उद्योजकाची शिस्त

कोणत्याही कंपनीचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’ आणि त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते.

शिस्त असेल तर प्रत्येक गोष्ट एका ठराविक नियोजनानुसारच घडत असते. नियोजन नसेल तर एखादवेळ नशिबाने यश मिळेलही पण तीच किमया कायम साधणे शक्य नसते. शिस्त नसेल तर जिंकणे फक्त नशिबाचाच भाग असू शकतो आणि अशा कंपनीवर कुणी विश्वासही ठेवत नाही कारण उगाचच कुणी स्वतःला खड्ड्यात का म्हणून घालणार कारण शेवटी प्रत्येकाला काहीही झाले तरीही फक्त आणि फक्त फायदाच हवा असतो; नुकसान तर कुणालाच नको असतो. बरोबर आहे ना?

व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या गुंतवणुकीसाठी देखील काय काय करावे लागते याचा विचार करून बघा मग ह्या गोष्टीचे गांभीर्य जाणवेल तुम्हाला. आर्थिक शिस्त नसेल तर बँकाच काय पण वैयक्तिक कर्जही न मिळण्याची नामुष्की येते कित्येकदा आमच्यावर. पण जर का तुम्ही एका शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असाल तर वर्तमानात जरी नुकसान होत असेल तरीही भविष्यातील फायदा लक्षात घेऊन लोकं रांगा लावतात आपल्या मागे. पण जर शिस्त नसेल तर जेवढे दिवस किंवा वर्ष तुम्ही उद्योगात टिकलेले असाल तो तुमच्या कर्तुत्वाचा कमी आणि नशिबाचाच भाग जास्त असेल.

तुमच्या मनात आले आणि तुम्ही घोड्यावर मांड टाकली असे नाही होत कारण घोडा जरी एक मूक प्राणी असला तरीही त्याला माणसाच्या दहापट बळ असते त्यामुळे कुणीही मन केलं म्हणून त्याच्यावर स्वार होऊ नाही शकत. जर कुणी जबरदस्ती स्वार झालाच तर तो घोडा त्या माणसाला कुठच्या कुठे फेकून देतो पण जर का त्याला प्रेमाने गोंजारले आणि भावना जुळल्या तर मात्र तुम्हाला पाठीवर बसवून जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल आणि तुमच्यासाठी महाराणा प्रतापांच्या चेतकाप्रमाणे पूर्ण ताकदीनिशी पळेल. तुमच्या सेवेत सदैव तत्पर.

आपला उद्योगधंदा तरी कुठे त्या घोड्यापेक्षा वेगळा असतो? तिथे घोडा नसतो तर असतात हाडामासाची जिवंत माणसे आणि त्याचबरोबर आपली आर्थिक व मानसिक गुंतवणूक. ज्याप्रमाणे घोड्याला गोंजारावे लागते आणि वेळप्रसंगी छडी मारावी लागते, तसंच काहीसे पण एक शिस्त लागणे गरजेचे असते त्याशिवाय उद्योग प्रगती करूच शकत नाही. तुम्ही कितीही मेहनती, कुशल किंवा ज्ञानी असाल पण एकट्याच्या जीवावर उद्योग एका मर्यादेपर्यंतच वाढवू शकता.

वरील सर्व गुणांचे महत्व नक्कीच आहे पण सर्वात महत्वाचे असते ‘शिस्त’ आणि ती शिस्तबद्धता सर्वप्रथम उद्योजकात असावी लागते तरच ती हाताखालच्या किंवा संपर्कात येणाऱ्या लोकांत पसरू शकते.

एखादे काम एका शिस्तबद्ध पद्धतीने सातत्याने करत राहिलो तरच त्यात लयबद्धता येते. फक्त एकदाच किंवा जेव्हा मन करेल तेव्हाच केल्याने ती येण्याची सुतराम शक्यता नसते. शिस्त तशीही एका दिवसात नाही लावता येत, तर त्यासाठी सातत्याने ते करत राहणे गरजेचे असते. नाहीतर महिन्यातून एकदा व्यायाम कराल आणि तरीही वाढलेले पोट कमी होत नाही अशी तक्रार करत बसाल. तसं पाहिले तर तक्रार करणे खूप सोपे असते पण शिस्तबद्ध पद्धतीने एखादे काम सातत्याने वर्षानुवर्षे करत राहणे मात्र खूपच कंटाळवाणे. जे हे कंटाळवाणे काम विनातक्रार वर्षानुवर्षे करत राहतात त्यांच्या पायाशी यश लोटांगण घालते.

टाटा-बिर्ला असो वा अंबानी-अदानी किंवा अगदी छोटासा उद्योजक त्यांना यश मिळवण्यासाठी हे कंटाळवाणे काम कायमच करावे लागते. मग ते त्यांना आवडत असो वा नसो पण जर यश फक्त एकदोनदा नव्हे तर कायमच मिळवत राहायचे असेल आणि तेही पहिल्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने तर मग शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही भाराभर माणसे कामाला ठेवले म्हणजे टीम झाली आणि त्यांच्याकडून काम मिळाले असे नसते तर जेवढी गरज आहे तेवढीच माणसे ठेऊन त्यांची कुवत पूर्णपणे वापरता येणे महत्वाचे असते आणि त्यांच्या कुवतीचे ज्ञान तुम्हाला तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तुम्ही स्वतः एका शिस्तीत काम करता आणि तुमच्या हाताखालील लोकांना त्यासाठी प्रवृत्त करून त्यांना प्रशिक्षित करता.

हे आम्हालाही पक्के ठाऊक असते की आयुष्यात पुढे जायचे असेल आणि संपादन केलेले यश टिकवायचे असेल तर शिस्त हवीच. जाणतो आम्ही हे सर्व आणि हे ज्ञान काय नवीन नाही आहे आमच्यासाठी, पण...

हे माहित असतानाही कितीजण एका शिस्तीत सतत कार्यरत असतात?

शिस्त शिस्त शिस्त, काहीतरीच काय? नेहमीच काय त्याचे तुणतुणे वाजवायचे? आणि कोण म्हणतो की आम्ही शिस्तीत काम नाही करत? यश अपयश तर येतजातच असतात उद्योगधंद्यात मग त्याचा का म्हणून एवढा बाऊ करायचा?

तसेही शिस्त फक्त आणि फक्त हाताखालील कामगारांसाठी आणि आमच्या व्यतिरिक्त इतर सर्वांसाठी असते; उद्योजकासाठी तर नक्कीच नसते.

शिस्तीचे वावडे असते आम्हाला असे मुळीच नाही पण नोकरीतून उद्योगात येण्याचे कित्येकांचे प्रमुख कारण बहुतांशी हेच तर असते की त्यांना कोणत्याही बंधनात अडकून राहायचे नव्हते आणि म्हणूनच तर ते उद्योगात उतरले होते, नाही का?

शिस्त म्हणजे बंधनच आणि आम्हाला तर पूर्ण स्वातंत्र्य हवे असते आपल्या मनाप्रमाणेच सर्वकाही करण्याचे. ज्यावेळी वाटेल त्यावेळी करायचे नाहीतर नंतर केले तरी काय फरक पडणार आहे शेवटी उद्योजक म्हणजे आम्ही आमच्या मनाचे राजे.

हो नक्कीच तुम्ही राजे पण कशीही मनमानी केली तर त्या राजाचा रंक किंवा मांडलिक राजा व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण त्या राजाचे साम्राज्य सर्वदूर पसरून त्या राजाचा सम्राट व्हायला मात्र खूप वेळ लागतो आणि ते शक्य होते उद्योगात उतरल्यापासून एका शिस्तबद्ध प्रवासानेच.

एकदा मागे भूतकाळात जाऊन विचार करून बघा की ज्या ज्या वेळी तुम्हाला यशप्राप्ती झाली होती ती तुमच्या मनमानी कारभाराचे फलित होते की तुमच्या चुकीच्या कर्मांमुळे त्यावेळी मिळालेल्या फटक्यांनी काही काळाकरता तुम्ही सुतासारखे सरळ झाला होतात आणि यश संपादन केल्यावर पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या...

आयुष्य जर नियोजनबद्ध नसेल आणि मेहनतीत सातत्य नसेल तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नकोसे आहे. फक्त मोठीमोठी स्वप्ने पाहून किंवा जे हवं ते मी कधीच प्राप्त केलेय अशा कल्पनेच्या जगात वावरून फक्त वल्गना केल्याने जे हवे ते नाही प्राप्त करता येत. तसे असते तर दिवास्वप्ने पाहणारी प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश असती, नाही का?

आमची समस्या अशी आहे की आम्हाला सर्वकाही लगेचच हवे असते अगदी कोणत्याही नियोजनाशिवायच. जणूकाही आम्ही उद्योगात उतरल्याबरोबरच यश आमच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे.

एखाद दुसऱ्याच्या बाबतीत हे खरे असूही शकते पण बहुतेकांच्या बाबतीत तुमच्या कितीही ओळखी असल्या आणि तुम्ही त्याच क्षेत्रातील जाणकार जरी असलात किंवा तुमचा कितीही वर्षांचा नोकरीचा अनुभव जरी असला तरीही जोपर्यंत तुम्ही नोकरी सोडल्यानंतर व्यवसायात स्थिरस्थावर होत नाहीत तोपर्यंत लोकं तुमच्यासोबत धंदा करायला धजावत नाहीत कारण तुमचा कामाचा अनुभव वेगळा आणि उद्योग हाताळण्याचा अनुभव वेगळा असतो. नोकरीत कुणीतरी तुमच्याकडून काम करून घेत होते किंवा तुम्ही कुणाला तरी उत्तरे देणे बंधनकारक होते त्यामुळे एक शिस्त कायम होती पण तुम्ही स्वतःच उद्योजक झाल्यावर तुमची नवीन कार्यपद्धती आणि एकंदरीत शिस्तबद्धता जाणणे क्रमप्राप्त असते.

तुम्हाला उद्योगात कितीतरी वर्षे झाल्यानंतरही जर काही लोकं तुम्हाला धंदा द्यायला कचरत असतील तर समजून चाला की त्यांचा अजूनही तुमच्यावर विश्वास बसलेला नाही कारण व्यवसायातील आवश्यक असणारी शिस्तबद्धता कदाचित दूरपर्यंत त्यांना कुठेही दिसत नसेल.

प्रत्येकवेळी त्यांच्याप्रमाणेच तुम्हाला स्वतःला जुळवून घ्यायचेच आहे असे नाही; तसे कराल तर आयुष्य खर्ची पडेल प्रत्येकाला खुश करण्यासाठी. इथे फक्त एकाच गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे ध्येय निश्चिती आणि त्यानुसार स्वतःला शिस्त लावून घेण्याची.

कोणतीही कंपनी फक्त नशिबाच्या जीवावर किंवा कुणाला फसवून वगैरे लांबचा पल्ला नाही गाठू शकत. ते शक्य होते फक्त आणि फक्त ध्येय निश्चित करून त्यावर शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःला झोकून दिल्यामुळेच.

Life Coach | Business Mentor | Corporate Trainer | Time Management Coach | Relationship Coach | Professional Mentor | Soft Skill Trainer | Life Skills Trainer | Searchlight Within | Entrepreneur | Discipline |

Shailesh Tandel

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in मंत्र यशाचा and tagged , , .

Leave a Reply