उद्योजकाची शिस्त – शाश्वत यशाचे खरे इंजिन

कोणत्याही कंपनीचे यश पूर्णपणे अवलंबून असते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर आणि ती म्हणजे ‘शिस्त’ आणि त्या शिस्तीची सुरुवात त्या कंपनीच्या मुख्य नेतृत्वापासूनच होते.

शिस्त असेल तर प्रत्येक गोष्ट एका ठराविक नियोजनानुसारच घडत असते. नियोजन नसेल तर एखादवेळ नशिबाने यश मिळेलही पण तीच किमया कायम साधणे शक्य नसते. शिस्त नसेल तर जिंकणे फक्त नशिबाचाच भाग असू शकतो आणि अशा कंपनीवर कुणी विश्वासही ठेवत नाही कारण उगाचच कुणी स्वतःला खड्ड्यात का म्हणून घालणार कारण शेवटी प्रत्येकाला काहीही झाले तरीही फक्त आणि फक्त नफाच हवा असतो. शेवटी, कोणीही गमावण्याच्या आशेने वेळ, पैसा किंवा ऊर्जा गुंतवत नाही.

व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या गुंतवणुकीसाठी देखील काय काय करावे लागते याचा विचार करून बघा मग ह्या गोष्टीचे गांभीर्य जाणवेल तुम्हाला. आर्थिक शिस्त नसेल तर बँकाच काय पण वैयक्तिक कर्जही न मिळण्याची नामुष्की येते कित्येकदा आमच्यावर. पण जर का तुम्ही एका शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असाल तर वर्तमानात जरी नुकसान होत असेल तरीही भविष्यातील फायदा लक्षात घेऊन लोकं रांगा लावतात आपल्या मागे. पण जर शिस्त नसेल तर जेवढे दिवस किंवा वर्ष तुम्ही उद्योगात टिकलेले असाल तो तुमच्या कर्तुत्वाचा कमी आणि नशिबाचाच भाग जास्त असेल.

तुमच्या मनात आले आणि तुम्ही घोड्यावर मांड टाकली असे नाही होत कारण घोडा जरी एक मूक प्राणी असला तरीही त्याला माणसाच्या दहापट बळ असते त्यामुळे कुणीही मन केलं म्हणून त्याच्यावर स्वार नाही होऊ शकत. जर कुणी जबरदस्ती स्वार झालाच तर तो घोडा त्या माणसाला कुठच्या कुठे फेकून देतो पण जर का त्याला प्रेमाने गोंजारले, चांगली वागणूक दिली, काळजी, मार्गदर्शन आणि ठामपणे त्याच्याशी वागलात आणि जर तुमच्या भावना जुळल्या तर तो तुम्हाला अथकपणे वाहून नेईल, आणि तुमच्यासाठी महाराणा प्रतापांच्या चेतकाप्रमाणे पूर्ण ताकदीनिशी पळेल. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेत सदैव तत्पर.

आपला उद्योगधंदा तरी कुठे त्या घोड्यापेक्षा वेगळा असतो?

तिथे चार पायाचा घोडा नसतो तर असतात हाडामासाची जिवंत माणसे आणि त्याचबरोबर आपली आर्थिक व मानसिक गुंतवणूक. घोड्याप्रमाणे, त्याला संतुलन, गरज पडल्यास प्रोत्साहन आणि गरज पडल्यास कठोर उपाययोजनांची आवश्यकता असते. तुम्ही कितीही मेहनती, कुशल किंवा ज्ञानी असलात तरी, तुम्ही स्वतःहून एका विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढू शकता. खरा विस्तार तेव्हा होतो जेव्हा तुमच्या संपूर्ण संस्थेत शिस्त असते आणि सुरुवात तुमच्यापासून होते.

लयबद्धता, गती आणि संस्कृती केवळ शिस्तबद्ध पद्धतीने गोष्टी सातत्याने केल्यानेच जन्माला येतात. फक्त एकदाच किंवा जेव्हा मन करेल तेव्हाच केल्याने ती येण्याची सुतराम शक्यता नसते. शिस्त तशीही एका दिवसात नाही लावता येत, तर त्यासाठी सातत्याने ते करत राहणे गरजेचे असते. नाहीतर महिन्यातून एकदा व्यायाम कराल आणि तरीही वाढलेले पोट कमी होत नाही अशी तक्रार करत बसाल. त्याचप्रमाणे व्यवसायात अनियमित प्रयत्नांमुळे कायमस्वरूपी निकाल नाही मिळत.

वर्षानुवर्षे सतत शिस्तबद्ध पद्धतीने काहीतरी करणे खरोखर कंटाळवाणे असते, नाही का?

ते कंटाळवाणे काम आहे आणि ते आकर्षक देखील नाही. जे हे कंटाळवाणे काम विनातक्रार वर्षानुवर्षे करत राहतात त्यांच्या पायाशी यश लोटांगण घालते आणि म्हणूनच खूप कमी उद्योजक त्यात खरोखर प्रभुत्व मिळवतात. पण जे असे करतात, मग ते टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी असोत किंवा एखादा लहानसा व्यापारी किंवा रस्त्यावरील दुकानदार असोत, ते वर्षानुवर्षे त्यांचे यश टिकवून ठेवतात.

तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, पण जर तुम्हाला एकदाच नव्हे तर कायमचे आणि आधीच मिळवलेल्या यशापेक्षाही जास्त यश जर मिळवायचे असेल तर तुमच्याकडे शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याशिवाय पर्याय नाही.

तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही भाराभर माणसे कामाला ठेवले म्हणजे टीम झाली आणि त्यांच्याकडून काम मिळाले असे नसते तर जेवढी गरज आहे तेवढीच माणसे ठेऊन त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे आणि शिस्त संस्कृतीचा भाग असेल असे वातावरण निर्माण करणे. त्यासाठी सतत प्रशिक्षण, स्पष्ट अपेक्षा आणि नेतृत्वाने मांडलेले सातत्यपूर्ण उदाहरण सर्वात महत्वाचं असतं.

हे आम्हालाही पक्के ठाऊक असते की आयुष्यात पुढे जायचे असेल आणि संपादन केलेले यश टिकवायचे असेल तर शिस्त हवीच.
जाणतो आम्ही हे सर्व आणि हे ज्ञान काय नवीन नाही आहे आमच्यासाठी, पण हे माहित असतानाही कितीजण एका शिस्तीत सतत कार्यरत असतात?

शिस्त शिस्त शिस्त, काहीतरीच काय? नेहमीच काय त्याचे तुणतुणे वाजवायचे? यश अपयश तर येत-जातच असतात उद्योगधंद्यात, मग त्याचा का म्हणून एवढा बाऊ करायचा? तसेही शिस्त फक्त आणि फक्त हाताखालील कामगारांसाठी असते; उद्योजकासाठी तर नक्कीच नसते. शेवटी उद्योजक म्हणजे आम्ही आमच्या मनाचे राजे.

शिस्तीचे वावडे असते आम्हाला असे मुळीच नाही पण शिस्त म्हणजे बंधनच आणि आम्हाला तर पूर्ण स्वातंत्र्य हवे असते आपल्या मनाप्रमाणेच सर्वकाही करण्याचे. आणि बरेच जण नोकरीच्या बंधनांपासून वाचण्यासाठी, 'स्वातंत्र्य' मिळविण्यासाठी व्यवसाय सुरू करतात. परंतु अनेकदा, ते तथाकथित स्वातंत्र्यच अराजकतेला कारणीभूत ठरते. जर तुम्ही तुमचे वेळापत्रक पर्यायी मानले आणि तुमची वचने पाळण्यात चालढकल केलीत तर त्या राजाचा रंक किंवा नामधारी राजा व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण त्या राजाचे साम्राज्य सर्वदूर पसरून त्या राजाचा सम्राट व्हायला मात्र खूप वेळ लागतो आणि ते शक्य होते उद्योगात उतरल्यापासून एका शिस्तबद्ध प्रवासानेच.

आयुष्यात मिळालेले प्रत्येक महत्त्वाचे यश, मागे वळून पहा आणि विचार करा की ज्या ज्या वेळी तुम्हाला यशप्राप्ती झाली होती ती तुमच्या मनमानी कारभाराचे फलित होते की तुमच्या पूर्वीच्या चुकीच्या कर्मांमुळे त्यावेळी मिळालेल्या फटक्यांनी काही काळाकरता तुम्ही सुतासारखे सरळ झाला होतात आणि यश संपादन केल्यावर पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या म्हणजे जुन्या सवयींमध्ये पुन्हा एकदा स्थानापन्न. आणि तरीही आश्चर्य देखील वाटते की आमची प्रगती का थांबते.

स्वप्ने, कितीही मोठी असली तरी, सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध कृतीशिवाय वास्तवात येत नाहीत. आयुष्य जर नियोजनबद्ध नसेल आणि मेहनतीत सातत्य नसेल तर तुम्हाला तेच मिळेल जे तुम्हाला नकोसे आहे. फक्त मोठीमोठी स्वप्ने पाहून किंवा जे हवं ते मी कधीच प्राप्त केलेय अशा कल्पनेच्या जगात वावरून फक्त वल्गना केल्याने जे हवे ते नाही प्राप्त करता येत. तसे असते तर दिवास्वप्ने पाहणारी प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश असती, नाही का?

सत्य हे आहे की, संभाव्य ग्राहक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत; तुम्ही कितीही अनुभवी किंवा प्रसिद्ध असलात तरीही, जोपर्यंत त्यांना तुमच्या व्यवसायात शिस्त दिसत नाही.

आमची समस्या अशी आहे की आम्हाला कोणत्याही नियोजनाशिवाय सर्वकाही लगेच हवे असते. जणूकाही आम्ही उद्योगात उतरल्याबरोबरच यश आमच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहे. तेही कोणतेही काम न करता.

हे काही लोकांच्या बाबतीत खरे असू शकते परंतु बहुतेकांच्या बाबतीत, तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांशी कितीही परिचित असलात आणि तुम्ही त्याच क्षेत्रातील जाणकार जरी असलात किंवा त्याच उद्योगात इतक्या वर्षांचा अनुभव असला तरीही नोकरी सोडल्यानंतर तुम्ही स्थिर नसल्यास लोक तुमच्यासोबत काम करण्याचे धाडस करणार नाहीत. कारण तुमच्या कामाच्या अनुभवापेक्षा तुमचा उद्योग हाताळण्याचा अनुभव हा नेहमीच वेगळा असतो.

नोकरीत कुणीतरी तुमच्याकडून काम करून घेत होते किंवा तुम्ही कुणाला तरी उत्तरे देणे बंधनकारक होते. डेडलाइन, जबाबदारी आणि एका संरचनेत तुम्हाला काम करणे भाग होते त्यामुळे एक शिस्त कायम होती पण तुम्ही स्वतःच उद्योजक झाल्यावर तुमच्याकडून काम करून घेण्यासाठी कुणीच नसतो त्यामुळे तुमची नवीन कार्यपद्धती आणि एकंदरीत शिस्तबद्धता जाणणे क्रमप्राप्त असते. म्हणूनच एक उद्योजक म्हणून, तुम्हाला स्वतःसाठी एक नवीन संरचना तयार करावी लागते.

तुम्ही सर्वांना संतुष्ट करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक मागणीशी जुळवून घेऊ शकत नाही. तुम्ही जे करू शकता ते म्हणजे स्पष्ट ध्येये निश्चित करणे आणि स्वतःला, तुमच्या कंपनीला शिस्त लावणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे.

कोणताही व्यवसाय केवळ नशिबाच्या किंवा हाताळणीच्या जोरावर खूप पुढे जाऊ शकत नाही. मोठे, चिरस्थायी यश तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता, ते पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असता आणि अढळ शिस्तीने त्याकडे दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे वाटचाल करता.

जर तुम्हाला असा व्यवसाय तयार करायचा असेल जो टिकून राहील, तर शिस्तीला 'पिंजरा' नाही तर 'पंख' समजा, जे तुम्हाला नशिबापेक्षा खूप पुढे घेऊन जातील.

आणि जर तुम्ही असे उद्योजक आहात ज्याला शिस्तीचे मूल्य माहित आहे परंतु व्यवसाय संचालन, नेतृत्व आणि प्रगतीच्या धोरणाला रोजची सवय बनवण्यासाठी संघर्ष करत असाल, तर मी मदत करू शकतो, माझ्या वैयक्तिक व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी, अशा काही संरचना, सवयी आणि प्रणाली तयार करू शकतो, ज्या तुमच्या शिस्तीला सर्वात शक्तिशाली प्रगतीच्या इंजिनात परिवर्तीत करतील.

कारण शेवटी, हे कठोर परिश्रम करण्याबद्दल नाही, तर ते अशा प्रकारे काम करण्याबद्दल आहे ज्याने यश वर्षानुवर्षे कायम राहते.

Blog by 'Life Coach & Business Mentor', Shailesh Tandel

Same Blog in English Entrepreneurial Discipline — The True Engine of Long-Term Success

Life Coach | Business Mentor | Executive Coach | Corporate Trainer | Searchlight Within | Entrepreneur | Discipline |

Posted in Marathi Blogs, Planning, Success Mantra and tagged , .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *