आपण कृष्णाची उपासना करतो; पण आपण त्याचे ऐकतो का?
भारतीय संस्कृतीत कृष्ण हा कदाचित सर्वात प्रिय आणि पूजनीय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे.
आपण त्याचा जन्मोत्सव साजरा करतो आणि त्याच्या बालपणीच्या कथा आपल्याला अगदी स्पष्टपणे आठवतात.
त्याची बासरी, त्याची खेळकर वृत्ती, त्याचे मनमोहक व्यक्तिमत्त्व आणि त्याच्याशी जोडलेले गोपिकांचे प्रेम यांबद्दल जेवढा आपल्याला आदर असतो तेवढीच ओढ देखील असते.
कोट्यवधी लोकांसाठी कृष्ण हा केवळ एखादा ऐतिहासिक किंवा तात्विक व्यक्तिमत्त्व नाही तर तो साक्षात परमेश्वर आहे. आणि म्हणूनच, त्याची आठवण आणि उपासना केली जाणे साहजिक आहे.
पण, अलीकडे माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळाच प्रश्न घोळतोय...
आपण कृष्णाची उपासना करतो; पण आपण त्याचे म्हणणे ऐकतो का?
केवळ त्याच्याबद्दलच्या कथा ऐकणे नव्हे, तर त्याने आपल्याला काय शिकवण्याचा प्रयत्न केला, हे आपण समजून तरी घेतो की नाही.
कारण बासरी वाजवणारा कृष्ण आणि कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या अर्जुनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कृष्ण, हे दोन्हीही एकच होते.
आणि त्यांच्यात झालेला तो संवाद मानवी इतिहासातील सर्वात विलक्षण संवादांपैकी एक आहे.
शाळेतील वर्ग नव्हे, युद्धभूमी
भगवद्गीता शाळेच्या शांत वातावरणातील एखाद्या वर्गात सांगितली गेली नव्हती. किंवा कृष्णाने अर्जुनाला एखाद्या पर्वतावर नेऊन, आपल्या लक्ष्यावर मन कसे केंद्रित करावे, किंवा अशा तत्सम गोष्टी पाळण्यासाठी आज्ञांची यादी दिली नव्हती.
त्याने अर्जुनाशी रणांगणाच्या मधोमध संवाद साधला होता.
जर व्यवस्थितपणे पाहिले तर लक्षात येईल...
'जीवनातील महत्त्वाचे धडे गिरवताना आपले आयुष्य क्वचितच शांत असते.'
शांतपणे आणि एकाग्र चित्ताने एखादे पुस्तक वाचत बसलेलो असताना, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्यांशी, आपण नक्कीच झगडत नसतो.
कधीकधी, आयुष्य आपल्याला अगदी गोंधळाच्या परिस्थितीत आणून दोन अवघड गोष्टींपैकी एकीची निवड करायला भाग पाडते...
जबाबदारी आणि भावना यातील निवड.
काय हवे आहे आणि काय योग्य आहे यामधील द्वंद.
वैयक्तिक नातेसंबंध आणि व्यापक जबाबदारी यांच्या पैकी एकाची निवड.
आणि अचानक, आपल्याला काय करावे ते कळत नाही.
अर्जुनाची अवस्था अगदी तशीच होती.
गीतेचा उपदेश सुरू होण्यापूर्वी, अर्जुनाकडे बुद्धिमत्तेची कमतरता नव्हती आणि तो दुर्बळही नव्हता. तो त्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ योद्ध्यांपैकी एक होता आणि तो अत्यंत ज्ञानीदेखील होता. आणि कदाचित त्यामुळेच कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संभाषण इतके विलक्षण ठरले.
कृष्णाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट अर्जुनाने केवळ शांतपणे ऐकून मान्य केली नाही तर मिळालेल्या प्रत्येक उत्तरा समोर, एक नवीन प्रश्न तो मांडत होता. तसेच उत्तर समजून घेताना नवनवीन शंकांचे निरसन देखील तो करून घेत होता. कारण त्याचे प्रश्न हे कोणत्याही गोष्टीवर डोळे मिटून विश्वास ठेवणाऱ्या किंवा आंधळेपणाने सूचना स्वीकारणाऱ्या व्यक्तीचे प्रश्न नव्हते.
ते प्रश्न अशा व्यक्तीचे होते जी सखोल विचार करून ते समजून घेण्याच्या प्रयत्नात होती.
आणि अशा व्यक्तीचे जी, मिळणारी उत्तरे त्याच्या भावनांना आव्हान देणारी असतानाही पुढील प्रश्न विचारण्यास तत्पर होती.
कदाचित याच गुणांमुळे अर्जुन अशा प्रकारचा संवाद साधण्यास समर्थ ठरला.
आणि कृष्ण त्याला केवळ 'काय करावे' हे सांगत नव्हता तर मानवी जीवनाविषयीच्या अत्यंत सखोल संवादात दोन प्रगल्भ मने गुंतलेली होती.
आणि हो, कृष्णाने अर्जुनाशी हा संवाद साधण्याचे ठरवले, त्यामागे केवळ त्यांची जवळीक हेच एकमेव कारण नव्हते.
अर्जुन तो संवाद ग्रहण करण्यास समर्थ होता.
त्यावर प्रश्न विचारण्यास समर्थ होता.
त्यावर चिंतन करण्यास समर्थ होता.
आणि शेवटी, त्या संवादातून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्यास समर्थ होता.
गीतेची सुरुवात एका माणसाची मनस्थिती ढासळण्याने होते.
अर्जुन, त्याच्या काळातील महान योद्ध्यांपैकी एक होता तरीही, युद्धाच्या त्या निर्णायक क्षणी तो खचून गेला.
युद्धभूमीवर त्याने त्याच्या शिक्षकांना, नातेवाईकांना, आप्तस्वकीयांना पाहिले. समोर उभी ठाकलेली कितीतरी त्याचीच माणसे. आणि अचानक, त्याचे सर्व ज्ञान आणि क्षमताही त्याला स्पष्टपणे पाहण्यास मदत करू शकली नाही.
आपल्यापैकी किती जणांनी अशा प्रकारचा अनुभव घेतला आहे?
आवश्यक नाही की रणांगणावरच, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात...
करिअरबाबतचा एखादा कठीण निर्णय.
एखादे नाते जे अशा वळणावर आले आहे जिथे तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
अशी एखादी जबाबदारी जी आपण स्वीकारण्यास तयार नाही.
अशी एखादी निवड जिथे प्रत्येक पर्यायात आपल्यासाठी काहीना काहीतरी वेदना दडलेल्या असतात.
अशा क्षणी, केवळ ज्ञान पुरेसे नसते. गरज असते ती स्पष्टतेची.
आणि कदाचित त्यामुळेच कृष्णाचा अर्जुनासोबतचा संवाद कालातीत ठरतो.
गीतेची सुरुवात अशा एका अशा मनुष्यापासून होते जो पुढे पाऊल टाकण्यास तयार नाही.
आणि तिचा शेवट त्याच मनुष्याच्या कृती करण्यास सज्ज होण्याने होतो...
गोंधळाकडून स्पष्टतेकडे.
निष्क्रीयतेकडून कृतीकडे.
आसक्तीकडून जाणीवेकडे.
स्वतःच्याच विचारांत गुरफटून जाण्याकडून व्यापक संदर्भ समजून घेण्याकडे.
तो प्रवास कदाचित आजही तितकाच समर्पक आहे, जितका तो हजारो वर्षांपूर्वी होता. कारण मानवाने कदाचित आपले कपडे, तंत्रज्ञान आणि राहणीमान बदलले असेल; पण आपले आंतरिक संघर्ष मात्र आश्चर्यकारकपणे तसेच राहिले आहेत.
आपण आजही संघर्ष करतो...
भीतीशी.
आसक्तीशी.
इच्छेशी.
अहंकाराशी.
हानीशी.
कर्तव्याशी.
ओळखीशी.
नात्यांशी.
मृत्यूशी.
स्वातंत्र्याशी.
निवडीशी.
आणि आपल्या कृतींच्या परिणामांशी.
म्हणूनच, माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार, भगवद्गीता हे केवळ एकदा वाचून पूर्ण करता येण्यासारखे पुस्तक नाही. तर ती एक अशी गोष्ट आहे जिच्याकडे आपण पुन्हा पुन्हा परत येतो. आणि कधीकधी, आपण आधीच वाचलेल्या शब्दांमध्येच आपल्याला काहीतरी नवीन गवसते. ते शब्द बदलले आहेत म्हणून नव्हे; तर आयुष्याने आपल्याला ते शब्द समजून घेण्यासाठी एक नवीन संदर्भ दिलेला असतो, म्हणून.
'ऐकणे' आणि 'श्रवण करणे' यात फरक आहे.
या संवादाला अधिकच रंजक बनवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण रणांगणावर संवाद साधत होते तेव्हा तो संवाद केवळ त्यांच्या पुरताच मर्यादित नव्हता.
'दिव्य दृष्टी' लाभलेल्या संजयला कुरुक्षेत्रावरील घटना पाहता आणि ऐकता येत होत्या आणि तो क्षणाक्षणाची माहिती धृतराष्ट्राला देत होता.
एका अर्थाने, तोच संवाद एकापेक्षा अधिक व्यक्तींपर्यंत पोहोचला. पण प्रत्येक व्यक्तीने तो आपापल्या कुवतीनुसार ग्रहण केला.
अर्जुन त्या संवादाचा भाग असल्याने तो त्यात पूर्णपणे गुंतलेला होता.
त्याने प्रश्न विचारले. आणि स्वतःच्या मनाची घालमेल सुरू असतानाही त्याने मिळालेल्या उत्तरांवर चिंतन केले. शेवटी, त्याच्या विचार आणि आचारांचा पूर्णपणे कायापालट झाला.
दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयने हे सर्व पाहिले आणि त्या अनुभवाने त्याला अंतर्बाह्य हलवून सोडले.
त्याच्या डोळ्यांसमोर एक असाधारण घटना घडताना त्याने पाहिली आणि आपल्या परीने, त्या क्षणाकडे आणि कदाचित जीवनाकडेच त्याने एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्यास सुरुवात केली.
आणि तिसरी व्यक्ती, ‘धृतराष्ट्र’, ज्याने ते सर्व घडताना, त्याच क्रमाने ऐकले.
त्यालाही तोच वृत्तांत ऐकायला मिळाला होता तरीही, तो स्वतःच्याच मोहात खोलवर अडकलेलाच राहिला. जेव्हा युद्धाचे परिणाम स्पष्ट झाले, तेव्हाही त्याचे दुःख आणि आसक्ती त्याच्या प्रतिक्रियेला आकार देतच राहिली.
ते शब्द कदाचित त्याच्या कानांवर पडले असतील; पण ज्या अंतर्विश्वात तो जगत होता, तिथपर्यंत कदाचित ते विचार पोहोचू शकले नाहीत.
आणि या गोष्टीमुळे माझे ठाम मत झाले आहे की...
‘ऐकणे म्हणजे श्रवण करणे नव्हे’.
एकाच वेळी तिघांनी ज्ञानाने ओतप्रोत भरलेले तेच शब्द ऐकले पण...
एकाने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले.
दुसऱ्या व्यक्तीचे अंतर्बाह्य पूर्णपणे ढवळून निघाले.
आणि तिसऱ्याच्या कानावर तेच शब्द पडले पण कदाचित ते शब्द त्याच्या पूर्वापार समजुतीला आव्हान देणारे असल्याने त्याने ते विचार धुडकावून लावले.
जेव्हा आपण मिळणाऱ्या ज्ञानाला आपल्या स्वतःबद्दलच्या समजुती आणि पूर्वग्रहांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू देण्याची परवानगी देतो’, तेव्हाच ते आपल्या आयुष्याचा कायापालट करू लागते; अन्यथा नाही.
ही शिकवण माझ्या मनाला भिडण्यामागचे एक वैयक्तिक कारण
श्रीकृष्णाची शिकवण्याची पद्धत माझ्या मनाला इतकी खोलवर भिडते कारण...
केवळ कोणीतरी सांगितले म्हणून आपण एखादी गोष्ट स्वीकारू नये, असे मी नेहमीच मानत आलो आहे.
केवळ एखाद्या पुस्तकात लिहिले आहे म्हणून नाही.
केवळ एखाद्या शिक्षकाने सांगितले आहे म्हणून नाही.
आणि अर्थातच, मी सांगितले आहे म्हणून तर मुळीच नाही.
आपल्या साहित्याने प्रश्नांची कधीच भीती बाळगली नाही. त्यातील काही सर्वोत्तम शिकवण ही प्रश्न, संवाद, शंका आणि चिंतन यातूनच साकारली आहे.
आणि कदाचित, अशाच प्रकारे आलेले शहाणपण, हे खऱ्या अर्थाने आपलेसे होते.
आपण इतरांचे म्हणणे ऐकू शकतो.
त्यांच्या अनुभवातून शिकू शकतो.
त्यांच्या ज्ञानाचा आदर करू शकतो.
पण शेवटी, आपल्याला त्या गोष्टींवर स्वतःलाच चिंतन आणि मनन करावे लागते.
त्यावर प्रश्न उपस्थित करावे लागतात.
त्याचे निरीक्षण करावे लागते.
त्याचा अनुभव घ्यावा लागतो.
आणि जीवन आपल्याला काय उलगडून दाखवत आहे, हे पाहावे लागते.
तरच, ते उसने घेतलेले ज्ञान हळूहळू आपल्याला उमजू लागते आणि आपल्या आयुष्याचा भाग बनते.
ही गोष्ट मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातही आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी मी स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो...
माझ्या समजुतींबद्दल.
माझ्या निर्णयांबद्दल.
आणि कधीकधी, मी इतरांना सांगत असलेल्या गोष्टींबद्दलही.
कारण ज्या मार्गावरून जाण्याची माझी स्वतःची इच्छा नाही, त्या मार्गावरून मी दुसऱ्या कोणाला चालायला सांगू इच्छित नाही. त्यामुळेच लोकांना काही करायला सांगण्यापूर्वी मी स्वतः ते आचरणात आणतो.
हे काही मी नेहमीच सर्व गोष्टी योग्य रीतीने करेन या समजुतीतून नाही तर, जेव्हा आपण स्वतः सांगितलेल्या गोष्टींनुसार जगण्याची तयारी ठेवतो, तेव्हा त्या शब्दांना एक वेगळेच वजन प्राप्त होते, यावर माझा विश्वास आहे म्हणून.
कदाचित म्हणूनच अर्जुनाला दिलेला श्रीकृष्णाचा अंतिम संदेश माझ्या मनाला इतका भिडतो.
आपले सर्व म्हणणे मांडल्यानंतर, श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले अंधानुकरण करण्यास सांगितले नाही तर त्याने अर्जुनाला चिंतन करून निर्णय घेण्यास सांगितले.
कदाचित हा केवळ गीतेतील एक धडा नाही, तर जगण्याचा एक मार्गही आहे.
कृष्णाने अर्जुनला काय करावे हा आदेश नाही दिला
कृष्णाबद्दल मला सर्वात उल्लेखनीय वाटणारी ही एक गोष्ट म्हणजे...
तो अर्जुनला मार्गदर्शन करतो.
तो त्याला प्रश्न विचारतो.
तो त्याच्या समजुतीला आव्हान देतो.
तो त्याचा दृष्टीकोन विस्तारतो.
तो कृती, आसक्ती, कर्तव्य, आत्मा आणि चैतन्य याबद्दल बोलतो.
पण सर्व काही बोलून झाल्यानंतर, कृष्ण एक असाधारण गोष्ट करतो...
तो अर्जुनाचे स्वातंत्र्य हिरावून घेत नाही.
भगवद्गीतेत कृष्ण म्हणतो:
"याचा पूर्णपणे विचार कर. मग तुला जसे योग्य वाटेल तसे कर."
जरा क्षणभर थांबून याचा विचार करा...
अर्जुनाला समजणे आवश्यक आहे असे वाटणाऱ्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतरही, श्रीकृष्ण अंतिम निर्णय अर्जुनावरच सोपवतात.
यात सक्तीची आज्ञापालन नसते.
आंधळेपणाने अनुकरण करण्याचा आग्रह नसतो.
यात असते ते परिस्थितीचे आकलन.
आत्मचिंतन.
आणि त्यानंतर मिळणारे स्वातंत्र्य.
खऱ्या ज्ञानाची ही एक अत्यंत सुंदर बाजू आहे. ते आपल्या निवडींवर सक्तीने नियंत्रण ठेवत नाही; तर त्या निवडी अधिक सजगपणे करण्याची क्षमता आपल्यात निर्माण करण्यास ते मदत करते.
कृष्ण – ज्याची आपण उपासना करतो
कृष्ण – असा गुरू ज्याचे ज्ञान आपण आपल्या जगण्यात उतरवू शकतो.
कधीकधी, जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासाठी मंगलमयी किंवा पवित्र बनते, तेव्हा त्याबद्दल प्रश्न विचारणे आपण टाळतो.
आपण तिची उपासना करतो.
आपण तिचे रक्षण करतो.
आपण तिचा आदर करतो.
आणि कदाचित, त्यालाही स्वतःचे असे एक महत्त्व आहे.
पण श्रीकृष्णाची शिकवण आपल्याला त्याहूनही काहीतरी अधिक करण्यास प्रवृत्त करते...
विचार करण्यास.
मनन करण्यास.
प्रश्न विचारण्यास.
समजून घेण्यास.
आणि मग, त्यानुसार जगण्यास.
श्रीकृष्णाची उपासना करणे आणि त्यांना समजून घेणे यांतून फक्त एकाची निवड करावी, असे अजिबात नाही. अशा निवडीची आपल्याला गरजच नाही.
कृष्ण - ज्याची आपण उपासना करतो.
आणि त्याच वेळी,
कृष्ण – तो गुरू, ज्याचे ज्ञान आपण आपल्या जगण्यात उतरवू शकतो.
या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत; विरोधी नाहीत.
खरं तर, कृष्णाच्या ज्ञानाचे आयुष्यातील महत्व समजून घेतल्याने आपली श्रद्धा अधिक दृढ होऊ शकते. आणि अशावेळी कृष्ण केवळ भेटायला जायची एखादी व्यक्ती किंवा देव उरत नाही.
तर तो असा मार्गदर्शक बनतो ज्याची शिकवण...
आपल्या गोंधळाच्या आणि अनिश्चिततेच्या क्षणी
आपल्या नातेसंबंधांमध्ये.
आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये.
कठीण निर्णय घेताना.
आपल्या भीतीमध्ये.
आपल्या महत्त्वाकांक्षांमध्ये.
आणि जीवनाचा अर्थ शोधण्याच्या आपल्या प्रवासात देखील सोबत राहते.
माझ्या मते, श्रवण करणे हा देखील भक्तीचाच एक प्रकार आहे.
हा प्रश्न आपण कृष्णाची पुरेशी उपासना करतो की नाही, याबद्दलचा नाही तर त्याहूनही अधिक महत्वाचा प्रश्न म्हणजे:
कृष्णाने जे काही सांगितले आहे, त्याबद्दल आपण कितीदा शांतपणे विचार करतो?
केवळ ते पाठ करण्यासाठी नव्हे तर स्वतःला हे विचारण्यासाठी की:
माझ्या आयुष्यात याचा काय अर्थ आहे?
मला काय दिसत नाहीये?
आयुष्यातील कोणत्या बाबतीत मी भीती किंवा आसक्तीला माझ्या निर्णयांवर प्रभाव पाडू देत आहे?
या परिस्थितीत माझी जबाबदारी काय आहे?
आणि जर मी या परिस्थितीकडे अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिले, तर काय बदलू शकेल?
अशा प्रश्नांमधुनच, कृष्णाचे ज्ञान पुस्तकात न राहता एखाद्या जिवंत व्यक्तीप्रमाणे आपल्या आयुष्याचा भाग होऊन जाते.
आणि ते केवळ जन्माष्टमीच्या वेळीच किंवा फक्त मंदिरातच नाही तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातील सामान्य आणि असाधारण क्षणांमध्ये देखील आपल्या सोबत राहते.
असे क्षण जेव्हा आपल्याला काय करावे हे समजत नाही.
असे क्षण जेव्हा आपले मन द्विधा मनःस्थितीत असते.
असे क्षण जेव्हा एखादा कठीण निर्णय घेण्यापेक्षा आहे त्या स्थितीत स्थिर राहणे अधिक सोपे वाटते.
कदाचित प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर, स्वतःच निर्मिलेल्या कुरुक्षेत्रात उभा असतो.
आणि त्या क्षणी, श्रीकृष्णाची वचने केवळ उच्चारण्यापुरती नसतात तर...
ती शांतपणे मनन करण्यासाठी असतात.
त्यावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी असतात.
ती समजून घेण्यासाठी असतात.
आणि अखेरीस, ती आचरणात आणण्यासाठी असतात.
आयुष्यभर चालणारी प्रक्रिया
मी कृष्णाचा जितका अधिक विचार करतो, तितकेच मला जाणवते की त्याला एकदाचा समजून घेणे हे काही माझे अंतिम ध्येय नाही तर ही एक आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.
तीच कथा, तीच शिकवण आणि तेच शब्द, पण जेव्हा आयुष्य तुम्हाला त्याकडे पाहण्याचा एखादा नवीन दृष्टिकोन देतो, तेव्हा त्यातून काहीतरी पूर्णपणे वेगळेच उलगडू शकते. म्हणूनच कृष्ण आजही तितकाच सुसंगत आणि महत्त्वपूर्ण वाटतो.
त्याच्या कथांच्या माध्यमातून तुम्ही त्याला एका बालकाच्या रूपात भेटू शकता.
एक भक्त म्हणून उपासनेद्वारे.
किंवा गीतेच्या माध्यमातून एक विद्यार्थी म्हणून.
आणि जसजसे आयुष्य पुढे पुढे सरकत जाईल, तसतसे कदाचित तुमच्या स्वतःच्या अनुभवांतून तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा नव्याने भेटू शकाल.
प्रत्येक वेळी, आपल्याला आधीच माहीत आहे असे वाटणारी एखादी गोष्ट कदाचित पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने समजून येईल.
श्रीकृष्ण आपली श्रद्धा आणि प्रेमाने मंदिरात विराजमान आहेच पण त्याचबरोबरीने...
आपण कृष्णाच्या ज्ञानाला आपल्या दैनंदिन आयुष्यात स्थान देऊ शकतो का?
कारण भक्ती आपल्याला कृष्णाच्या अधिक जवळ नेते.
पण त्याच्या ज्ञानाचा आचरणामध्ये समावेश केल्यास कृष्ण आपल्या आयुष्याच्या अधिक जवळ येतो.
आणि कदाचित, या दोन्हींपैकी एकाची निवड करणे हे आपले उद्दिष्ट नाहीच आणि नसेल...
आपण कृष्णाची उपासना करू शकतो.
आणि आपण त्याचे म्हणणे ऐकूनही घेऊ शकतो.
Blog by 'Life Coach & Business Mentor' Shailesh Tandel
You may explore:
1:1 Coaching | Business Mentoring | Corporate Training | Executive Coaching | Workshops

Sir pls guide regarding bhagwat geeta
भगवदगीतेचा मी विद्यार्थी आहे त्यामुळे तेवढेच लिहितो जेवढं मी समजू शकलोय.
धन्यवाद
श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा मला नेहमीच प्रेरणादायी वाटत आली आहे.
जुन्या महाभारतातून दिसलेला श्रीकृष्ण, नवीन महाभारतातून वेगळ्या पद्धतीने समोर आलेला श्रीकृष्ण आणि राम शेवाळकर यांनी आपल्या विचारातून उलगडून दाखवलेला श्रीकृष्ण — प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं.
पण आज तुमचा लेख वाचताना श्रीकृष्णाकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहता आलं. विशेषतः आजच्या व्यवसायाच्या आणि बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात श्रीकृष्णाचे विचार किती प्रासंगिक आहेत, याची एक वेगळी जाणीव झाली.
श्रीकृष्ण म्हणजे फक्त महाभारतातील एक पात्र नाही, तर परिस्थिती समजून घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची एक विचारपद्धती आहे, असं मला तुमचा लेख वाचून पुन्हा जाणवलं.
खरंच, तुमचा लेख मनाला भिडला आणि विचार करायला भाग पाडला. खूप आवडला. 👏🙏
धन्यवाद निलेश.
तुमचं म्हणणे अगदी बरोबर आहे. कृष्ण महाभारत किंवा द्वापारयुगा पुरता मर्यादित नाही आहे तर त्याच्या उपदेशाची व्याख्या परिस्थितीनुसार बदलत जाते आणि त्यामुळेच ते कोणत्याही परिस्थितीत प्रासंगिक ठरतात.
कृष्ण एका लेखात सामावणे शक्य नाही त्यामुळे कृष्णाची विचारपद्धती आणि कार्यशैलीला अनुसरून भविष्यात आणखी काही लेख लिहिण्याचा मानस आहे, त्यासाठी पुन्हा एकदा भेट होईलच.