शैलेश तांडेल

टाईम मॅनेजमेंट गुरु श्री शैलेश तांडेल 

नावात काय आहे असे शेक्सपियर म्हणाला होता, पण शैलेश तांडेल या नांवातच भरपूर काही आहे. शैलेश म्हणजे हिमालय. त्यात हिमालयाच्या शिखरासारखे चढ उतार आहेत. हिमालयाच्या कुशीत सामावलेले अफाट ज्ञान आहे, सहज सुंदर अशी विनम्रता आहे आणि तांडेल म्हणजे जो नाविकांची नाव ठरलेल्या ठिकाणी जाण्याचे मार्गदर्शन करतो; तो नाविक नाही तर नाविकांचा प्रमुख आहे, ज्याच्या प्रत्येक कृतीमध्ये एक दृढनिश्चय असतो.

गेल्या १०/१५ वर्षात खूप सारी मराठी माणसे उद्योगधंद्यात उतरली आणि यशस्वी देखील होत आहेत परंतु १९८९ मध्ये परिस्थिती उद्योगाला तेवढी पूरक नव्हती. त्यावेळी मराठी माणूस आणि उद्योग म्हणजे जशी उत्तर आणि दक्षिण धृवाची परस्परविरोधी.टोकं. एकंदरीत उद्योगधंद्यात मराठी माणसाचं अस्तित्व जवळपास नव्हतंच कारण उद्योगात पडणे म्हणजे खूप मोठी जोखीम जिथे तुमच्याकडे असलेले सर्वकाही तुम्ही हरवून बसाल आणि जेव्हा तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असते तेव्हा साहस नव्हे तर सुरक्षिततेला अधिक प्राधान्य असते त्यामुळे कदाचित उद्योगधंद्यात मराठी माणसाचे प्रमाण अगदीच नगण्य होते.

जर परिस्थिती उद्योगाला पूरक नव्हती तर ती वयाची विशीही पूर्ण न केलेल्या आणि हातात कोणतेही भांडवल वा मार्गदर्शन नसलेल्या एखाद्या तरुणाला पूरक कशी असू शकेल?

ह्या वयात लोकं आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडतात आणि त्यानंतर एखादी चांगलीशी नोकरी शोधून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात. अशा वयात धंद्यात उतरणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे. जर धंद्यात उतरयाचेच असेल तर बापदादाची संपत्ती तरी हवी किंवा स्वतः पैसा कमावून, चांगला अनुभव घेवून चाळीशीच्या नंतर सुरु करायची बाब. पण ह्या सर्वांची पर्वा न करता जे येईल ते आव्हान स्वीकारायला मनाची तयारी केलेली होती शैलेश तांडेल यांनी आणि हे आव्हान त्यांनी लीलया पेलले तेही थोडीथोडके नव्हे तर सलग २९ वर्षे.

उद्योग म्हटला की तो व्यवस्थित नावारूपाला येत असताना आणि आल्यावरही खूप सारे खाचखळगे आणि आयुष्यातील कित्येक उतार-चढावांना सामोरे जाणे हे नित्याचेच आणि तेही जेव्हा तुम्ही पहिल्या पिढीतील उद्योजक असता त्यावेळी ह्या समस्या थोड्याथोडक्या नसून भरपूरच जास्त असतात. त्या पचवत पुढे जाताना स्वतःच्या पलीकडचे जग सहसा दिसत नाही पण ते समस्यांना गोंजारत न बसता त्यांना सामोरे गेले. त्या प्रत्येक घटनेतून जे मिळेल ते शिकत गेले आणि जे ते स्वानुभवातून शिकले तेच इतरानाही शिकविण्याचा त्यांनी धडाका लावला.

स्वतःमधील नेतृत्व गुणांची आलेली प्रचीती, उद्योगातील समस्यांना सामोरे जात असताना आलेला दांडगा अनुभव आणि कुणालाही सर्वतोपरी मदत करण्याचा स्वभाव यामुळे सहजच सर्वांना मदत करून त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास प्रशिक्षणाच्या महामार्गावर येऊन कधी थडकला ते त्यांना स्वतःलाही जाणवले नाही. ह्या एवढ्या वर्षात लोकांना त्यांच्या आयुष्यात उभे राहण्यासाठी, अगदी साध्या सोप्या पध्दतीने त्यांना बळ देण्याचं काम मात्र आजतागायत अविरत चालू आहे.

त्यांच्या वागण्या-बोलण्यात तुम्हाला नेहमीच उत्साह तसेच सहजपणा दिसेल. ही दैवी देणगी कदाचित त्यांना उपजतच मिळाली असावी आणि स्वतःचा शोध घेत घेत ह्या शक्तीचा वापर त्यांनी यथोचित लोककल्याणासाठीच केला हे विशेषच.

या दैवी देणगीचा वापर गेल्या २९ वर्षांहून अधिक काळ लोकांच्या मार्गदर्शनासाठी झाला आहे. अगदी गुंतागुंतीची समस्या देखील सहजपणे खेळीमेळीच्या वातावरणात नाहीसी होते. लोकांमध्ये ज्ञान वाटण्यापेक्षा, लोकांमध्ये असलेले सुप्त गुण हेरून त्यांनी त्या गुणांचा वापर कसा करावा हे ते नजरेत आणून देतात. ज्ञान महत्वाचे आहेच पण नुसते ज्ञान असून चालत नाही तर ते ज्ञान योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेवर वापरले जाणे जास्त महत्वाचे असते.

सर्व स्तरातील लोकांना त्यांच्या स्वतःमधील ताकदीची जाणीव करून देणे, वास्तवाला सामोरे जाण्यास सज्ज करणे व त्यांचे मनोबल वाढवून मोठमोठ्या उलाढाली पेलवण्यासाठी समृद्ध करणे; हे नेहमीच त्यांच्या केंद्रस्थानी आहे आणि असेल.

गेल्या २९ वर्षांच्या उद्योजक आणि २१ वर्षांच्या त्यांच्या प्रशिक्षकाच्या कारकिर्दीत कितीतरी लोकांच्या आयुष्याने त्यांचा परीसस्पर्श अनुभवला आहे. मग ती व्यक्ती कुणीही असो, त्यांच्या ओळखीची, जवळची किंवा संपूर्ण अनोळखी; एखादे ५/६ वर्षाचे मुल किंवा एखादी वयोवृद्ध व्यक्ती, ते नेहमीच तत्पर असतात लोकांच्या आयुष्यात काही चांगले बदल घडवून रचनात्मक विकास साधण्यासाठी. ह्या जगात येऊन जर तुमचं आयुष्य कुणाच्यातरी कमी येत असेल तर त्यापेक्षा मोठे समाधान अजून काय असू शकेल? आणि जी गोष्ट करायला तुम्हाला मनापासून आवडत असेल आणि तीच गोष्ट जर करायला मिळाली तर आणखी काय हवं आहे आयुष्यात?

हृदयातील ह्याच निष्ठेतून त्यांनी १६ मार्च २०१० रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्चलाईट विथीनची स्थापना करून मराठीतून सामान्य जणांसाठी सेमिनार आणि कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली.

जीवनाच्या शाळेत पडत-धडपडत, कधी तोंडावर आपटून पण तरीही पुन्हा त्याच जोमाने उभे राहून आयुष्याला सामोरे जाण्यातून आलेले हे त्यांचे स्वानुभव आहेत. कधी स्वतःच्या तर कधी इतरांच्याही चुकांपासून धडा शिकलेले त्यामुळे हे पुस्तकी ज्ञान नाही आहे. कदाचित तुम्ही जिथे अडकला असाल त्यातून कधीकाळी ते बाहेर पडलेत आणि कदाचित त्याचमुळे ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात.

प्रशिक्षकाचा प्रवास सहजच सुरु झाला परंतु आता लोकं त्यांना प्रेमाने 'टाईम मॅनेजमेंट गुरु', 'मास्टर कम्युनिकेटर' किंवा एक 'वैविध्यपूर्ण प्रशिक्षक' (Versatile Trainer) असे संबोधतात.

आगामी कार्यशाळा>>>

टाईम मॅनेजमेंट गुरु श्री शैलेश तांडेल यांच्या काही चित्रफिती