दशावतार चित्रपटाचा रिव्ह्यू व व्यावसायिक धडे

वॉकर शिवाय ज्यांना एक पाऊल देखील पुढे टाकता येत नाही अशा दोन वयस्कर स्त्रिया काल संध्याकाळच्या ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाच्या शोला मी पाहिल्या आणि जाणवले की, खरेतर हेच या चित्रपटाचे यश आहे की लोकं अशा अवस्थेतही चित्रपटगृहात येत आहेत. आणि हो ओटीटी मोबाईल किंवा इतर मनोरंजन हे पर्याय असतानाही. एकंदरीत लोकांना आयुष्यात काहीतरी करण्यासाठी एखादे चांगलेसे कारण हवे असते आणि ते मिळाले की जागेवरून न हलणारी व्यक्ती देखील चित्रपटगृहा पर्यंतच काय आयुष्यात देखील कुठेही पोहोचू शकते. कारण हा नियम सर्वच गोष्टींना लागू होतो.

सोमवारी संध्याकाळचा शो आणि पुढील २-३ रांगा सोडल्या तर संपूर्ण थियेटर लोकांनी गच्च भरलेला मी खूप वर्षात काही अपवाद वगळता मराठी चित्रपटासाठी पाहिलेला नाही. मला वाटते ‘बाईपण भारी देवा’ नंतर प्रथमच. शनिवारी आणि रविवारी देखील असे भाग्य क्वचितच एखाद्या हिंदी किंवा दक्षिणेच्या चित्रपटांना लाभते. आणि हो रविवारची तिकिटे नाही मिळाली म्हणूनच मी सोमवारची बुकिंग केली होती.

चित्रपट सुरु असताना लोकांच्या प्रतिक्रिया पण जबरदस्त होत्या. काहीतर अशा होत्या ज्या लहानपणी रस्त्यावर चित्रपट पाहताना यायच्या अगदी तशाच. त्या ऐकणे चित्रपटातील काही विनोदी संवादांपेक्षाही मस्त होत्या ?.

संपूर्ण चित्रपट व्यवस्थित गतीने पुढे जाते, कुठेही कंटाळवाणा प्रसंग नाही. नाहीतर ट्रेलर वेगळा आणि चित्रपटात काहीतरी वेगळेच किंवा ट्रेलर मध्येच संपूर्ण कथा उलगडलेली तसे काहीही नाही. म्हणजे जर व्यवसाय वाढविण्यासाठी जर मार्केटिंगच्या दृष्टीकोनातून विचार केला तर जेवढे गरजेचे तेवढेच पत्ते दाखवायचे जेणेकरून पुढे काय घडणार याची उत्कंठा कायम निर्माण होत राहावी. ती निर्माण झाली की मोठी उलाढाल ठरलेलीच आणि या चित्रपटाच्या टीमला ते गणित उत्तम जमले आहे.

एवढे मात्र नक्की, सर्व कलाकारांची कामे चोख झालेली असतानाही एकपात्री प्रयोग असावा तसं दिलीप प्रभावळकर भाव खाऊन आपल्या ८०+ वयाच्या सशक्त खांद्यावर चित्रपट घेऊन जातात. गेल्या काही दशकांमध्ये जे नाव दिलीप प्रभावळकर यांनी कमावले आहे तो ब्रँड एकहाती प्रोजेक्ट सांभाळण्यात यशस्वी झाला आहे. आणि दुसरा महत्वाचा आणि दिलीप प्रभावळकारांपेक्षा कितीतरी मोठा ब्रँड म्हणजे ‘कोकणातील दशावतार’ कारण या नावाशिवाय दुसरा कुणीही एवढी गर्दी खेचू शकला नसता एवढे मात्र खरे.

कोकणात दशावतार पाहण्यासाठी जशी लोकांची झुंबड लागते तसेच काहीसे या चित्रपटाबाबत झालेले आहे. कोकणातील दशावतार हे नाट्य म्हणजे लोकांचे जीव की प्राण. पण ते फक्त त्यासाठी उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांमुळे आहे असे नाही तर मिळालेले पात्र पूर्णपणे झोकून देऊन ते जगणाऱ्या कलाकारांमुळे देखील आहे. किंबहुना अशा कलाकारांमुळेच ही कला अजूनही टिकून आहे आणि त्याची लोकप्रियता अखंड वाढतेच आहे. त्या दशावताराला मोठ्या पडद्यावर वेगळ्या प्रकारात आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर या आपल्यासमोर आणले आहे दिलीप प्रभावळकर व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी.

लहानपणी चिमणराव गुंड्याभाऊ मध्ये ऐकलेली ‘चिऊ ये चिऊ’ ही हाक आणि त्यानंतर अशोक सराफ सोबत आवडलेला ‘एक डाव भुताचा’ व दशकापूर्वी आलेल्या ‘नारबाची वाडी’ ते दशावतार जबरदस्त प्रवास. त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाचा विचारही या भूमिकेसाठी मनात येत नाही.

लोकं साठीमध्ये निवृत्त होतात पण हा उमदा कलाकार ८१ वर्षांच्या वयात देखील तेवढाच जबरदस्त आहे.

चित्रपट पाहण्यापूर्वी सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही रिव्यू ऐकलेले पण ट्रेलर आवडलेला त्यामुळे जाणे निश्चित होते आणि जराही भ्रमनिरास झाला नाही. कथा लेखन, संवाद आणि फोटोग्राफीतून कोकणाच्या निसर्गाचे मस्त दर्शन आणि हे सर्व दिग्दर्शकाने योग्य मांडणी करून खूप छान गुंफलेले आणि पडद्यावर व्यवस्थितपणे मांडलेले त्यामुळे चित्रपटगृहात पाहावा असाच हा चित्रपट.

सर्वसमावेशकता उद्योग वाढविण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीच्या प्रसिद्धीसाठी सर्वात महत्वाचे असते आणि ते हाताळता येणे प्रत्येकाला शक्य नसते आणि ते जमले तर तुम्हाला हवे असलेले इप्सित सहज प्राप्त करता येते. फक्त मालवणी भाषेचाच वापर न करता काही ठिकाणी शुद्ध मराठीचे संवाद त्यामुळे ज्यांना मालवणी कळत नाही असे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसे देखील या चित्रपटाचा आस्वाद घेऊ शकतात त्यामुळे कोकणातील माणसापर्यंत मर्यादित न राहता हा चित्रपट व दशावताराची नाट्यकला सर्वदूर पसरणार आणि हे साध्य करण्यात हा चित्रपट कमालीचा यशस्वी झाला आहे.

अभिनंदन टीम दशावतार.

५ पैकी ४.५ गुण देईन मी या चित्रपटाला.

Blog by Life Coach & Business Mentor Shailesh Tandel

Life Coach | Business Mentor | Executive Coach | Corporate Trainer | Time Management Coach | Relationship Coach 

If this made you pause… the next one might move you.


Reflections on life, work, and growth.

Join a small circle of readers exploring clarity, growth, and meaningful action.

Loading
Posted in Success Mantra, मंत्र यशाचा and tagged , .

7 Comments

  1. मराठी सिनेमा ला सुवर्ण युगाची सुरुवात झाली आहे .

    • सुवर्णयुगाची सुरुवात नाही बोलता येणार पण ह्या चित्रपटाने अशा वाढल्या आहेत. या चित्रपटा सोबत आणखी दोन मराठी चित्रपट रिलीज झालेत त्यामुळे बाकीचे दोन्ही आपटले. पुढच्या सप्ताहात चार मराठी चित्रपट येताहेत.

  2. छान लिहिलाय रिव्ह्यू .. पुन्हा बघावा आणि तेही न कंटाळता असा अभिनयाचा दर्जा आहे दिलीप प्रभावळकरांच्या

    • वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल धन्यवाद .

      दिलीप प्रभावळकर अभिनयातील बाप माणूस आहे. त्यांच्या प्रत्येक भुमिकेत एक वेगळेपण असते.
      देहबोली आणि मुख्यतः नजरेतून ते कोणताही विषय आपल्या पर्यंत सहजपणे पोहोचवतात.

      उदाहरणार्थ, ‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील गांधीं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *