वीकेंडचा पुरेपूर आनंद घेतल्यानंतर सोमवारी सकाळी अंथरुणातून उठणे म्हणजे नियतीने उगवलेला सूड किंवा खूप मोठी शिक्षा. काही झाले तरी ऑफिसला वेळेवर पोहचावेच लागते त्यामुळे जबरदस्तीने उठावं लागतं त्यामुळे ही शिक्षाच आहे त्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला बरा.
तर कधी तुम्ही कल्पना करता की किती दिवस त्या मालकाच्या हाताखाली इतकी मेहनत करून त्याला श्रीमंत करायचं त्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हणजे वेळेवर काम करण्याची धावपळ नाही आणि सोमवार किंवा रविवार सारखेच. भरपूर स्वातंत्र्य, मजा आणि आर्थिक यश सुद्धा.
जर व्यवसाय सुरू करण्याची ही तुमची मुख्य कारणे असतील तर व्यवसायात उतरण्याचा विचारही करू नका कारण ही मानसिकता अपयशी ठरण्याचा सर्वात जलद मार्ग आहे.
मला सोमवारी कामावर जाण्याचा कंटाळा कधीच आला नाही. वयाच्या १६ व्या वर्षापासून, मला दिवस कोणताही असो, कामावर जाण्याची आणि कामात कोणतीही चालढकल न करता काम करण्याची सवय आहे कारण सर्व दिवस माझ्यासाठी सारखेच महत्त्वाचे आहेत. आणि योगायोगाने, ज्या दिवशी मी माझा पहिला व्यवसाय सुरू केला तो दिवस होता सोमवार, ६ मार्च १९८९ होता, महाशिवरात्रीचा शुभ दिवस.
देवाच्या कृपेने मला महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी माझ्या व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याची संधी मिळाली पण अगदी मनमोकळेपणे सांगायचे तर मी तो दिवस निवडला कारण त्या दिवशी सोमवार होता आणि नकळत महादेवाचा आशीर्वाद मिळाला.
त्यावेळी माझ्या वयाची २० वर्षे देखील पूर्ण झालेली नव्हती. व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता आणि गाठीशी जेमतेम खर्च करण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी देखील पुरेसे पैसे नसतानाही मी त्या काळ्याकुट्ट अंधारात उडी मारली होती. भाबड्या आशेवर मारलेली ती उडी नव्हती, तर मी करू शकतो हा स्वतःवरचा विश्वास आणि पूर्वीपेक्षाही अधिक मेहनत करण्याची करण्याची तयारी. जे हवे ते मिळविण्यासाठी घेतलेली ती झेप होती आणि काहीही झाले तरीही मागे परत न फिरण्याचा ठाम निश्चय.
प्रामाणिकपणा हे माझ्यासाठी आजही सर्वोत्तम धोरण आहे. उद्योग प्रामाणिकपणे करता येतो यावर मी त्यावेळीही ठाम होतो आणि आजही आहे. कितीतरी अडचणी आणि कष्टांना हसतमुखाने सामोरे गेलो पण चुकूनही लबाडी केली नाही किंवा कुणालाही फसवले नाही, कदाचित त्यामुळेच आजही मनमोकळेपणे हसू शकतो.
सुरुवातीच्या काळात, मला असे वाटायचे की जर मी लोकांशी प्रामाणिकपणे व चांगले वागलो तर लोकं देखील माझ्याशी तसेच वागतील वागेल. तो विश्वास जास्त काळ टिकला नाही. मला लवकर कळले की प्रत्येकजण निष्पक्षपणे वागत नाही आणि लोकं त्यांच्या स्वभावानुसारच वागतात; आपण कितीही चांगले वागलो तरीही. पण जशास तसे वागायचे म्हणून प्रामाणिकपणा सोडायचा असे कधी झाले नाही. मी माझ्या मूल्यांमध्ये बदल होऊ दिला नाही पण कुणी फायदा घेण्याची हिम्मत करणार नाही अशाप्रकारे वागायला नक्कीच शिकलो होतो.
सुरुवातीपासूनच एका गोष्टीवर ठाम होतो की, आकाशाला हात लावायचा आहे पण पाय घट्टपणे जमिनीत रोवूनच. कदाचित त्यामुळेच डोक्यात कधीही हवा शिरली नाही. आणि शिरली आहे असे जेव्हा जेव्हा वाटले त्या त्या वेळी डोकं रिकामे करत स्वतःला जमिनीवर आणत गेलो. ते कशासाठी याचे मनाला पटलेले कारण सोपे होते आणि ते म्हणजे, एकदा का डोक्यात हवा गेली म्हणजे अहंकार जागा झाला की अधोगतीला सुरुवात होते आणि वर्षानुवर्ष रात्रीचा दिवस करून मेहनितीने उभारलेला उद्योगाचा डोलारा कोलमडायला त्यानंतर जास्त वेळ नाही लागत. त्यानंतर तुमचा स्मार्टनेस किंवा हुशारी वगैरे कुठेही कामाला नाही येत. कारण तोपर्यंत वेळ गेलेली असते आणि एकदा का पडझड झाली की पुन्हा उभं राहणे तेवढं सोपं नसतं. काही लोकं कायमचे आयुष्यातून उठतात तर काही फक्त अस्तित्व टिकवून राहतात पण जगायचं विसरून जातात.
वयाच्या १६ व्या वर्षी कामाला लागल्यापासून, ते २० वर्षांचा होण्यापूर्वीच व्यवसाय सुरू करून उद्योजक झाल्यापासून ते आतापर्यंत मी जे काही पाहिले आणि अनुभवले आहे त्याचा आढावा घेत असताना, मी खात्रीने म्हणू शकतो की मी बरेच काही साध्य केले आहे. मग ते पैसे असोत, आदर असोत किंवा लोकांचे प्रेम असो. पण ते मिळवणे नक्कीच इतके सोपे नव्हते, हा विश्वास, कठोर परिश्रम, अनेक प्रक्रिया, प्रणाली, व्यवस्था आणि एका शिस्तीत केलेला प्रवास आहे तो.
सहसा लोकं चाळीशी पार केल्यावर कामाचा व्यवस्थित अनुभव घेतल्यावर किंवा हातात मुबलक पैसा आल्यावर थोडीफार जोखीम घेण्याचा विचार करतात. जर परतावा मिळाला तर आणखी जोखीम घेतात अगदी शेयर बाजारात घेतात तशीच. खरेतर शेयर बाजारात कमावणारे तेच असतात जे पूर्णवेळ त्या कामाला देऊन व्यवस्थित अवलोकन करून दीर्घकालीन गुंतवणूक करतात आणि चढ-उतारांमध्ये स्थिर राहून यशस्वी होतात. जे बाजार वर जायला लागल्यावर खूप पैसा कमवायला मिळणार या लालसेने येतात ते सहसा बाजार आपटायला लागला की जे मिळेल ते घेऊन धडाधड बाहेर पडायला लागतात; बहुतेकवेळा खूप मोठा नुकसान सहन करूनच.
उद्योगात उतरणे म्हणजे लॉटरी काढण्यासारखे देखील नाही आहे की लागली तर लागली. उलटपक्षी जिथे तुम्ही ८/१० तास काम करत होता तिथे कदाचित १५/१६ तास काम करायची तयारी असावी लागते. सोमवार, रविवार किंवा आराम, विकेंड वगैरे सर्वकाही विसरायचं असतं. निश्चित तास विसरून जा आणि कामाची मागणी असेल तेव्हा काम करण्यास तयार रहा. रात्रीचा दिवस करावा लागतो आणि तीही कदाचित सुरवातीची काही वर्षे बिनपगारी काम करत. बहुतेकदा तोटा देखील सहन करावा लागतो.
सुरुवातीला कुणी मदतीला सोडा, साधे मनोबल वाढवण्यासाठी देखील कदाचित कुणीच नसेल, कुणाचा पाठिंबा नाही किंवा नैतिक प्रोत्साहनही नाही त्यामुळे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही एकटेच तुमच्या स्वतःचे.
कदाचित काहीजण तुमच्या निर्णयांचा विरोधही करतील पण प्रत्येक विरोध करणारी व्यक्ती तुमची शत्रूच आहे असेही नसतं. कित्येकांना तुमची खरोखरच काळजी वाटत असते. शेवटी सतत येणारे अपयश सर्वांनाच पचवता येते असेही नाही त्यामुळे काही काळजीचे स्वर उमटणे साहजिक आहे आणि जर ते स्वर उमटत नसतील तर तुम्ही लोकांच्या खिजगणतीत देखील नाही आहात एवढे ध्यानात घ्या. आणि ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी गंभीर चिंतेची बाब असावी कारण तुम्ही लोकांसाठी अस्तित्वात देखील नाही आहात.
या सर्व गर्दीत जो कुणी तुमच्या बाजूने देवासारखा उभा राहिला असेल त्या व्यक्तीला मात्र आयुष्यभर जपा. कारण जर ती व्यक्ती नसती तर कदाचित तुम्ही जिथे पोहोचला असाल तिथपर्यंत मजल मारूच शकला नसता.
जर तुम्ही व्यवसाय सुरू करून उद्योजक होण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम मोजूनमापून जोखीम घ्यायला शिका. कारण कधीही डोळ्यावर पट्टी बांधून जोखीम घ्यायची नसते आणि एकदा ध्येय ठरल्यावर ते मिळविण्यासाठी मैदानात उतरल्यावर मागेही फिरायचं नसतं, मग ते मैदान कुस्तीचे असो वा उद्योगाचे. समस्या किंवा अडचण कितीही लहान किंवा मोठी का असेना त्यासाठी दोन पावले मागे यायला हरकत नसते पण रिंगण सोडून पळून जायचं नसतं, अगदी काहीही झाले तरीही.
पुन्हा एकदा सांगतो, जे हवं ते मिळविण्यासाठी स्वतःला झोकून देण्याची तयारी असेल तर आणि तरच व्यवसायात उतरा; नाहीतर कुंपणावरून देखील खाली उतरून जे करत आहात ते करत धन्य व्हा.
आणि हो, रिंगणात उतरल्यावरच तुम्हाला तुमची खरी ताकद कळेल, कुंपणावर किंवा प्रेक्षकांमध्ये बसून नाही. आणि तसेही कुंपणावर बसण्यात कसली आली आहे मजा, नाही का?
पुन्हा एकदा, व्यवसाय हा सोमवारच्या सकाळपासून सुटका शोधणाऱ्यांसाठी किंवा समस्यांपासून पळून जाणाऱ्या लोकांसाठी नाही. व्यवसाय त्यांच्यासाठीच असतो जे मोठी स्वप्ने पाहतात आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले सर्वस्व देण्यास तयार असतात. जर तुम्ही त्या पातळीच्या वचनबद्धतेसाठी तयार नसाल, तर तुम्हाला जे करायला सोयीस्कर वाटते ते करत राहा आणि ते आणखीन चांगले करा. उगाचच आयुष्यभराची मिळकत फटाक्यां सारखी वाजवून एकदाच उडवून देऊ नका.
Blog by 'Life Coach & Business Mentor' Shailesh Tandel
Same Blog in English - Thinking of Staring a Business?>>>
