाण्याची शक्यता जास्त असते.

निवासी अपार्टमेंट्सच्या उच्च किमती आणि मोलकरीण किंवा प्लंबर सारख्या सेवा घेताना तुमचे मासिक बजेट देखील कोलमडू शकते कारण तिथे स्वस्त असे काहीच नाही. परिणामी, तेथे बाहेरून स्थाईक झालेले लोकं आणि तेथील नागरिक स्वतःच सर्वकाही करतात. कामाचे निश्चित तास असूनही, तेथील स्थानिक लोकं जशी कुटुंबापासून वेगळे एकटेच राहतात त्याप्रमाणेच तुम्ही देखील राहायला लागल्यामुळे एकाकीपणाची भावना देखील वाढू शकते. आपली भारतातली जीवनशैली तेथील स्‍थानिक लोकांच्‍या विपरीत असल्याने अशा परदेशी संस्कृतीशी जुळवून घेऊन ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे हा एक आव्हानात्मक आणि स्वकेंद्रित प्रयत्न असू शकतो आणि त्यामुळे स्थलांतरित म्हणजेच बाहेरचे असण्याची ही भावना आणखी मजबूत होते.

आपल्या देशाच्या तुलनेत परदेशात उपलब्ध असलेली कार्यसंस्कृती आणि संधी आकर्षक वाटतात, पण ही धारणा सत्यावर आधारित आहे की निव्वळ भ्रमावर आहे, असा प्रश्न पडणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या देशाची आश्चर्यकारक वाढ आणि ते देत असलेल्या संधींमुळे अनेक लोकं मातृभूमीस परतण्यास प्रवृत्त झाल्या आहेत आणि कितीतरी देशाच्या निरंतर विकासात आपले योगदान देत आहेत. याव्यतिरिक्त, परदेशाच्या तुलनेत वैद्यकीय खर्च लक्षणीयरीत्या कमी असूनही त्याची गुणवत्ता सर्वोत्कृष्ट आहे त्यामुळे कितीतरी देशातील लोकं भारतात मेडिकल हॉलिडेजवर येतात.
आपल्या स्वतःच्या देशात आपण आपल्या प्रियजनांनी वेढलेले असतो आणि त्यामुळे स्थिर जीवन प्रस्थापित करणे सोपे होते, मग तो रोजगार असो अथवा स्वतःचा व्यवसाय.

नक्कीच, एकटेपणा, असुरक्षित किंवा फसवणूक यासारखी आव्हाने कुठेही उद्भवू शकतात, परंतु आजूबाजूच्या परिस्थितीशी आणि कार्य करण्याच्या पद्धतीशी तुम्ही परिचित असल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा मुसंडी मारू शकता. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुम्ही अतिजलद पुनर्प्राप्ती करू शकता. तुम्ही कोणत्याही देशात राहा पण निरंतर वाढीची मानसिकता असणे अतिआवश्यक आहे. इतरांच्या पाठिंब्यावर पूर्णपणे विसंबून न राहता ही मानसिकता तुम्हाला चमत्कार घडवण्यास आणि अज्ञात ठिकाणी किंवा नवीन देशात भरभराट करण्यास सक्षम करते.

मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे त्यांच्या पालकांचे अंतिम संस्कार करण्यासाठी परत येऊ शकलेले नाहीत किंवा त्यांच्या जवळच्या कुटुंब किंवा मित्रांसोबत सण साजरे करण्यास चुकतात, आणि या अशा गोष्टी आहेत ज्यांचे त्यांच्या हृदयातील स्थान खूप मोठे असते. अशावेळी जरी शक्य असले तरीही त्या मायदेशी जाऊन परत येण्याचा तो प्रवासाचा खर्च खूप जास्त असतो त्यामुळे ते परवडणे कठीण असते. तर काहीवेळा त्यात जाणाऱ्या वेळेमुळे नोकरीधंद्यात होणारे नुकसान भरून काढण्याच्या पलीकडे आहे असे कित्येकांना वाटते आणि ते खरेच परवडण्याच्या पलीकडे असते. अशावेळी या गोष्टीवर नक्कीच प्रकाश पाडला गेला पाहिजे की त्यांनी ज्या अफाट संपत्तीच्या मोहात परदेश गाठले तो उद्देश खरोखर पूर्ण झाला का? असंख्य त्याग करूनही, त्यांच्या अनुपस्थितीचे कारण जर त्यांची आर्थिक चणचण असेल तर परदेशात स्थायिक होऊन त्यांनी नेमके काय साध्य केले, असा प्रश्न निर्माण होतो.

तथापि, लाइफ कोच आणि बिझनेस मेंटॉर या नात्याने जे मी सांगतोय ते तुम्ही कायम लक्षात ठेवा, की जेव्हा केव्हा तुम्ही आपल्या मायदेशात परत याल त्यावेळी तिथे देखील काही आव्हाने तुम्हाला पेलावी लागतील. तुमच्या आजूबाजूला ओळखीची आणि तुमच्यावर प्रेम करणारी लोकं असतील आणि तरीही काही अडचणी तुमच्या रस्त्यात आडवी येणार आणि त्यांना पार करावे लागणार. तर काहीवेळा, परदेशात लक्षणीय कालावधीसाठी राहिल्यानंतर आपल्या मूळ देशात परत आल्यानंतर आपल्याच मातृभूमीत तुम्हाला स्वतःला किंवा इतरांना तुम्ही परके वाटणे साहजिक आहे कारण तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेले असेल. कदाचित समाज बदलला असेल, आणि तुमच्या अनुपस्थितीत झालेल्या सांस्कृतिक बदलांशी तुम्हाला जुळवून घ्यावे लागेल.

तुम्ही कोणत्याही देशात राहा पण निरंतर वाढीची मानसिकता असणे अतिआवश्यक आहे इतरांच्या पाठिंब्यावर पूर्णपणे विसंबून न राहता हे तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात चमत्कारीत बदल घडवण्यास आणि अज्ञात ठिकाणी किंवा नवीन देशात भरभराट करण्यास सक्षम करते.

परदेशात जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, त्या निर्णयामागे नक्की काय उद्देश आहे हे तपासून पहा आणि त्याचबरोबरीने तशीच समान संधी आणि फायदे आपल्या देशातही उपलब्ध आहेत का हे स्वतःला विचारणे महत्वाचे आहे. बहुतेकवेळा आपल्याला दुसरीकडचे गवत अधिक हिरवे दिसते आणि आपल्याकडचे सुकलेले. परंतु प्रत्यक्षात, गवत अधिक हिरवे असते तिथेच असते जिथे आपण त्याला योग्य खतपाणी घालून व्यवस्थित पालनपोषण करतो.

त्यामुळे आत्मकेंद्रित न होता सर्वांना लाभदायक असे जीवन जोपासण्यावर भर द्या. हे साध्य करण्यासाठी निरंतर वाढीची मानसिकता आणि तीही सर्वांसाठी असणे महत्त्वाचे आहे.

शेवटी, कामानंतर आणि आठवड्याच्या शेवटी उपलब्ध असलेला वेळ तुम्ही कसा घालवाल याचा विचार करा. हे एक नवीन आव्हान आहे ज्याला तुम्ही सामोरे जाल, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा याचा विचार करा आणि जीवन आनंदमयी बनवा.

Blog by ‘Life Coach and Business Mentor’ Shailesh Tandel

Know More About Life Coaching and Business Mentoring Sessions

Topics that may interest you to develop your life skills…

Anger Management | Business Mentor | Clarity Of Purpose | Confidence and Self Esteem | Decision Making Ability | Effective Communication Skills | Emotional Balance | Excelling In Life | Executive Coaching | Goals: Setting and Achieving | Leadership Development | Living Passionately | Overcoming Fear Of Failure | Parenting | Relationship Coaching | Searchlight Within | Self Confidence | Self Esteem | Stress Management | Success Mantra | Time Management |

Posted in Living Life Fully and tagged .

2 Comments

Leave a Reply