मी मराठी

क्ष किंवा ज्ञ हे अक्षर कसे लिहावे या संभ्रमात एकेकाळी पडलो होतो मी आणि तेही महानगरपालिकेच्या मराठी शाळेतून शिक्षण घेतल्यावर. आणि हो रात्र महाविद्यालयात (नाईट कॉलेज) मध्ये त्यावेळी मी बारावीला होतो आणि बारावी पर्यंत मराठी हा विषय शिकवला जात होता तरीही...

१९८६ मध्ये एका कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागल्यावर सर्वकाही इंग्रजीत लिहिणे सुरु झाले कारण पार्सल वरील पत्ता इंग्रजीत आणि पावती बनवायची ती देखील इंग्रजीत. सर्व रेकॉर्ड्स बनवायचे तेही इंग्रजीतच.
कामाचा व्याप त्यावेळी एवढा होता की दिवसाचे १२-१४ तास काम करावे लागे आणि कामे अर्धवट सोडून देण्याची सवय मला तेव्हाही नव्हती आणि जे करतोय त्यात पूर्ण समरस होऊन जायचो त्यामुळे महिन्यातून जेमतेम ४-५ वेळाच कॉलेजला जायचो.

अशावेळी एक वयस्कर गृहस्थ डिलिव्हरीसाठी तेथे कामाला लागले पण त्यांना इंग्रजी पत्ते वाचणे कठीण जात होते म्हणून त्यांनी काही पत्ते मला मराठीत लिहून द्यायला सांगितले आणि क्ष आणि ज्ञ अक्षरांवर मी काही क्षणासाठी थबकलो कारण ते कसे लिहावे तेच कळेना. त्या संभ्रमातून बाहेर पडून ती अक्षरे लिहिल्यावर थोडं हायसं वाटलं पण थोडीशी लाजही वाटली.

त्यावेळी इंग्रजी ही व्यवसायातील भाषा होती आणि सर्व नोंदी (रेकॉर्ड) करण्यासाठी गरजेची होती. आज कंप्युटर आल्यावर सुद्धा त्यात काहीही बदल झालेला नाही.

त्यावेळी इंग्रजी बोलणे आणि समजणे मोठी गोष्ट होती त्यामुळे इंग्रजीत संभाषण करण्यासाठी धडपडत तुटक्या फुटक्या इंग्रजीत बोलायचो देखील. चुकलो तर कुणीतरी त्या जागी कोणता शब्द वापरला पाहिजे ते शिकवायचा आणि मग मी तो वापरायचो देखील पण तिथे माझी इंग्रजी मोडकीतोडकी आहे याची कधीही लाज वाटली नव्हती कारण माझ्यासाठी ती एक विदेशी कामचलाऊ भाषा होती जी मला नोकरीत कामाला येत होती आणि त्यासाठी मी ती शिकत होतो.

पण मराठीचं तसं नव्हतं कारण ती माझी मातृभाषा होती आहे आणि असेल पण तीच लिहिताना किंवा बोलताना अडखळणे लाजिरवाणे होते. मराठीचा अभिमान वाटावा अशी प्रत्येक गोष्ट त्यात आहे. शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास तर आहेच आहे पण त्याचबरोबरीने याच भाषेने तर मला जगाची प्राथमिक ओळख करून दिली मग तिचा अभिमान तर असणारच.

मातृभाषेच्या महत्तेची जाणीव झाल्यावर तो शेवटचा दिवस होता अशा संभ्रमाचा. त्यानंतर आजपर्यंत मराठी लिहिताना किंवा बोलताना कधीही अडखळलो नाही किंवा शब्दांचीही कमी जाणवली नाही. आजही मी कुठे का असेना समोरच्याशी मराठीतच बोलतो. महाराष्ट्रात असताना मराठीच, बाहेर असलो तरच हिंदी किंवा इंग्रजी. एवढंच काय कोर्पोरेट ट्रेनर झाल्यावर सुद्धा इंग्रजी आणि हिंदी सोबत मराठीचा पर्याय द्यायला लागलो कारण 'मी मराठी'

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...

मराठी | मराठी भाषा दिन | Marathi | Life Coach | Business Mentor | Corporate Trainer | Shailesh Tandel | Searchlight Within |

Know More About Life Coaching and Business Mentoring Sessions

Posted in Inspirational.

6 Comments

  1. छान मांडणी व थोड्या बहोत फरकाने प्रत्येकाच्या मनातले

Leave a Reply