Time Is Important, But Even To Realize…

आतापर्यंत बहुतेक शाळा / कॉलेजांच्या परीक्षा संपून एव्हाना सुट्ट्या सुरु झालेल्या असतील किंवा काही ठिकाणी त्या लवकरच सुरु होतील आणि त्याचबरोबर सुरु होईल द ग्रेट हॉलिडे  सर्कस. मुख्य कलाकार पालक व बालक.

कधी एकदा सुट्टी पडते आणि मस्त धमाल करायला मिळते ही बच्चे कंपनीची स्वप्ने. पण त्याचवेळी पालकांच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत असतात. आता शाळा संपून सुट्टी सुरु होणार मग ह्या मुलाचं करायचं तरी काय? बापरे, दिवसभर सांभाळायचं तरी कसं ह्यांना? इथे मुलांना मजा करायची असते तर तिथे ही सुट्टी पालकांची त्यावेळेची सर्वात मोठी समस्या असते. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही त्यामुळे सॉलिड गोची झालेली असते त्यांची.

त्यावरचा तोडगा किंवा रामबाण उपाय म्हणजे मुलांना कशात तरी गुंतवायचं. मग ते त्यांच्यावर चांगले संस्कार घडविण्यासाठी कॅम्प असतील किंवा उद्या ते ज्या जीवघेण्या स्पर्धेला तोंड देणार आहेत त्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी, आतापासूनच धडे गिरविण्यासाठी किंवा पालकांच्या मते त्यांच्या पाल्यात जे दोष आहेत त्याच्या निर्मुलनासाठी एखादा कॅम्प किंवा कार्यशाळा.

ह्यातलं काहीएक जमण्यासारखे नसेल तर किंवा अगदी सुरुवातीपासूनच ठरवून टाकलेलं की सुट्टी पडली की लागलीच पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करून टाकायची. म्हणजे परीक्षेत तेवढेच ५/१० टक्के तरी अजून जास्त मिळतील.

वर्षभर अभ्यास एके अभ्यास हेच गणित असते पण निदान सुट्टीत तरी काहीतरी वेगळे पाहिजे म्हणजे त्यांना थोडे ताजेतवाणे वाटेल आणि शाळा/कॉलेज सुरु झाल्यावर अभ्यासात योग्य लक्ष देखील लागेल. पण छे आमचा ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नसतो. आम्हाला फक्त एकच कळते की वेळ सुसाट वेगाने चालला आहे आणि जर त्याच वेगाने आपणही वाटचाल नाही केली तर आपले काही खरे नाही. त्यामुळे वेळ अजिबात फुकट जाता कामा नये कारण वेळ खूप महत्वाचा आहे.

काही मुलांसाठी एक कॅम्प संपला की दुसरा कॅम्प. सतत कशात तरी गुंतलेले. त्याच्यासोबत सुट्टीतले छंदवर्ग? छंद पालकांचे पूर्ण होतात की मुलांचे हा एक मोठा प्रश्न आहे. छंदवर्ग जसे पोहणे, चित्रकला, हस्तकला, नृत्यवर्ग, कराटे वगैरे वगैरे कितीतरी गोष्टी. जेवढे पालक व्यस्त नसतील तेवढी त्यांची मुले व्यस्त. दीड-दोन महिन्यांची सुट्टी आली कधी आणि गेली कधी तेच कळत नाही. काही वर्षांनी खरोखर अशी परिस्थिती उद्भवेल की मुलांना ती सुट्टीच नकोशी वाटेल. कारण जर सुट्टीमध्ये देखील फक्त कॅम्प एके कॅम्प किंवा अभ्यास एके अभ्यास किंवा तत्सम गोष्टीच कराव्या लागणार असतील आणि त्यात विरंगुळ्यासाठी वेळच नसेल तर हवी कुणाला ती सुट्टी?

अरे ती मुले आहेत की मशीन? मशीन देखील काही काळासाठी बंद करावी लागते जेणेकरून ती थोडी थंड होईल. आणि तिची व्यवस्थित काळजी घेतली तरच ती आणखी चांगल्याप्रकारे काम देईल. उत्पादनही वाढेल आणि मशीनचे आयुष्य देखील.

हे आम्हाला कळत नाही अशातला भाग नाही, पण कळत असूनसुद्धा आम्ही स्वतःला आणि आपल्या मुलांना त्या मशिनीपेक्षा बेकार पद्धतीने वागवतो; का तर वेळ महत्वाची आहे.

हा भाग वेगळा की आम्हाला दोन तासांचे काम करायला कधीकधी दोनदोन वर्षे लागतात. पण... त्याला आमची परिस्थिती जबाबदार असते आम्ही नाही. उगाचच आम्ही आजच्या गोष्टी उद्यावर नाही ढकलत. काहीतरी योग्य कारण असतेच आमच्या वागण्याला पण दुसऱ्यांच्या कोणत्याही चुकीला मात्र आम्ही चुकीच मानतो. तिथे कोणतेही कारण आम्हाला मान्य नसते. आम्ही कसेही वागलेले चालेल पण दुसऱ्यांनी बिल्कुल नाही; आमच्या मुलांनी तर नक्कीच नाही.

त्यांनी मात्र योग्यच वागलेच पाहिजे. त्यांना वेळेत काम करायची सवय लागलीच पाहिजे. नाहीतर ह्या जीवघेण्या स्पर्धेत त्यांच्या टिकाव नाही लागणार. बरं, जर त्यांचा टिकाव नाही लागणार तर आतापर्यंत तुमचा टिकाव कसा लागला? जादूची छडी आहे का तुमच्याकडे? नाही ना? तरीही ह्या जीवघेण्या स्पर्धेत कितीतरी भल्यामोठ्या अक्षम्य चुका करूनही तुम्ही टिकलात. कसे बुवा? जर तुम्ही टिकू शकलात तर जेव्हा त्या मुलांवर वेळ येईल त्यावेळी तेही शिकतील की तग धरायला. त्याचा बागुलबुवा आताच करायची खरोखर गरज आहे काय?

तुम्ही भलेही दिवसरात्र काम करण्याचा अट्टहास कराल परंतु रात्र झाली की थोडासा आराम हा करावाच लागतो. तुम्ही कितीही घुबडासारखा जागण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या नकळत झोप येणारच. आणि जर तसे नाही तर झाले तर इस्पितलाशी (हॉस्पिटलाशी) किंवा मानसतज्ञाची गाठ ठरलेली. इस्पितळात आराम करण्यापेक्षा जर सुट्टी आहेच तर ती उपभोगायला काय हरकत आहे? ती रविवारची हक्काची सुट्टी नाही का आपण....

तुम्हाला मुलांची काळजी आहे आणि त्यांना उत्तमोत्तम देण्याचा तुमचा प्रयत्न आहे हे सर्व काही मान्य. परंतु मुलांना काय हवे हे कधी तपासून पाहिले आहे का तुम्ही?

क्वचितच किंवा निव्वळ योगायोग म्हणा पण जे तुम्हाला हवे आहे तेच त्यां मुलांनाही हवे असते कधीकधी. बहुतेकवेळा ते मनाविरुद्ध तुमचे म्हणणे ऐकतात किंवा तुम्ही दिलेल्या एखाद्या प्रलोभनामुळे. पण त्या ऐवजी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधून बघा कदाचित परिणाम काहीतरी भन्नाट निघतील.

पण जर का त्यांचे पक्के मत बनले की तुम्ही त्यांचा संभाव्य त्रास टाळण्यासाठी त्यांना दूर लोटता आहात, तर कदाचित ते कायमचे दुरावले जातील. त्यामुळे वेळ महत्वाची आहे असे पिपेरी वादन करता करता तुम्ही तुमच्या महत्वाच्या व्यक्तींनाच कायमचे मुकाल.

मान्य आहे की लहान वयात मुलांना चांगल्या सवयी लावणे गरजेचे असते. योग्य वेळेवर त्यांना शिकविणे गरजेचे असते वगैरे वगैरे अगदी मान्य. पण जे तुमच्यासाठी महत्वाचे आहे ते त्यांच्यासाठी महत्वाचे असेलच हे कशावरून? शिकवलेले वाया जात नाही पण जबरदस्ती शिकविले तर डोक्यातही जात नाही. त्यामुळे जी वेळ तुम्ही महत्वाची मानताय कदाचित ती त्यांच्यासाठी महत्वाची नसेल. शेवटी वेळ महत्वाची आहे हे कळण्याचीही वेळ यावी लागते. आणि मला खात्री आहे की तुमची ती वेळ आली आहे.

Shailesh Tandel
Life Skills Trainer & Mentor
Posted in Inspirational, Planning, Time Management, Vel Anmol.

2 Comments

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.