स्वतःसोबत शांत बसायला शिकणे

स्वतःची सोबत

काही काळापूर्वी, मला एका कार्यक्रमात बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

आयुष्याचा समतोल, प्रगती आणि यश यांविषयी ऐकण्यासाठी लोक उत्सुक होते.

पण त्या सभागृहात बसलेल्या लोकांकडे पाहिल्यावर मला काहीतरी जाणवलं...
आपल्यापैकी बहुतेकांना गोंगाटात जगण्याची इतकी सवय झालेली आहे की शांतता एखाद्या घुसखोरासारखी वाटावी.

जेव्हा सत्र सुरू झाले, तेव्हा लगेचच विषय सुरू करण्याऐवजी, मी सर्वांना डोळे बंद करून काही मिनिटे शांत बसण्यास सांगितले.

फोन नाही.
कोणतीही संभाषणे नाहीत.
संगीत नाही.
कोणतीही कृती नाही.
फक्त स्वतःची सोबत.

काही सेकंदातच मला तिथे अस्वस्थता जाणवली.

त्या शांत क्षणांमध्ये आराम करण्याऐवजी, लोकांच्या मनातील गोंधळ प्रत्यक्षात त्यांच्या कृतीतून दिसू लागला होता.

काही सारखेसारखे डोळे उघडून घड्याळात पाहून पुन्हा डोळे बंद करत होते. तर काहींनी थोड्याच वेळात डोळे उघडून आजूबाजूला पाहत बसले. काहींनी त्यांच्या खुर्च्या समायोजित केल्या. इतर काही ती उरलेली मिनिटे संपण्याची वाट पाहत होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. कदाचित त्यांच्या मनात प्रश्न असावा की, अजून किती वेळ आपण अशा प्रकारे वाया घालवणार आहोत?

ती शांतता दिलासादायक असण्याऐवजी अधिक अस्वस्थ करणारी होती.

माझ्या बोलण्याने जेवढा फरक पडू शकला असता त्यापेक्षाही तो क्षण अधिक बोलका होता.

स्वतःसोबत कसे राहायचे हे कदाचित आपण विसरून गेलो आहोत.

अस्वस्थतेचे नवीन युग

जरा याचा विचार करून पहा...

पहाटे पहाटे अगदी ५ वाजता जरी आपण उठलो, तरी आपल्या हातात फोन यायला किती वेळ लागतो?

बातम्या. मेसेज. अपडेट्स. रील. स्टोरीज. स्टेटस.

दिवसाची व्यवस्थितपणे सुरुवात देखील झालेली नसते पण आपले मन मात्र पूर्णपणे व्यापलेले असते.

कामावर पोहोचण्या पर्यंतच्या प्रवासात आम्हाला संगीत किंवा पॉडकास्ट ऐकणे आणि फोन कॉल्स करणे आवश्यक वाटते.

घरात शांतता इतकी अनैसर्गिक वाटते की अनेकदा प्रत्यक्षात कुणीही पाहत नसतानाही टेलिव्हिजन चालूच असतो.

यालाच आपण ‘व्यस्त’ असणे म्हणतो.

पण कधीकधी मला प्रश्न पडतो की, आपण खरोखरच 'व्यस्त' असतो की शांत राहणे आपल्याला अस्वस्थ करते?
म्हणूनच, ती शांतता दूर सारण्यासाठी आपल्याला पार्श्वभूमीवर काहीतरी चालू ठेवावेसे वाटते.

कारण जेव्हा बाहेरचे सर्व आवाज बंद होतात, तेव्हा आपण अशा एका व्यक्तीसोबत उरतो जिच्यापासून आपण पळ काढू शकत नाही — ती व्यक्ती म्हणजे 'आपण स्वतः'.

आपल्या जडणघडणीतील ती 'ठराविक चौकट'

प्रवासाच्या कुठल्यातरी टप्प्यावर, आपल्यापैकी बहुतेकांना 'उत्पादक' किंवा 'सार्थक' आयुष्याची एक अगदी वेगळीच व्याख्या सांगितली गेली.

कठोर परिश्रम करा.
चांगला अभ्यास करा.
अधिक पैसे कमवा.
अधिक यश मिळवा.
सतत कार्यरत राहा.
सतत प्रगती करा.
आधी यश मिळवा.
स्वतःला कामात गुंतवून ठेवा.

आणि आयुष्याच्या उत्तरार्धात, कदाचित तुम्ही अध्यात्म, ध्यान, आंतरिक शांतता वगैरे गोष्टींचा विचार करू शकता.

पण आज?
अशा गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही.

त्या चौकटीचा परिणाम

निदान पूर्वी, लोकं म्हणायचे तरी, "मी वयाच्या साठीनंतर आंतरिक शांततेचा विचार करेन."

आज परिस्थिती वेगळी आहे — पण तरीही विचित्रपणे तशीच आहे.

आता आपण ६० वर्षांची वाटही पाहत नाही कारण...
आपल्याला शांत बसवतच नाही, अगदी १० मिनिटेही नाही.

का? कारण शांतता जाणवताच आपण लगेच फोन हातात घेतो.

स्क्रोल. स्क्रोल. स्क्रोल.
तुलना.
प्रतिक्रिया.
उत्तर देणे.
नोटिफिकेशन्स.
ब्रेकिंग न्यूज.
रील्स.
स्टोरीज.
स्टेटस.

एका नव्या प्रकारचा गोंगाट - डिजिटल गोंगाट.
एका नव्या प्रकारची भीती - FOMO (काहीतरी सुटण्याची भीती).
एका नव्या प्रकारचा संघर्ष – रेटारेटी आणि धावपळीची संस्कृती.

आपण एकटे असतानासुद्धा, आपण कधीच स्वतःसोबत नसतो.
आपलं मन नेहमीच ऑनलाइन असतं.
आपले लक्ष उधारीवर घेतले असल्याप्रमाणे.

आणि आपली मनशांती?

नेहमीच पुढे ढकलली गेलेली.

आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सर्व काही साध्य करूनही आतून रिकामेच वाटते; कारण शांतता हा ध्येयाचा भाग कधीच नव्हता.

हरवलेला सुवर्णकाळ

पूर्वीच्या काळी, शांततेला पोकळी म्हणून पाहिलं जात नव्हतं; तर ते एक उपयुक्त वर्तमान होते.

एक काळ असा होता जेव्हा हाताशी आलेले काही रिकामे क्षण कशाने तरी भरून काढण्याची गरज वाटत नसे; त्याऐवजी लोक आपल्या ओट्यावर शांतपणे बसून...

आकाशाकडे एकटक बघत बसायचे.
रिमझिम किंवा मुसळधार पाऊस बघायचे किंवा त्यात मनसोक्त भिजायचे.
पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचा आनंद घ्यायचे.
शेजाऱ्यांशी मनमोकळेपणे बोलायचे.
एखादे पुस्तक वाचायचे.
वाचलेल्या पुस्तकावर मंथन करायचे.
आपल्याच विचारांमध्ये रमून जायचे.
काहीही न करता शांत बसायचे.

आणि काहीही न करणे म्हणजे वेळ वाया घालवणे, असे नव्हते.

कधीकधी, काहीही न केल्याने मनाला एक अत्यंत महत्त्वाचे काम करण्याची सवड मिळायची — विचार करण्याची.

आज आपण ते कौशल्य गमावले आहे. आपल्याकडे पाच मिनिटे जरी मोकळी असली, तरी आपण ती लगेच कशाने तरी भरून काढण्याचा प्रयत्न करतो.

आपल्याला प्रत्येक बाबतीत उत्तेजनाची इतकी सवय झाली आहे की शांतता विचित्र वाटते.

पण जेव्हा आपण सतत शांतता टाळतो, तेव्हा आपण कदाचित आणखी एका अतिमहत्वाच्या गोष्टीलाही टाळत असतो… ‘स्वतःला’.

आपले विचार.
आपल्या भावना.
आपले प्रश्न.
आपली भीती.
आपली स्वप्ने.

कदाचित आपले स्वतःचे सत्यही.

खरा प्रश्न

अनेकदा, मी स्वतःला हा प्रश्न विचारतो:
जर आपण आज स्वतःसोबत शांतपणे बसू शकत नसू, तर जेव्हा आपल्याला गुंतवून ठेवणारे कोणीही आसपास नसेल तेव्हा काय होईल?

आणि इथेच मी लोकांना अशी गोष्ट सांगतो ज्यामुळे त्यांना आधी हसू येते आणि मग ते विचार करू लागतात.

जेव्हा लोकं मला सांगतात, "मी काही मिनिटेही एकटा बसू शकत नाही. मला कंटाळा येतो," तेव्हा मी हसून त्यांना सांगतो:

"तुम्ही नक्कीच एक कंटाळवाणे व्यक्ती असणार, कारण जर तुम्हाला स्वतःचाच सहवास आनंददायी वाटत नसेल तर मग इतरांना तुमच्यासोबत राहण्यात आनंद मिळेल अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता?"
त्यामुळे ते सहसा क्षणभर थांबून विचार करतात.

कारण सत्य हे आहे की, शांततेचा आपल्याला कंटाळा येत नाही; जेव्हा आपण स्वतःचे सोबती कसे व्हावे हे शिकत नाही, तेव्हा आपण स्वतःलाच कंटाळतो.

याचा विचार करून बघा...
योग्य लोकांच्या सान्निध्यात राहण्यासाठी त्यांच्या शोधात आपण खूप वेळ घालवतो पण स्वतःसोबत राहायला शिकण्यात आपण किती वेळ घालवतो?

स्वतःच्या सहवासाचा आनंद घ्यायला शिका

आनंदाची गोष्ट म्हणजे हे साध्य करणे आपल्या आवाक्याबाहेरचे नाही. आपण हे पुन्हा शिकू शकतो.

त्यासाठी सुरुवात लहान गोष्टींपासून करा.

पाच मिनिटे शांत बसा.
फोन नाही.
टेलिव्हिजन नाही.
संगीत नाही.
पुस्तक नाही.
कोणताही व्यत्यय नाही.
फक्त तुम्ही आणि तुम्हीच.

सुरुवातीला, एखाद्या पूर्णपणे अनोळखी जागी आल्याची भावना निर्माण होऊन तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते आणि ते अगदी स्वाभाविक आहे.

त्या शांततेत, तुमची भेट तुमच्या खऱ्या स्वरूपाशी होऊ शकते — अशी व्यक्ती जिच्यापासून कदाचित अनेक वर्षांपासून तुम्ही दुर्लक्ष करत होता किंवा दूर पळत होता.

हळूहळू ती अस्वस्थता कमी होऊ लागेल.
तुमचे विचार अधिक स्पष्ट होऊ लागतील.

धावपळीमुळे ज्या गोष्टींकडे तुमचे लक्ष गेले नव्हते, त्या गोष्टी तुम्हाला दिसू लागतील.
तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजायला सुरुवात कराल.

आणि या प्रवासात काही काळाने, एकटे असणे म्हणजे 'एकाकीपणा' आहे, असे वाटणे थांबेल.
एकटेपणाचे ते क्षण 'एकांत' (solitude) होऊन जातील.

एक अशी जागा जिथे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता.
एक अशी जागा जिथे तुम्ही चिंतन करू शकता.
एक अशी जागा जिथे तुम्ही फक्त तुम्हीच 'असता' (तुमचं स्वत्व).
एक अशी जागा जिथे तुम्ही निवांतपणे 'स्वत्व’ जपू शकता.

निवड नेहमी आपलीच असते

आयुष्य आपल्याला सतत व्यस्त राहण्याची योग्य कारणे देतच राहील.
समाज नेहमीच वेगाचे कौतुक करतच राहील.
नवनवीन तंत्रज्ञान आपले लक्ष वेधून घेण्यासाठी स्पर्धा करतच राहील.

पण या सर्व गोंधळात कुठेतरी एक छोटीशी जागा अशी असायला हवी जी फक्त आपली असेल.

म्हणून, थांबा.
मोकळा श्वास घ्या.
स्वतःसोबत राहा.

कारण लोक येतील आणि जातील. पण पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला स्वतःसोबतच जगायचे असते.

त्या व्यक्तीसोबत कसे राहावे आणि त्याच्या सहवासाचा आनंद कसा घ्यावा, हे तुम्हाला माहित असणे अतिआवश्यक असते.

संयम म्हणजे दुर्बलता नव्हे.
स्थिरता म्हणजे आळस नव्हे.
मौन म्हणजे वेळ वाया घालवणे नव्हे.

हे असे क्षण असतात जिथे तुमची भेट स्वतःशीच होते.
हे असे क्षण असतात जिथे स्पष्टता मिळते.
हे असे विराम असतात जिथे जीवनाचा अर्थ उमजू लागतो.

निवड तुमची आहे.

सतत धावतच राहायचे, की क्षणभर थांबून खऱ्या अर्थाने जगायचे?

 

Same Blog in English>>>


Blog by 'Life Coach & Business Mentor' Shailesh Tandel

You may explore:
1:1 Coaching | Business Mentoring | Corporate Training | Executive CoachingWorkshops

 

If this made you pause… the next one might move you.


Reflections on life, work, and growth.

Join a small circle of readers exploring clarity, growth, and meaningful action.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *