जेव्हा कालचे यश आजचे ओझे बनते
कधीकधी मिळालेले यश आपल्याला चुकीचा धडा शिकवते.
एक जुनी गोष्ट आहे.
एके दिवशी एक गाढव नदीच्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर मिठाने भरलेले दोन पोती पाठीवर घेऊन जात होते. नदी ओलांडताना ते चुकून घसरले आणि पाण्यात पडले.
जेव्हा ते धडपडत पुन्हा उभे राहिले, तेव्हा त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट जाणवली. त्याचे ओझे बरेच हलके झाले होते, कारण त्या पोत्यांमधील काही मीठ पाण्यात विरघळले होते.
गाढव सुटकेचा नि:श्वास टाकत घरी परतले; घडलेल्या प्रकारामुळे ते एक प्रकारे आनंदीही होते कारण त्याला आज एक नवीन शोध लागला होता.
ओझे नेमके कशामुळे हलके झाले, हे समजून घेण्याऐवजी त्याने एक चुकीचा निष्कर्ष काढला.
"आता मला गुपित कळाले आहे! जेव्हा जेव्हा ओझे खूप जड वाटेल, तेव्हा फक्त नदीत पडायचे!"
पुढच्या वेळी, गाढव कापसाची दोन पोती घेऊन जात होते.
आधीचा अनुभव आठवून, त्याने मुद्दाम नदीत उडी मारली, त्याला वाटले की यावेळीही ओझे हलके होईल.
पण कापसाचा गुणधर्म वेगळा असतो. यावेळी परिणाम पूर्णपणे वेगळे होते.
मीठ पाण्यात विरघळते, तसे कापूस विरघळला नाही; उलट, त्याने पाणी शोषून घेतले, ज्यामुळे ओझे अधिकच जड झाले. इतके जड की, गाढवाला पुन्हा उभे राहणेही कठीण झाले.
गाढवाने तीच कृती पुन्हा केली, त्याच निकालाची अपेक्षा ठेवून; पण त्याला हे उमजलेच नाही की, ज्या गोष्टीमुळे आधीचा सुखद अनुभव आला होता तशीच परिस्थिती यावेळी नव्हती.
अनेकदा आपल्याकडून होणारी एक चूक
आयुष्यात अनेकदा असे घडते की, आपण एखादी गोष्ट एकदा करतो... आणि ती यशस्वी ठरते.
एखादा निर्णय यशस्वी ठरतो.
एखादी रणनीती योग्य ते परिणाम देते.
एखादा शॉर्टकट समस्या सोडविण्यासाठी उपयोगी ठरतो.
आणि हळूहळू, आपण असा विश्वास ठेवू लागतो की...
"हेच यशाचे एकमेव सूत्र आहे."
परंतु, एखादी गोष्ट एकदा यशस्वी झाली, याचा अर्थ असा नाही की ती आपल्या हुशारीमुळेच यशस्वी झाली होती.
कदाचित ती केवळ परिस्थिती अनुकूल असल्यामुळे यशस्वी झाली असावी.
जसे मिठाचे ओझे वाहणाऱ्या गाढवाच्या बाबतीत घडले होते.
आकलन विरहित यश
अपयश येणे हा खरा धोका नाही.
खरा धोका तो आहे, जिथे यश मिळते, पण ते का मिळाले हे आपण समजून घेतलेले नसते.
जेव्हा आपण एखाद्या निकालामागची कारणे शोधत नाही, तेव्हा आपण तीच कृती सर्वत्र पुन्हा पुन्हा करू लागतो.
एका परिस्थितीत यशस्वी ठरलेली गोष्ट आपण दुसऱ्या परिस्थितीतही वापरतो.
लोकं वेगळी असतात.
परिस्थिती वेगळी असते.
वेळही वेगळी असते.
पण आपली पद्धत मात्र तीच असते.
आणि कधीकधी, कापसाच्या ओझ्याखाली दबलेल्या गाढवाप्रमाणे, तीच पद्धत अचानक पूर्वीपेक्षाही अधिक जड ओझे बनून बसते.
विशेष म्हणजे, आपल्या आसपास असे घडताना आपण अनेकदा पाहतो, पण आपल्याला त्याची जाणीवही नसते.
एखाद्या व्यावसायिकाचा विचार करा, जो विक्री, विपणन (मार्केटिंग) आणि ग्राहक संबंधांबाबत (Customer Relationship) एका विशिष्ट दृष्टिकोनाचा अवलंब करून व्यवसाय सुरू करतो.
आणि ते अतिशय प्रभावी ठरते. व्यवसायाचा विस्तार होतो, ग्राहकांची संख्या वाढते आणि यश मिळते.
कालांतराने, त्या व्यावसायिकाला असे वाटू लागते की, हेच ते 'यशस्वी सूत्र' आहे ज्याच्यामुळे व्यवसाय यशस्वी झाला.
अनेक वर्षांनंतर, बाजारपेठ बदलते. ग्राहकांच्या अपेक्षा बदलतात. स्पर्धा वाढते. तंत्रज्ञानात बदल होतात.
परंतु, तो व्यावसायिक मात्र त्याच जुन्या पद्धतींचा वापर करत राहतो आणि पूर्वीसारख्याच निकालांची अपेक्षा करतो.
ज्या पद्धतींमुळे एकेकाळी यश मिळाले होते, कदाचित आता त्याच पद्धती व्यवसायाला पुढील प्रगती करण्यापासून रोखत असाव्यात.
ज्या गोष्टींमुळे तुम्ही एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचलात, त्या गोष्टी तुम्हाला पुढच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतीलच असे नाही. कदाचित तोच सर्वात मोठा अडथळा असू शकतो.
किंवा अशा पालकाचा विचार करा जो एका मुलाला शिस्तीच्या एका विशिष्ट पद्धतीचा वापर करून वाढवतो.
ती पद्धत यशस्वी ठरते. मूल ऐकते, सूचनांचे पालन करते आणि जबाबदारीने मोठे होते.
जेव्हा दुसरे मूल जन्माला येते, तेव्हा पालक अगदी तीच पद्धत वापरतात.
पण दुसऱ्या मुलाचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि गोष्टी समजून घेण्याची पद्धत वेगळी असते.
पहिल्या मुलाच्या बाबतीत जे उत्तमरीत्या यशस्वी ठरले, तेच दुसऱ्या मुलाच्या बाबतीत अडथळा निर्माण करते.
तोच दृष्टिकोन का यशस्वी होत नाहीये, असा विचार पालक करू लागतात.
एका व्यक्तीसाठी जी गोष्ट यशस्वी ठरते, ती दुसऱ्या व्यक्तीसाठी यशस्वी ठरेलच असे नाही, जरी हेतू तितकाच चांगला असला तरी.
आणि हे केवळ व्यवसाय किंवा नातेसंबंधांपुरते मर्यादित नाही.
कधीकधी, आपल्या स्वतःच्या सवयीसुद्धा स्वतःच्याच मार्गातील अडथळा किंवा मर्यादा बनू शकतात.
एखादी व्यक्ती एक अशी दिनचर्या विकसित करते, जी तिला अधिक कार्यक्षम बनण्यास मदत करते. लवकर उठणे, काटेकोरपणे वेळापत्रकाचे पालन करणे, दिवसाच्या प्रत्येक मिनिटाचे व्यवस्थापन करणे वगैरे. कारण यामुळे आयुष्यात उत्तम परिणाम मिळतात.
पण कालांतराने, जबाबदाऱ्या बदलतात. प्राधान्यक्रम बदलतात. आयुष्यातील परिस्थिती बदलते.
तरीही ती व्यक्ती त्याच दिनचर्येचे पालन करत राहते, कारण तिला वाटत राहते की त्यात कोणताही बदल म्हणजे शिस्तीचा अभाव.
मदत करण्याऐवजी, ती दिनचर्या अनावश्यक दबाव निर्माण करू लागते.
एखादी चांगली सवयसुद्धा ती अंगीकारणाऱ्या व्यक्तीनुसार विकसित होणे आवश्यक असते.
अनुभव: संपत्ती की ओझे?
अनुभव मौल्यवान असतो.
परंतु, ज्या अनुभवावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात नाही, ते शहाणपण किंवा ज्ञान हळूहळू कालबाह्य होऊन जाते.
कधीकधी, ज्या गोष्टींनी आपल्याला भूतकाळात मदत केली, त्या आजही वर्तमानातील आव्हानांचा सामना करताना उपयुक्त ठरू शकतात.
तर कधी, आपल्याला आपल्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करून, त्यात सुधारणा करून आणि बदल करून, त्याला सध्याच्या परिस्थितीनुसार सुसंगत बनवावे लागते.
परंतु, आपण असे गृहीत धरू शकत नाही की, एकच रणनीती प्रत्येक परिस्थितीत प्रभावी ठरेल.
मग ती परिस्थिती खालीलपैकी कशाशीही संबंधित असो:
- लोकांशी व्यवहार करणे
- विविध प्रसंगांना हाताळणे
- व्यावसायिक प्रणाली हाताळणे
- स्वतःशी संबंधित बाबी हाताळणे
कारण…
- बाजारपेठा बदलतात.
- नातेसंबंध विकसित होतात.
- व्यक्तींमध्ये प्रगती आणि बदल होतात.
- परिस्थिती बदलत असते.
तरीही, आपण अनेकदा आजच्या वास्तवासाठी कालचेच सूत्र वापरत राहतो.
हे सूत्र आजही प्रभावी आहे म्हणून नाही, तर एकेकाळी ते प्रभावी ठरले होते, म्हणून आपण ते वापरत राहतो.
याचा अर्थ असा नाही की, ज्या अनुभवांनी आपल्याला पूर्वी अपेक्षित परिणाम दिले, त्यावर विश्वास ठेवणे सोडून द्यावे किंवा त्यांना पूर्णपणे नाकारावे. याचा अर्थ फक्त इतकाच की, एखादा अनुभव पूर्वी यशस्वी ठरला होता, म्हणून तो आजही तसाच उपयुक्त ठरेल, असे गृहीत धरणे थांबवले पाहिजे.
अनुभवाने आपल्याला मार्गदर्शन केले पाहिजे, पण आपण त्याचे कैदी असता कामा नये.
पुढच्या नदीकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न
एखादी पद्धत, जी पूर्वी यशस्वी ठरली होती, ती पुन्हा वापरण्यापूर्वी क्षणभर थांबून विचार करणे योग्य ठरेल.
स्वतःला विचारा:
ती पद्धत माझ्या कौशल्यामुळे यशस्वी झाली होती...
की परिस्थितीमुळे?
मी ती पुन्हा वापरतोय कारण ती अजूनही समर्पक आहे...
की फक्त म्हणून की ती पूर्वी यशस्वी ठरली होती?
तेव्हा मी मीठ वाहून नेत होतो आणि आता कापूस तर नाही?
कारण, कधीकधी नदी तीच असते.
पण आपण जे सोबत वाहून नेत आहोत, ते बदललेले असते.
Blog by 'Life Coach & Business Mentor' Shailesh Tandel
You may explore:
1:1 Coaching | Business Mentoring | Corporate Training | Executive Coaching | Workshops
This article is an original work and may be shared through its original link, but should not be reproduced or republished without permission.
