शैलेश तांडेल

व्यवसाय सुरु करायचा विचार करताय?

सोमवार म्हणजे रविवारची सुट्टी मनसोक्त उपभोगल्यानंतर अंथरुणातून उठण्याचा कंटाळा किंवा जबरदस्तीने उठण्याची सजा किंवा काहीतरी मनाविरुद्ध, वगैरे वगैरे वगैरे...

सोमवारी कामावर जाण्याचा कंटाळा माझ्या बाबतीत कधीच नव्हता कारण कामे टाळण्याचा स्वभाव अगदी सुरुवातीपासूनच नसल्याने सर्वच दिवस माझ्यासाठी सारखेच.

हे सांगायचं कारण म्हणजे, आजच्याच दिवशी ३२ वर्षांपूर्वी सोमवार दिनांक ६ मार्च १९८९ या दिवशी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर मी व्यवसायाचा श्रीगणेशा केला होता.

त्यावेळी माझ्या वयाची २० वर्षे देखील पूर्ण झालेली नव्हती. व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता आणि गाठीशी जेमतेम खर्च करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी देखील पुरेसे पैसे नसतानाही मी त्या काळ्याकुट्ट अंधारात उडी मारली होती. भाबड्या आशेवर मारलेली ती उडी नव्हती, तर मी करू शकतो हा स्वतःवरचा विश्वास आणि वाटेल तेवढी मेहनत करण्याची तयारी. जे हवे ते मिळविण्यासाठी घेतलेली ती झेप होती आणि काहीही झाले तरीही मागे परत न फिरण्याचा ठाम निश्चय.

उद्योग प्रामाणिकपणे करता येतो यावर मी त्यावेळीही ठाम होतो आणि आजही आहे. तुम्ही प्रामाणिक आहात किंवा लोकांशी चांगले वागता म्हणून जग देखील तुमच्याशी प्रामाणिक राहील व चांगले वागेल या समजुतीला लवकरच तडा गेला होता. पण जशास तसे वागायचे म्हणून प्रामाणिकपणा सोडायचा असे कधी झाले नाही, पण कुणी फायदा घेण्याची हिम्मत करणार नाही अशाप्रकारे वागायला नक्कीच शिकलो.

आश्चर्य वाटेल पण सुरुवातीपासूनच एका गोष्टीवर ठाम होतो की, आकाशाला हात लावायचा आहे पण पाय घट्टपणे जमिनीत रोवूनच. कदाचित त्यामुळेच डोक्यात कधीही हवा शिरली नाही. आणि शिरली आहे असे जेव्हा जेव्हा वाटले त्या त्या वेळी डोकं रिकामे करत स्वतःला जमिनीवर आणत गेलो.

कितीतरी अडचणी आणि कष्टांना हसतमुखाने सामोरे गेलो पण चुकूनही लबाडी केली नाही कदाचित त्यामुळेच आजही मनमोकळेपणे हसू शकतो.

खरेतर महाशिवरात्र हा मुहूर्त देवाच्या कृपेनेच मिळाला होता. ठरवून त्या मुहूर्तावर उद्योगात उतरलो असे नव्हते तर त्या दिवशी सोमवार आहे म्हणूनच तो दिवस निवडला होता आणि सुदैवाने महादेवाचा आशिर्वाद देखील प्राप्त झाला.

११ वर्षांपूर्वी सर्चलाईट विधीन चालू करताना मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच नवीन वर्षाचा विचार करूनच ती गुढी उभारली होती. तसेही हिंदू परंपरा आणि सभ्यतेचा सार्थ अभिमान आहे मला आणि मराठीत कार्यशाळा घ्यायच्या हे ठरवूनच तो दिवस मी निवडला होता.

गेल्या ३२ वर्षांमध्ये खूप काही पाहिले आणि अनुभवले त्या सर्वांचा लेखाजोगा करताना एवढे नक्की सांगेन की खूप काही मिळवलेच आहे मी. मग तो पैसा, मानसन्मान असो वा लोकांचे प्रेम.

सहसा लोकं चाळीशी पार केल्यावर कामाचा व्यवस्थित अनुभव घेतल्यावर किंवा हातात मुबलक पैसा आल्यावर थोडीफार जोखीम घेण्याचा विचार करतात. जर परतावा मिळाला तर आणखी जोखीम घेतात अगदी शेयर बाजारात घेतात तशीच. खरेतर शेयर बाजारात कमावणारे तेच असतात जे पूर्णवेळ त्या कामाला देऊन व्यवस्थित अवलोकन करून गुंतवणूक करत असतात. जे बाजार वर जायला लागल्यावर खूप पैसा कमवायला मिळणार या लालसेने येतात ते सहसा बाजार आपटायला लागला की जे मिळेल ते घेऊन धडाधड बाहेर पडायला लागतात; बहुतेकवेळा नुकसान सहन करूनच.

उद्योगात उतरणे म्हणजे लॉटरी काढण्यासारखे देखील नाही आहे की लागली तर लागली. उलटपक्षी जिथे तुम्ही ८/१० तास काम करत होता तिथे कदाचित १५/१६ तास काम करायची तयारी असावी लागते. सोमवार, रविवार किंवा आराम वगैरे सर्वकाही विसरायचं असतं. रात्रीचा दिवस करावा लागतो आणि तीही कदाचित सुरवातीची काही वर्षे बिनपगारी काम करत.

कुणी मदतीला सोडा, साधे मनोबल वाढवण्यासाठी देखील कदाचित कुणीच नसेल त्यामुळे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही एकटेच तुमच्या स्वतःचे.

कदाचित काहीजण तुमच्या नितींचा विरोधही करतील पण प्रत्येक विरोध करणारी व्यक्ती तुमची शत्रूच आहे असेही नसतं. कित्येकांना तुमची खरोखरच काळजी वाटत असते. शेवटी सतत येणारे अपयश सर्वांनाच पचवता येते असेही नाही त्यामुळे काही काळजीचे स्वर उमटणे साहजिक आहे आणि जर ते स्वर नसतील तर तुम्ही लोकांच्या खिजगणतीत देखील नाही आहात एवढे ध्यानात घ्या. आणि ही तुमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब असावी कारण तुम्ही लोकांसाठी अस्तित्वात देखील नाही आहात.

या सर्व गर्दीत जो कुणी तुमच्या बाजूने देवासारखा उभा राहिला असेल त्या व्यक्तीला मात्र आयुष्यभर जपा. कारण जर ती व्यक्ती नसती तर कदाचित तुम्ही जिथे पोहोचला असाल तिथपर्यंत मजल मारूच शकला नसता.

पुन्हा एकदा सांगतो, जे हवं ते मिळविण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची तयारी असेल तर आणि तरच व्यवसायात उतरा; नाहीतर कुंपणावरून देखील खाली उतरून जे करत आहात ते करत धन्य व्हा. उगाचच आयुष्यभराची मिळकत फटाक्यां सारखी वाजवून एकदाच उडवू नका.

डोळ्यावर पट्टी बांधून जोखीम घ्यायची नसते तर ती जोखीम मोजून मापून घेतलेली असावी हे खरे पण एकदा का ध्येय ठरले आणि ते मिळविण्यासाठी मैदानात उतरल्यावर मागेही फिरायचं नसतं, मग ते मैदान कुस्तीचे असो वा उद्योगाचे. दोन पावले मागे यायला हरकत नसते पण रिंगण सोडून पळून जायचं नसतं, अगदी काहीही झाले तरीही.

मनाची तयारी असेल तरच उतरा मैदानात आणि मैदानात उतरल्याशिवाय स्वतःची ताकद तशीही कळत नाही .

आणि तसेही कुंपणावर बसण्यात कसली आली आहे मजा, नाही का?

Blog by Life Coach & Business Mentor Shailesh Tandel

Life Coach | Business Mentor | Corporate Trainer | Executive Coaching | Time Management Coach | Relationship Coach | Anger Management | Emotional Balance | Self Confidence | Leadership Development | Professional Mentor | Soft Skill Trainer | Life Skills Trainer | Searchlight Within |

Time Management
Life Coaching & Business Mentoring
45 Days Vel Anmol Workshop
Mantra Yashacha 3 days
Time Management 45 Days
previous arrow
next arrow
Posted in मंत्र यशाचा and tagged .

Leave a Reply