निवडलेल्याच शर्यतीत आपण धावतोय का?

चंपू

त्रस्त होती चंपुची वाईफ,
नॉन-हेपनिंग होती तिची लाईफ.
चंपुला मिळत नव्हता आराम,
सतत करत राहायचा काम.

चंपूचा बॉसही होता कूल,
प्रमोशनच्या नावाने बनवायचा फूल.
पण विसरायचा नाही डेडलाईन,
काम करून घ्यायचा टिल नाईन.

चंपूलाही बनायचं होतं बेस्ट,
म्हणूनच घ्यायचा नाही रेस्ट.
दिवसरात्र करायचा बॉसची गुलामी,
ऑनसाईटच्या आशेवर द्यायचा सलामी.

दिवस गेले, गेली कितीतरी वर्षं,
चंपूच्या आयुष्यात उरला नाही हर्ष.
चंपूला आता आठवेना काही,
बायकोलाही कधी म्हणायचा "ताई".

शेवटी एक दिवस चंपूचा बल्ब पेटला,
ऑनसाईटच्या मोहाचा दोरच तुटला.
बॉसला म्हणाला, "का सतावतोस?
ऑनसाईटचा पेढा दाखवून का वेडा बनवतोस?"

"प्रमोशन नाही दिलेस तर निघून जाईन,
ऑनसाईट दिलीस तरी परत न येईन."

बॉस हसून म्हणाला, "जा पाहिजे तिकडे,
अजून खूप सारे चंपू आहेत माझ्याकडे."

"हे संपूर्ण जग चंपूंनीच भरलेलं आहे,
आणि सर्वांनाच पुढे जायची घाई आहे.
तू नाही केलंस तर दुसऱ्याकडून करून घेईन,
तुझ्याजागी दुसरा चंपू, तुझी जागा घेईल."

- शैलेश तांडेल


या चंपूवर मनसोक्त हसताना कदाचित तुम्हाला, तुमच्या ऑफिसमधला, मित्रांमधला किंवा शेजारचा, एखादा चंपू आठवला असेल.

किंवा कदाचित मनात आलं असेल...
"अरे, हा चंपू तर आपल्या एकदम ओळखीचा दिसतोय..."

थोडा वेळ थांबून विचार करून पहा, कदाचित असे चंपू तुम्ही खूप पाहिले असतील
आणि कदाचित काहींच्या नजरेत आपणही चंपू असू शकतो.

असं तर नाही की...आपल्या प्रत्येकामध्ये कुठेना कुठेतरी असा चंपू थोड्याफार फरकाने दडलेला असतो.

फरक इतकाच की एखादा चंपू बॉसकडून प्रमोशन मिळण्याच्या आशेवर जगत असतो,  तर दुसऱ्या कुणाचा, समाजाच्या अपेक्षांवर किंवा एखादा स्वतःच्याच मनातील न्यूनगंडामुळे चंपू झालेला असतो.

कुणी "थोडं अजून सहन करूया" म्हणत एकामागून एक वर्षे घालवत राहतो.
कुणी "योग्य वेळ आली की सुरुवात करेन" असं म्हणत राहतो.
तर कुणी "आत्ता हे करणं शक्य नाही" म्हणत स्वतःची कितीतरी स्वप्नं बासनात गुंडाळून ठेवून देतो.

आणि गंमत म्हणजे, यापैकी बहुतेक वेळा आपल्यातील चंपू आपल्याला दिसतही नाही कारण...

तो दुसऱ्यांमध्ये अगदी सहजपणे दिसतो,

पण स्वतःमध्ये ओळखायला थोडंसं धैर्य लागतं.


दैनंदिन जीवनात अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात.

कधीकधी असंही होतं की, आपण कुणाला तरी धावताना पाहतो आणि आपल्या स्वतःला कळायच्या आत आपणही धावायला सुरुवात करतो.

कुणीतरी पुढे गेलं की आपल्यालाही पुढे जायचं असतं.
कुणाला प्रमोशन मिळालं की आपल्यालाही ते हवं असतं.
कुणी मोठं घर घेतलं की आपल्यालाही तसंच काहीतरी हवंसं वाटतं.
कुणी व्यवसाय सुरू केला की आपल्याही मनात विचार येतो, "मी पण सुरु करू का व्यवसाय?"

हे सगळं चुकीचं आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही.

प्रगतीची किंवा पुढे जाण्याची इच्छा असणं चुकीचं नाही.
पैसा, प्रतिष्ठा, सुरक्षितता किंवा चांगलं आयुष्य मिळवण्याची इच्छा असणंही चुकीचं नाही.

काय चुकीचे आहे यावर मी बोलतच नाही आहे.
माझा प्रश्न वेगळा आहे...
हे सगळं आपल्याला खरंच हवं आहे का?

की कुणीतरी सांगितलं म्हणून?
की सगळे करत आहेत म्हणून?
की समाजाने यशाची जी व्याख्या आपल्यासमोर ठेवली आहे, ती आपणही नकळत स्वीकारली म्हणून?

प्रत्येकवेळी लोकं जे करताहेत ते आपल्यालाही करायलाच हवे का?
नक्कीच गरज नसते त्याची पण तरीही कित्येकदा आपण ते करतच असतो.

स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडायला देखील काहीच हरकत नसते आणि स्वतःचा मार्ग निवडणे म्हणजे नेहमीच गर्दीच्या विरुद्ध जाणे असतेच असे नव्हे.

कधी कधी गर्दी ज्या दिशेने चालली आहे, त्याच दिशेने जाणं हाही आपलाच निर्णय असू शकतो.
फक्त तो निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलेला असावा.


कित्येकदा, आपल्याला हेही ठाऊक नसते की आपण जातोय तरी कुठे.
का पळत सुटलोय आणि ही शर्यत खरंच आपण स्वतः निवडली आहे का?

कधी विचारला आहे का हा प्रश्न, तुम्ही स्वतःला?

शर्यत आपली आहे की उंदरांची, तेच कळत नाही.
कितीही पळालो तरी पुन्हा पुन्हा त्याच जागी येऊन पोहोचतो.

पुढे कोण आहे हे पाहत आपण धावत राहतो.
कोणीतरी आपल्यापेक्षा पुढे गेला की आपण वेग वाढवतो.
कोणीतरी मागे पडला की क्षणभर समाधान मानतो.

पण त्या धावण्यात एक प्रश्न आपण क्वचितच विचारतो—

"मी कुठून निघालो होतो?"
आणि त्याहून महत्त्वाचा
"मला खरंच इथेच पोहोचायचं होतं का?"

कारण सुरुवात कुठून केली हेच जर माहीत नसेल, तर आपण किती पुढे आलो याचा हिशोब लागणार तरी कसा?

आणि जर आपण दिशा निवडलेलीच नसेल, तर त्या दिशेने कितीही वेगाने धावलो तरीही आपल्या इच्छित स्थळी पोहोचणार तरी कसे.


हिंदीत एक उक्ती आहे, "उम्मीद पे दुनिया कायम है"

आणि खरंच, आशेवरच तर जग चालतं.

उद्या चांगलं होईल.
परिस्थिती बदलेल.
प्रमोशन मिळेल.
पैसे वाढतील.
मुलं मोठी होतील.
कधीतरी वेळ मिळेल.
कधीतरी आपण आपल्या मनाप्रमाणे जगू.

आशा ठेवण्यात काहीच चुक नाही.

पण नुसतं आशेवर जगून चालत नाही; थोडंफार वास्तवाचे भानही असावं लागतं. नाही का?

कधीतरी त्या आशावादी जगातून बाहेर पडून हे तपासण्याची तसदी घ्या...
ज्या दिशेने आपण चाललो आहोत, तिथेच आपल्याला पोहोचायचं आहे का?

कारण कधी कधी "एक दिवस सगळं ठीक होईल" ही आशा आपल्याला पुढे घेऊन जाते. पण कधी कधी तीच आशा आपल्याला एकच जागी थांबवून ठेवते.

"आत्ता नको... एक दिवस करू."
"आत्ता परिस्थिती योग्य नाही... नंतर बघू."
"थोडं अजून सहन करूया."
"एक दिवस सगळं ठीक होईल."

आणि त्या "एक दिवसाची" वाट पाहता पाहता आजचा दिवस निघून जातो आणि त्यानंतर महिने आणि शेवटी कितीतरी वर्षे.

आणि एक दिवस मागे वळून पाहताना जाणवतं...
ज्याची आपण वाट पाहत होतो, तो दिवस आला की नाही माहीत नाही; पण वाट पाहता पाहता आयुष्य नक्कीच पुढे निघून गेलं. आणि काही बाबतीत तर आयुष्याचीच वाट लागलेली असते.


पण याचा अर्थ असाही नाही की, आयुष्यात मोठमोठे निर्णय आत्ताच्या आता घ्या, नोकरी सोडा, व्यवसाय करा, जोखीम घ्या आणि स्वतःच्या आवडीच्या मागे सुसाट पळत सुटा.

सगळ्यांसाठी एकच मार्ग योग्य असतो असं कुणी आणि कुठे सांगितलं आहे?

प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने अद्वितीय असते. विचारसरणी, सुरक्षितता, यश आणि मूल्ये या बाबतीत प्रत्येकजण इतरांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे, त्यांना एका साच्यात बांधणे किंवा एकाच मार्गावर चालण्यास भाग पाडणे कदापि शक्य नाही.

कुणासाठी नोकरी योग्य आहे.
कुणासाठी व्यवसाय.
कुणासाठी स्थिर आयुष्य.
कुणासाठी सतत नवीन काही करण्याची ओढ.

महत्त्वाचं हे नाही की दुसरा काय करतोय.

महत्त्वाचं हे आहे की...
आपल्यासाठी काय योग्य आहे हे आपल्याला माहीत आहे का?

गर्दी म्हणते म्हणून नोकरी सोडणे म्हणजे स्वतःचा मार्ग निवडणे नाही.
गर्दी म्हणते म्हणून नोकरीत राहणेही स्वतःचा मार्ग निवडणे नाही.

गर्दीच्या विरुद्ध जाणं म्हणजे स्वातंत्र्य नाही.

स्वतःची दिशा स्वतः ठरवणं म्हणजे स्वातंत्र्य.


धोका पत्करायचा म्हणजे काहीतरी तुफानीच करायला हवं, असा एक गैरसमजही आपल्याकडे आहे.

नोकरी सोडा.
सगळं विकून व्यवसाय करा.
जग फिरायला निघा.
पॅशन फॉलो करा.

हे सगळं काही लोकांसाठी अगदी योग्य असू शकतं.
पण दुसऱ्यासाठी तेच चुकीचं ठरू शकतं.

कारण दुसऱ्याचं धाडस पाहून आपण घेतलेली जोखीम ही धाडस नसून कित्येकदा खड्ड्यात पडण्याचं आमंत्रण असतं.

आपल्याला काय जमतं, काय हवं आहे, आपली परिस्थिती काय आहे, आपली जबाबदारी काय आहे आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, याचा विचार न करता घेतलेली जोखीम ही धाडस नसून आणखी एक प्रकारचं गर्दीचं अनुकरण असू शकतं.

म्हणून प्रश्न असा नाही की,

"मी किती मोठी जोखीम घेऊ शकतो?"
प्रश्न असा आहे,
"माझ्या आयुष्यासाठी योग्य असलेली जोखीम कोणती?"


आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या निर्णयाची गरज नसते.

कधी कधी फक्त थांबण्याची गरज असते.
पळता पळता एक क्षण थांबून मागे पाहण्याची.

मी कुठून सुरुवात केली होती?
आज कुठे आहे?

आणि मला खरंच कुठे पोहोचायचं आहे?

कदाचित त्यानंतर आपल्या लक्षात येईल की...

आपण अगदी योग्य दिशेने चाललो आहोत.
कदाचित दिशा बदलण्याची गरज भासेल.
कदाचित वेग कमी करावा लागेल.
कदाचित थोडा वाढवावा लागेल.

आणि कदाचित काही काळासाठी तिथेच थांबणंही आवश्यक असेल.

पण निदान पुढचा प्रवास हा पूर्णपणे आपला निर्णय असेल.

कारण आयुष्य किती वेगाने जगलो यापेक्षा, ते आपल्या मनाप्रमाणे जगलो का, हा प्रश्न शेवटी जास्त महत्त्वाचा ठरतो.

म्हणून तुमचे आयुष्य घडविण्यासाठी कुणाच्यातरी बटन दाबण्याची वाट पाहू नका.

कुणीतरी तुम्हाला प्रमोशन देईल म्हणून थांबू नका.
कुणीतरी तुमच्या आयुष्याला योग्य दिशा दाखवेल म्हणून थांबू नका.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे...
"एक दिवस सगळं ठीक होईल" या आशेवर आजचा दिवस जगणं थांबवू नका.

एक छोटीशी सुरुवात करा.
एका वेळेला एक पाऊल पुढे टाका.

सुरुवात कितीही छोटी का असेना, ती होणं महत्त्वाचं असतं.

कारण शेवटी...

गर्दी कुठे चालली आहे, हे पाहत राहण्यापेक्षा आपण कुठे जायचं ठरवलं आहे, हे माहीत असणं अधिक महत्त्वाचं आहे.

आणि जर कधी स्वतःमध्ये चंपू दिसला तर त्याला हसून विचारा...

"अरे चंपू... आपण चाललोय तरी कुठे?"

 

Same Blog in English>>>


Blog by 'Life Coach & Business Mentor' Shailesh Tandel

You may explore:
1:1 Coaching | Business Mentoring | Corporate Training | Executive Coaching | Workshops

 

Tagged , , , , , , , , , .

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *