महिला दिवस

महिला दिवस…फक्त एकच दिवस

महिला दिनानिमित्त जे काही विनोद चालतात त्यापैकी एक म्हणजे वर्षातला सर्वात मोठा सोहळा, जो ८ मार्चला सुरु होऊन ७ मार्चला संपतो. विनोद ह्यासाठी कारण सहसा लोकं त्याच अनुषंगाने विचार करतात म्हणून.

वर्षातला एक दिवस महिला दिवस...फक्त एकच दिवस, ह्यापेक्षा मोठा विनोद आणि तो काय असेल.

पण प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड व्यक्तिमत्वाला व अफाट कर्तुत्वाला एका दिवसात सामावणे कसे शक्य असेल? पण ज्या पश्चिमी देशात कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे किंबहुना वेळ काढलाच जात नाही त्यांच्यासाठी एक दिवस म्हणजे देखील खूप मोठे दिव्य असते; नाही का?

जिला सामान्य म्हटले जाते अशी गृहिणी देखील कितीतरी गोष्टी एकाचवेळी हाताळत असते आणि त्या सामान्य वाटणाऱ्या स्त्रीचे वर्णन देखील काही शब्दांमध्ये करणे आम्हाला शक्य नसते. कदाचित तिला शब्दात मांडणे तेव्हा शक्य झाले असते जेव्हा तिला आपण समजू शकलो असतो पण तिला समजणे तेवढं सोप्पं नक्कीच नाही आहे.

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘Practice Makes a Man Perfect.’ (सरावाने माणसे (पुरुष) परिपूर्ण होतात). पण हेच स्त्रियांसाठी लागू होत नाही कारण त्या तर जन्मजात परिपूर्ण असतात कारण त्या ‘प्रवाही’ असतात.
जर थांबल्या तर त्याचं रुपांतर डबक्यात होतो पण एकाचजागी थांबणे हा सहसा त्यांचा गुणधर्म नसतो. एक चंचलता त्यांच्यात असतं आणि त्यामुळे उत्साह त्यांच्या वागण्या-बोलण्यात ओसंडून वाहत असतो.

उदाहरण पाहिजे असेल तर ज्या घरात मुली आहेत त्या घरातल्या सणांची रेलचेल पहा म्हणजे कळेल. मग तो कपड्यांसाठी हट्ट असेल किंवा तो सण उत्साहाने साजरा करण्यासाठी केलेली धडपड. अहो लहान मुली जाऊ द्या, अगदी स्त्रियांच्या त्या नवरात्रीच्या नऊ साड्या घालण्यातला उत्साह बघा. त्यांच्या सणासाठी केली धावपळ आणि त्याचबरोबर फराळ किंवा जेवणातील विविधता तर बघा, तेही कित्येकवेळा कमीतकमी वेळेत.

त्या मुली किंवा स्त्रियाच असतात ज्यामुळे प्रत्येक सण हा सण वाटतो आणि फक्त त्यांच्यामुळेच एखाद्या सोहळ्यात अशी काय रंगत येते की जी कधी संपूच नये असे वाटते.

आणि आता असे घर घ्या जिथे स्त्रियाच नाहीत म्हणजे मी जे बोलतोय ते तुम्हाला नक्की समजेल.

प्रवाह हेच आयुष्याचं मर्म आहे आणि स्त्रिया त्याचं जितेजागते उदाहरण. त्यामुळे त्यांना बदलायच्या भानगडीत पडू नका किंवा त्यांना दुखावू नका. किंबहुना त्या प्रवाहात स्वतःला सोडून द्या; आयुष्य मार्गी लागेल.

आमच्या भारतीय संस्कृतीत स्त्रीचे स्थान सर्वप्रथम आहे. तिच्याविना ह्या जगात काहीही शक्य नाही. जर घरातील स्त्री पाठीशी उभी नसेल तर संसार उभा राहणे सोडा, प्रगती साधणे देखील दिवास्वप्नच.

आणि जर तुम्ही नशीबवान असाल तर आई, आजी, बायको, मुलगी आणि सखी अशा कित्येक स्वरुपात ती नेहमीच तुमच्या सोबत असेल आणि त्यानंतर स्वप्नपूर्ती ठरलेली.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्त्री तुमच्यासाठी मोठ्यात मोठा डोंगर देखील पार करू शकते पण जर दुखावली गेली तर तोच डोंगर तुमच्या डोक्यावर पडलाच म्हणून समजा. तसं जर नको असेल तर तिला फक्त आणि फक्त प्रेमाने आणि सन्मानानेच वागवा आणि ती तुमचं आयुष्य आनंदाने भरून काढेल.

Posted in प्रेरणादायी, मंत्र यशाचा and tagged , , , .

Leave a Reply