आपले आयुष्य खूप साऱ्या दरवाज्यांनी भरलेले आहे.
काही रुंद, मोकळे रस्ते जे आपल्याला पुढे घेऊन जातात.
काही वळणावळणाचे जे कित्येकदा जिथून प्रवास सुरु केला तिथेच परत आणून सोडतात किंवा आणखी कुठल्यातरी अज्ञात स्थळी.
आणि काही, रस्ते जरी आपल्याला आकर्षित करत असले तरीही कित्येकदा एखाद्या कड्याच्या काठावर घेऊन जातात, जिथून पुढे गेलो तर कड्यावरून सरळ खाली पडायची भीती आणि मागे आलो तर घरंगळत खाली यायची भीती म्हणजे विनाशाला निमंत्रण.
समस्या अशी आहे की, कोणता दरवाजा आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाईल आणि कोणता आपला वेळ वाया घालवेल हे आपण नेहमीच सांगू शकत नाही.
जीवनात अनेक दरवाजे सहजपणे उघडतात जसे की संधी, लक्ष विचलित करणे, प्रलोभने, अल्पकालीन रोमांच इ. परंतु प्रत्यक्षात फक्त काही दरवाजे आपल्याला आपल्या खऱ्या ध्येयांच्या जवळ घेऊन जातात.
अजूनही २०१५ चा क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना व्हायचा आहे पण तो भारता शिवाय खेळला जाणार आहे कारण काल झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरीत भारत हरलेला आहे.
त्यामुळे मला जो मुद्दा मांडायचा आहे त्यासाठी हे उदाहरण अगदीच पूरक आहे.
सुरुवातीपासूनच असे वाटले होते की भारतीय संघाला चषक (ट्रॉफी) जिंकण्यासाठी परिपूर्ण दरवाजा सापडला आहे. सलग सात विजय, अजिंक्य फॉर्म आणि त्यांच्या मागे संपूर्ण देशाच्या आत्मविश्वासाचे पाठबळ. सर्वांना वाटले की पुढचे पाऊल अंतिम असेल... आणि ट्रॉफी. पण जेव्हा दार उघडले तेव्हा विजय नाही तर ९५ धावांनी पराभव झाला.
ज्या संघाने अगोदरच्या ७ सामन्यांमध्ये विरोधी संघाचे सर्वच्या सर्व खिलाडू बाद केले होते तो ऑस्ट्रेलियाचे फक्त ७ फलंदाज बाद करू शकला. स्वतः मात्र पहिली वेळ संपूर्णतः बाद झाला आणि सामन्यातूनच नव्हे तर स्पर्धेतूनच बाद झाला.
त्यानंतर मात्र लोकांच्या भावनांचा विस्फोट होऊन त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या. काही भारतीय संघाविरोधी, खेळाडूंविरोधी तर काही त्यांच्या खासगी आयुष्याची चिरफाड करणाऱ्या. अगदी खालच्या पातळीवर उतरून एखाद्या खेळाडूच्या वाईट प्रदर्शनासाठी त्याच्या मैत्रिणीला जबाबदार धरून त्याच्या कामगिरीसाठी दोष दिला गेला. जणूकाही त्या दरवाजाने लोकांना पूर्णपणे निराशेच्या गर्तेत ढकलले होते आणि ते हाताळायला काही लोकं असमर्थ होते.
तर काही भारतीय संघाच्या बाजूने प्रतिक्रिया देऊन त्यांचे मनोबळ वाढवणारे. त्यांनी अगोदरच्या सामन्यात जे उत्तमोत्तम खेळ करून जो निर्लेभ आनंद दिला त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणारे, तुमच्या यश-अपयशात आम्ही तुमच्या सोबतच आहोत असे सांगून धीर देणारे आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणारे.
आम्हाला माहित आहे की हा एक खेळ आहे आणि त्या खेळात कुणी एकच जिंकू शकतो म्हणजे साहजिकच दुसरा हरणारच. पण हे तथ्य जरी माहित असले तरी ते स्वीकारायची आमची अजिबात तयारी नसते किंवा कदाचित तो कणखरपणा किंवा ते स्वीकारण्याची कुवतच आमच्यात नसते. आमची कुवत बहुतेकवेळा फक्त आणि फक्त कुरकुर करण्या एवढीच मर्यादित राहिलेली असते. कदाचित त्यामुळे आमच्या वास्तविक जीवनात आम्ही जिंकतो कमी आणि हरतो मात्र बहुतेक वेळा. पण तेच दुसऱ्याकडून घडलेले आम्हाला मान्य नसते.
त्या विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या यश-अपयशाचा आमच्या आयुष्याशी दुरान्वयानेही काही संबंध आहे का? तर नाही.
पण तरीही त्यावर आम्ही प्रतिक्रिया दिली कारण कुठेतरी आपल्या सर्वांचे जीवन अशाच प्रकारच्या मिश्र घटनांनी भरलेलेच असते, बरोबर ना?
कित्येकदा प्रगतीकडे घेऊन जातील या विश्वासाने आपल्यापैकी बहुतेकांनी भूतकाळात असे अनेक दरवाजे उघडून शेकडो अपयश अनुभवलेले असतील आणि असं नाही की ते अपयश आमच्या पचनी पडलेले असतात पण अप्रत्यक्षपणे आमच्या अंगवळणी नक्कीच पडलेले असतात. नोकरी, नातेसंबंध, व्यवसाय इत्यादी बाबतीत तर कित्येकदा कोणताही दरवाजा उघडला तरीही त्यापुढे मार्गच दिसत नाही कारण तिथे रस्ता संपलेला (डेडएंड) असतो. जेव्हा आपल्यासोबत असे घडते तेव्हा आपण अनेकदा अपयश लपवतो. पण जेव्हा इतरांसोबत असे घडते तेव्हा आपण एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करायला किंवा त्यांची थट्टा करायला लगेच सुरुवात करतो.
आपण सहसा आपल्या स्वतःच्या जीवनाकडे पाहणे टाळतो किंवा ज्या भावनिक आघातातून आपण जात आहोत ते कोणालाही कळू नये याची पूर्ण काळजी घेतो. भूतकाळात ज्या परिस्थितींमधून आपण गेलेलो असतो सहसा त्या लोकांपासून लपवलेल्या असतात कारण आपल्या मते, फक्त कमकुवत लोकच भावना व्यक्त करतात. म्हणून बहुतेकवेळा आपण आपल्या भावना दाबून ठेवतो किंवा असे कोणतेही काम करत नाही जे आपली कुवत सर्वांसमोर उघड करेल किंवा ज्याची भीती वाटते त्या गोष्टीला सामोरे जावे लागेल. कोणतेही मोठे काम आपण हाती घेत नाही कारण लहानसहान कामात अपयशी ठरलो तरी ते अपयश सहजपणे लपवता येते, परंतु जर का कुणी एखादी मोठी झेप घेताना अपयशी ठरले तर आपण त्यांच्यावर टीका करण्यास किंवा त्यांना असा धडा शिकवण्यास मोकळे आहोत जो आपण कधीही शिकलेलो नसतो.
दुसरे म्हणजे जे आमच्यासाठी नायक (हिरो) आहेत जसे क्रिकेट स्टार वगैरे. त्यांचे अपयश तर आम्हाला मान्यच नसते आणि तेही सातत्याने ७ सामने जिंकल्यावर तर नाहीच नाही. आम्ही नाही करू शकलो पण दुसऱ्याने ते केल्याने मिळणारा आनंद कुणी आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. पण जर असे झालेच तर अशावेळी मन रमवण्यासाठी आम्हाला काही वेगळे साधन लागते किंवा पातळी घसरून कुणावर काहीही आरोप किंवा विनोद. ज्याने आम्ही ह्या दुःखातून बाहेर पडू शकतो.
ह्या दोन वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका आणि त्यालाच अनुसरून प्रतिक्रिया, नाहीत का?
आम्हालाही हे ठाऊक आहे की खेळात हारजीत होणारच. प्रत्येक सामना आपण जिंकणे शक्यच नसतं. शेवटी ‘मौका मौका’ प्रत्येकाला कधीना कधीतरी मिळतोच, नाही का?
अगोदरच्या ७ सामन्यात आमच्या खेळाडूंनी विजय नुसता खेचून आणला नव्हता तर प्रत्येक संघावर आपले वर्चस्व गाजवले होते आणि तेही कुणीही अपेक्षा केलेली नसताना. पण आता मात्र अपेक्षा केली पण पदरी निराशा पडली.
पण ती निराशा आपल्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते का? तुम्हाला वाटते की त्या दिशेने जाऊन तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता? अजिबात नाही.
सत्य हे आहे की, प्रत्येक दरवाजा उघडण्यासारखा नसतोच मुळी.
काही मार्ग विचलित करणारे असतात.
काही मार्ग असे असतात की जे आपण कठोर परिश्रम टाळण्यासाठी वापरतो.
काही मार्ग आपल्याला आपल्या ध्येयांपासून पूर्णपणे दूर खेचतात.
जर आपल्याला खरी प्रगती हवी असेल, तर आपण चुकीचे दरवाजे घट्ट बंद करायला शिकले पाहिजे आणि फक्त तेच उघडायला हवेत जे आपल्याला पुढे घेऊन जातात; जरी ते उघडणे कठीण असले तरीही.
त्यासाठी केवळ दृढनिश्चय पुरेसे नसतो तर योग्य विचार करून त्याची निवड केली पाहिजे, शिस्तीने वागले पाहिजे आणि भलेही यापूर्वी कितीही चुकीचे दरवाजे निवडले असले तरीही त्या चुकांपासून शिकून आपण त्या मार्गावर निरंतर चालत राहिले पाहिजे.
भारतीय क्रिकेट संघ असो किंवा आपल्यासारखे सामान्य लोक, तत्व एकच आहे आणि सर्वांना मापदंड देखील एकच..
आपण प्रत्येक निकाल नियंत्रित करू शकत नाही, परंतु कोणते दरवाजे उघडायचे हे आपण नियंत्रित करू शकतो, म्हणून हुशारीने दरवाजा निवडा आणि जे तुम्हाला मागे ठेवते ते बंद करा आणि दरवाजा तोच उघडा जो तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पोहोचवतो.
जीवनात आपण उघडलेले दरवाजेच आपला मार्ग ठरवतात. काही दरवाजे अपयशाकडे नेतात, काही अनपेक्षित प्रगतीकडे, आणि काही आपल्या स्वप्नातील यशाकडे. जर तुम्ही जीवनाच्या वळणावर उभे असाल आणि कोणता दरवाजा उघडायचा हे ठरत नसेल, तर योग्य मार्गदर्शन तुमच्यासाठी निर्णायक ठरू शकते. जीवन, करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी लोकांना त्यांच्या खऱ्या ध्येयांची ओळख करून देतो, अडथळे दूर करायला मदत करतो आणि आत्मविश्वासाने पुढे जायला प्रेरित करतो. कारण योग्य दरवाजा सापडत नाही तर तो विचारांत स्पष्टता आणून निवडला जातो.
Same Blog in English Open the Door That Leads to Your Goals
Blog by 'Life Coach And Business Mentor' Shailesh Tandel
You may explore:
1:1 Coaching | Business Mentoring | Corporate Training | Workshops

नेहमी सारखा छान व बोधप्रद लेख.
वेळात वेळ काढून ब्लॉग वाचल्याबद्दल धन्यवाद
Informative write up. Truly applicable for today’s competitive envoirnment.
Very true. We are so much lost into the unwanted door that we forget our core purpose to live our life fully.