२४ जुलै १९८९ या दिवशी मुसळधार पावसाने आणि १००/१५० किमी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने मुंबई ते कोकणाला अक्षरशः झोडपून काढले होते; ज्यात कित्येक लोकं मृत्युमुखी देखील पडले होते.
नवी मुंबईतील अनेक केमिकल कंपन्या असणाऱ्या पाताळगंगा परिसरात देखील रात्रभर ८/१० तास सतत पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण विभाग पाण्याखाली गेला होता. पाताळगंगेतील त्या शंभरेक कंपन्यांमध्ये साधारणपणे २०० एकरमध्ये पसरलेला एक युनिट रिलायन्स पेट्रोकेमिकल्सचा सुद्धा होता.
निसर्गाचे असे रौद्ररूप धारण करून रात्रभर तांडव करून सुरू असताना अगदी पहाटेच रिलायन्सच्या त्या युनिटमध्ये सूत्र हलायला सुरुवात झाली होती आणि अवघ्या अर्ध्या-एक तासातच संपूर्ण युनिट बंद करण्यात आले होते. ती आणीबाणी हाताळण्यासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा सर्वच प्रकारच्या अधिकाऱ्यांचे मिळून एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. पुढील दोनतीन दिवसातच अशी आपत्ती हाताळणारे कुशल कामगार जगभरातून अद्यावत तंत्रज्ञान आणि मशिनीसकट तिथे पोहोचले होते आणि पाहता पाहता पुराच्या दिवसापासून साधारणपणे १५ दिवसातच ते अवाढव्य पसरलेले युनिट पुन्हा एकदा सुरु करण्यात आले होते.
आजूबाजूचे युनिट्स किती दिवसांनी चालू झाले किंवा नुकसान सहन न झाल्याने त्यातले किती कायमचे बंद पडले कुणास ठाऊक पण रिलायन्सने मात्र ही किमया साधली होती कारण ही अचानकपणे उद्भवलेली आपत्ती हाताळण्यात ते कुठेही कमी पडले नव्हते. फिनिक्स पक्षी जसा राखेतून पुनर्जन्म घेतो त्याप्रमाणे ते त्यातून बाहेर पडले.
आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) करण्यासाठी देखील एक यंत्रणा कायम सज्ज असावी लागते आणि जर ती अस्तित्वात नसेल तर ताबडतोब अस्तित्वात आणावी लागते. तिचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’ आणि त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते.
मी मार्च १९८९ मध्ये कुरियर कंपनी चालू केली होती त्यामुळे त्या २४ जुलैच्या पावसाची झळ इतरांना लागते त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त लागली होती. गाड्या बंद पडल्याने आणि इतर व्यत्ययांमुळे, डिलिव्हरीमध्ये खूप अडथळे निर्माण झाले होते परंतु इतर व्यवसायांप्रमाणे, "खूप पाऊस पडतोय" अशा सबबी देऊन कुरियर कंपनीला डिलिव्हरी थांबवता नाही येत मग ती कंपनी नवीन असो अथवा जुनी. नवीन होतो त्यामुळे विशेष काळजी आणि परिश्रम घ्यावे लागले होते. असो.
मी ऐकलेल्या माहितीप्रमाणे रिलायन्सच्या धीरूभाई अंबानींनी आपल्या मोठ्या मुलावर म्हणजे मुकेश अंबानीवर ती आपत्ती हाताळण्याची जबाबदारी सोपवलेली होती आणि त्यासाठी त्यांनी दहा दिवसांचा कालावधी निश्चित केला होता. दहा दिवसात तर नाही पण साधारणपणे पंधरा दिवसात त्या पुराच्या पाण्यात पाय रोवून सर्वांच्या अथक मेहनतीने तो प्लांट पुन्हा एकदा धडधडू लागला होता.
ती एकमेव आपत्ती होती असे नाही अशी कितीतरी संकटे त्यांनी हाताळली असतील आणि माझ्या माहिती प्रमाणे अशीच आपत्ती काही वर्षानंतर रिलायन्सच्या गुजरात मधील जामनगरच्या प्लांटमध्ये आली होती आणि त्यावेळी देखील त्यांनी ती यशस्वीरीत्या हाताळली होती आणि तीही काही दिवसातच. म्हणजेच पूर्वी पाताळगंगा प्लांटमध्ये अनपेक्षितपणे उद्भवलेली आपत्ती यशस्वीरीत्या हाताळणे हा फक्त नशिबाचा भाग नव्हता तर एक शिस्तबद्धता त्यात होती. आणि ती शिस्तबद्धता कुठेही न हरवता त्यांच्या संस्कृतीत आणि दैनंदिन व्यवहारात खोलवर रुजलेली दिसून येते.
माझ्या लहानपणी जर कुणी मोठमोठ्या फुशारक्या मारत असेल तर त्याला म्हटले जाई की हो माहिती आहे खूप मोठा टाटा–बिर्ला आहेस तू ते. त्यावेळी अंबानीचे तर कुठे नामोनिशानच काय तर ओझरता उल्लेखही नव्हता. आता देखील टाटा-बिर्ला त्यांच्या ठराविक किंवा पूर्वीपेक्षा जास्त वेगाने अजूनही पुढे जाताहेत पण त्यांच्यापेक्षा वेगाने जर कुणाची वाढ होत असेल तर ती अंबानीच्या रिलायन्सची.
रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च २०२१ पूर्वी कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हा टप्पा खूप आधी, जून २०१९ मध्ये साध्य करण्यात आला. आणि जेव्हा संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराशी झुंजत होते, तेव्हा रिलायन्स जिओ मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करून कर्जमुक्त झाली.
काही वर्षांपूर्वी स्थापन झालेली रिलायन्स जिओ ही कंपनी इतक्या कमी कालावधीत इतक्या उंचीवर पोहोचली आहे की केवळ कॉर्पोरेट्सच नाही तर जगातील काही देश देखील त्यात अब्जावधी डॉलर्स गुंतवण्यासाठी अक्षरशः रांगेत उभे आहेत.
कसं शक्य झाले हे सर्व?
रेसकोर्सवर शर्यतीत पळणाऱ्या त्याच घोड्यावर लोकं पैसे लावतात जो यापूर्वी काहीवेळा तरी किंवा सतत जिंकत आला आहे, नाही का?
पण तो घोडा सतत जिंकत राहण्यासाठी, एक कठोर दिनचर्या असणे आवश्यक आहे. जसे की आहार, व्यायाम, विश्रांती, प्रशिक्षण आणि हे सर्व अचूकतेने पाळणे गरजेचे असते. अशा शिस्तीशिवाय, घोडा नशिबाने एकदा जिंकू शकतो, पण तीच किमया कायम साधने त्याला शक्य नसेल तर सातत्य कधीही येणार नाही.
तो घोडा महत्वाचा तर आहेच पण तेवढाच महत्वाचा असतो त्या घोड्याला हाताळणारा जॉकी. घोडा अतिशय वेगाने धावू शकतो परंतु मार्गदर्शनाशिवाय एकट्याने ठराविक वेळेत, स्वतःहून ठराविक गंतव्यावर पोहोचणे कठीण. तो तेव्हाच पोहोचू शकेल जेव्हा जॉकी त्याच्यावर स्वार होऊन त्याला योग्य रीतीने हाताळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा त्या दोघांमध्ये एकवाक्यता असेल तेव्हाच. एकवाक्यता नसेल तर जिंकणे हे केवळ नशिबाचाच भाग असू शकतो आणि नशीब नेहमीच साथ देते असेही नाही. असले विजय अपघातानेच आलेले असतात आणि त्यामुळे ते अल्पकालीन ठरतात. आणि कोणीही सहसा नशिबावर पैज लावत नाही. गुंतवणूकदार फक्त सातत्याने परिणाम दाखवणाऱ्या प्रणालींवर विश्वास ठेवतात
इथेच शिस्त पुन्हा एकदा खरी गुरुकिल्ली बनते.
जेव्हा तुम्ही गुंतवणूक आकर्षित करण्याचा गंभीरपणे विचार करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला एक निर्विवाद सत्य लक्षात येते की शिस्तीशिवाय, विशेषतः आर्थिक शिस्तीशिवाय ते जवळजवळ अशक्य आहे. गुंतवणूकदार, बँका, अगदी मित्रही ज्याच्या कामात सातत्य नाही किंवा विसंगत आहे अशा व्यक्तीवर विश्वास ठेवायला कचरतात. परंतु जेव्हा ते शिस्तबद्ध प्रयत्न आणि संरचित प्रगती पाहतात, त्यावेळी वर्तमानात तात्पुरते नुकसान झाले तरी, त्यांना वाटते की भविष्य आशादायक आहे.
व्यवसायात, नशिब क्वचित कधीतरी दरवाजा उघडू शकतो परंतु शिस्त त्यांना नेहमीच उघडून ठेवते. तुमच्या कृतींमध्ये लय आणि सातत्य नसल्यास तुम्ही उद्योगात किती वर्षे घालवता हे महत्त्वाचे नाही. लय तेव्हाच जन्माला येते जेव्हा तुम्ही वचनबद्ध राहून सातत्याने काम करता, मन करेल तेव्हा किंवा मूड असल्यावर वगैरे नाही.
महिन्यातून एकदा व्यायाम करून शरीर तंदरुस्त होईल अशा चमत्काराची जशी अपेक्षा नाही करता येत त्याचप्रमाणे अधूनमधून प्रयत्न केल्याने तुम्ही जागतिक दर्जाची कंपनी नाही उभारू शकत. शिस्त ही कठीण असते, अनेकदा नीरस असते आणि कधीकधी थकवणारी वाटते. परंतु जे वर्षानुवर्षे ती शिस्त टिकवून ठेवतात त्यांच्या पायाशी यश लोटांगण घालते.
मी सुरवातीलाच रिलायन्सने ज्याप्रमाणे नैसर्गिक आपत्ती हाताळली त्याचे उदाहरण दिले आहे आणि त्यात हेही नमूद केले होते की त्या आपत्तीत कित्येक कंपन्या कायमच्या बंद देखील पडल्या असतील. पण रिलायन्स नुसती तरलीच नाहीतर जागतिक स्तरावरील फॉर्च्युन ५०० म्हणजे पहिल्या ५०० उद्योगात समाविष्ट आहे.
त्यांच्या कार्यप्रणालीवर मते मतांतरे असतील पण विक्रमी कालावधीत जागतिक उंची गाठणारी ती एक भारतीय कंपनी आहे हे देखील तेवढेच खरे. हे शॉर्टकटद्वारे किंवा फक्त अधिक लोकांना कामावर ठेवून घडत नाही. योग्य प्रतिभेला योग्य भूमिकेत ठेवून, हिऱ्याची क्षमता ओळखून आणि योग्य मार्गाने पॉलिश करून हे घडते. त्यासाठी त्या गुणांची पारख पण तर करता यायला हवी, नाहीतर समोर गुणांची खाण असेल आणि आम्ही मात्र त्यांना नको त्या ठिकाणी वापरून ते फुकटच घालवणार म्हणजे एकंदरीत कोळशाने हात काळे करून घेणार.
धीरूभाईंना प्रतिभा ओळखण्याची दूरदृष्टी होती. कदाचित त्या हिऱ्याची चमक धीरूभाईंनी नक्कीच हेरली असेल आणि त्या हिऱ्यावर पैलू पडायचे काम त्यांनी केले असावे. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी संकटाच्या क्षणांचा वापर इतरांनी स्वतःचे मूल्य ओळखावे यासाठी केला.
आणि तसेही सर्वांनाच धीरूभाई अंबानींचे मार्गदर्शन नाही लाभत आणि सर्वच मुकेश अंबानी सारखे आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाला स्वतःच्या बुद्धीची जोड देऊन आयुष्यातील भल्यामोठ्या संकटांना पुरून उरतातच असेही नाही किंवा एखाद्या संकटाला संधीत रुपांतर करू शकतातच असे नाही पण जे करतात ते साम्राज्य उभे करतात.
आणि हो, आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका वेळेची रणनीती नाही. आपत्ती व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी दैनंदिन आयुष्यात शिस्त असावी लागते, नाहीतर दैनंदिन आयुष्याची माती झालेली असताना नैसर्गिक आपत्तीचा डोंगर पेलवणार तरी कसा?
Blog by 'Life Coach & Business Mentor' Shailesh Tandel
Same Blog in English From Disaster Management to Fortune 500>>>
